ठाणे: पुढारी वृत्तसेवा: घरात तुम्ही जास्तीत जास्त किती झाडं लावू शकता, आणि जगवू शकता, जास्तीत जास्त २०-२५ ते ३०. पण, ठाण्यातल्या झाडं लावणाऱ्या आणि जगविण्याचा ध्यास घेतलेल्या विजयकुमार कट्टी यांनी त्यांच्या दोन घरात चक्क साडेतीन हजार झाडे लावली आहेत. या झाडांमध्ये भाज्या, फुलझाडे, दुर्मिळ झाडे, शोभीवंत झाडे असे विविध प्रकारची झाडे आहेत. केवळ स्वतःच्याच घरात त्यांनी झाडे लावली नाहीत तर इतरांना झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन आणि झाडे लावल्यानंतर जगविण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन ते करत असतात. आतापर्यंत त्यांच्या प्रोत्साहनामुळे ४०० वृक्षप्रेमींनी सुमारे २० हजार झाडे लावली आहेत. स्वातंत्र्यांच्या येत्या अमृतमहोत्सवापर्यंत ७५ हजार झाडे लावण्याचा त्यांचा मानस आहे.
वाचा : मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या : भास्कर जाधव
झाडांवर नितांत प्रेम करणारे विजयकुमार कट्टी हे पेशाने बायोमेडिकल इंजिनिअर. मुळचे कर्नाटकातील मुधोळचे. त्यांचे पूर्वज मुधोळ संस्थानातले राजपुरोहित. पेशाने बायोमेडिकल इंजिनिअर असलेल्या विजयकुमार कट्टी यांनी मुंबईतील टाटा रूग्णालयात तसेच अन्य कंपन्यांमध्ये नोकरीही केली. विशेषतः टाटा रूग्णालयातील नोकरीने त्यांनी कर्करूग्णांचा मृत्यू संघर्ष जवळून पाहिला. तिथंच जीवन म्हणजे काय याची जाणीव त्यांना झाली.
प्रत्येकाने समाजासाठी, देशाने काही तरी करावयालाच हवे, या विचारांनी प्रेरित असलेल्या कट्टी यांनी झाडे लावण्यास आणि त्यांची जोपासना करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या राहत्या घरात त्यांनी अनेक प्रकारची झाडे लावली, झाडांना जागा कमी पडू लागल्याने केवळ झाडे लावून त्याची जोपासना करण्यासाठी त्यांनी आणखी एक घर भाडे तत्वावर घेतले. या दोन्ही घरात मिळून सध्या सुमारे साडेतीन हजार झाडे आहेत. त्यात अरेका प्लाम, लिली ख्रिसमस ट्री, बारा प्रकारचे मनी प्लांट, मोगरा, गुलाब, जास्मिन, कृष्णकमळ, ब्रम्ह कमळ, ऑर्किड क्रोटन अशा विविध प्रकारची २७५ फुलं झाडं आहेत. १२० प्रकारच्या भाज्यांची झाडे असून गुलाबाचे २८ प्रकार आहेत. तसेच रबर ट्री आहेत. ही झाडे त्यांनी कोणत्याही प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा पॉटमध्ये न लावता कोको पॉट म्हणजे नारळाच्या झाडा पासून तयार केलेल्या पॉट ते लावतात, हे त्याचे एक वैशिष्ट्य आहे.
वाचा : भाजपच्या १२ आमदारांना का केले निलंबित, सभागृहात नेमकं काय घडलं?
गेली वर्षभर आपल्या कोरोनाने ऑक्सिजनचे महत्व पटवून दिले आहे. त्यामुळे झाडांचे महत्व आपल्याला आता तरी पटले आहे. असे विजयकुमार कट्टी 'दैनिक पुढारी'शी बोलताना सांगितले. झाडे फक्त लावून चालत नाहीत, ते जगविण्यासाठी त्यांना किती प्रमाणात कसे पाणी घालायचे, हे देखील महत्वाचे आहे, त्याबाबत मी झाडे लावणाऱ्याना मार्गदर्शन करतो. विशेषतः मुलांनी या झाडे लावण्यात सहभागी झाले तर त्यांना झाडे वाढण्याचा आनंद मिळवता येईल, असे कट्टी यावेळी म्हणाले. त्यांच्या प्रेरणेने आतापर्यत विविध शहरांमधील सुमारे ४०० जणांनी २० हजार झाडे लावली असून ते त्याची जोपासना करत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत्तमहोत्सवापर्यंत सुमारे ७५ हजार झाडे लावण्याचा विजयकुमार कट्टी यांचा मानस आहे. झाडं लावण्याची आणि जगविणाऱ्याची चळवळ त्यांना वाढवायची असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.