‘रोज डे’ ते ‘व्हॅलेंटाईन डे’ प्रेम करुया खुल्लम-खुल्ला

Published on
Updated on

प्रेम  हा दोन अक्षरी शब्‍द मात्र हा दोन अक्षरी शब्‍द जगायला शिकवतो. म्‍हणून तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्या दिवसाची वाट पाहावी लागत नाही. कारण प्रेम व्यक्त करण्यासाठी चेहर्यावरची लालीदेखील पुरेशी असते. तिच्या किंवा त्याच्या चेहर्यावरचे हसू, नजरेचा एक कटाक्ष प्रेमाची कबूली देण्यासाठी पुरेसा असतो. पण काळाने रुपडे पालटले त्याप्रमाणे प्रेम व्यक्त करण्याच्या कन्स्ोप्ट बदलल्या असे म्हटले तरी वावगे वाटायला नको. हॅशटॅगच्या जगात भावना व्यक्त करायला नानाविविध 'डे' संस्कृती आली आहे. धावपळीच्या दुनियेत व्यक्त होण्यासाठी हे 'डे' मदत करतात. नेहमीप्रमाणे फेब्रुवारी महिना आला की तरुण तरुणींना वेध लागतात ते अशाच एका प्रेमाच्या दिवसाचे म्हणजे 'व्हॅलेंटाईन डे' चे. पण याआधी असेच काही डे येतात ज्यांचा साजरा करण्याचा उत्साह 'व्हॅलेंटाईन डे' इतकाच असतो. 

'व्हॅलेंटाईन' वीकमध्ये शुभेच्छा संदेश, चॉकलेट, फुले, अशा विविध आकर्षक, आवडत्या वस्तू जवळच्या व्यक्तीला देऊन प्रेम व्यक्त करण्याचा नवा ट्रेंड रुजला आहे. बाजारपेठा, विविध शॉपिंग साईट या भेटवस्तूंनी सजलेल्या आहेत. विशेष म्हणजे प्रत्येकाला परवडेल अशा किमतीत या वस्तू बाजारात उपल्बध आहेत. बाजारातील या आकर्षक वस्तू पाहिल्यानंतर कुणालाही मोह आवरत नाही. तरुणाईला आकर्षित करण्यासाठी कॉफी मग, हार्टशेप पिलो, फोटो फ्रेम, म्यूझिकल हार्ट, लव्ह कोटेशन फ्रेम, मुलींसाठी मेकअपचे साहित्य, फ्लॉवर बास्केट, विविध फ्लेवरच्या चॉकलेट, भेट कार्ड, ज्वेलरी अशा विविध वस्तूंनी बाजारपेठा तर गजबजलेल्या आहेतच पण त्याचसोबत ऑनलाईन शॉपिंग साईटही या प्रेमाच्या रंगता नटलेल्या दिसत आहेत. अगदी १०० रूपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतच्या वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. 

फेब्रुवारीतील ७ तारखेपासूनच विविध डेजना सुरुवात होते. गल्ली बोळापासून कॉलेज कॅम्पसपर्यंत सगळीकडे डेजची लगबग पाहायला मिळते. तुम्हाला माहिती नसेल तर कधी कोणता डे आहे. 'रोझ डे' ते 'व्हॅलेंटाईन डे' चा 'प्रेमाचा प्रवास'…

७ फेब्रुवारी 'रोझ डे' 

'व्हेलेंटाईन डे' हे एका दिवसाचं सेलिब्रेशन नसतं तर आठवडाभर प्रत्येक दिवशी एक खास दिवस सेलिब्रेट केला जातो. या सेलिब्रेशनमध्ये पहिल्याच दिवशी रोझ डे असतो. ७ फेब्रुवारी हा दिवस रोझ डे (Rose Day) म्हणून साजरा केला जातो. प्रेमाचं आणि मैत्रीचं नातं जोडण्यासाठी पहिल्या दिवशी गुलाब देऊन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात. पण गुलाब कोणत्या रंगाचा आहे त्यावर तुमच्या मनातील भावना अवलंबून असतात.

८ फेब्रुवारी 'प्रपोज डे'

कुणाला प्रपोज करायचे असेल आणि 'व्हॅलेंटाइन डे' ची वाट बघताय?. वाट न पाहता 'प्रपोज डे' ला आपल्या आवडत्या व्यक्तीस प्रपोज करा. प्रपोज करताना समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर करा.  

९ फेब्रुवारी 'चॉकलेट डे' 

प्रेमाच्या गोड प्रवासात 'चॉकलेट डे' ला वेगळेच महत्त्व आहे. सर्व वयाचे लोक खास मित्रांसोबत चॉकलेट दिवस साजरा करतात. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजन, मित्र, व्हॅलेंटाइन इत्यादींसोबत चॉकलेट देणे आणि घेणे पसंत करतात. 

१० फेब्रुवारी 'टेडी डे' 

या दिवशी लोक आपल्या जवळच्या व्यक्तीला टेडी (Teddy) गिफ्ट करून आपल्या प्रेमाची जाणीव करून देतात. आपल्या प्रेमाची जाणीव करून देणारा टेडी पत्नी, पती, मित्र, मैत्रिण, बहिण, भाऊ आणि इतर आवडीच्या लोकांना देऊ शकतो. मुलींना टेडी फार पसंत असतात त्यामुळे आपल्या 'तिला' खूश करण्यासाठी टेडी भेट देण्याचा चांगला पर्याय आहे. 

११ फेब्रुवारी 'प्रॉमिस डे'

वचन आणि प्रेम यांचे जुने नाते आहे. कारण वचनांशिवाय प्रेम पूर्णच होत नाही असे म्हणतात. व्हॅलेंटाईन वीक मधला वचनाची आठवण करुन देणारा आणि वचनाचे महत्त्व सांगणारा 'प्रॉमिस डे'ला वचन दिले जाते किंवा घेतले जाते. प्रेमाचे शिखर शपथांच्या आणि वचनांच्या पायावर रचले जाते. प्रेमाचे हे शिखर सर करण्यासाठी दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. 

१२ फेब्रुवारी 'हग डे' 

आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मिठीत सामावून जाण्यासारखे सुख नाही. एक जादूची झप्पी सारे दु:ख विसरण्यास मदत करते. यासाठीच १२ फेब्रुवारीला 'हग डे' साजरा केला जातो. आपल्या आवडत्या व्यक्तीच्या  मिठीत सर्व जगाचे सुख, आनंद, आपुलकी, विश्वास, अतूट बंधन आणि सुरक्षेची भावना येते.

१३ फेब्रुवारी 'किस डे' 

'किस डे'. आपल्या आवडत्या व्यक्तीप्रती मनात असलेल्या भावनांची कोमल  अभिव्यक्त करण्यासाठी किस हा सशक्त पर्याय आहे. निरागस बाळाचा पापा घेतल्यावरही ते किती सुखावते आणि त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलते याचा अनुभव सगळ्यांनाच असतो. हाच आपुलकीचा आविष्कार प्रेमाच्या व्यक्तीबरोबर केल्यास ती सुखावणार नाही का? 

१४ फेब्रुवारी 'व्हॅलेंटाईन डे'

१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे. प्रेम व्यक्त करण्याचा हा अनोखा दिवस. या दिवशी अनेक दिवसांपासून लपवून ठेवलेलं प्रेम व्यक्त करतात. तसेच आपल्या प्रियकराला खास सरप्राईज देऊन हा दिवस साजरा केला जातो. या प्रेमाच्या प्रवासात या 'डे'च्या निमित्ताने का होईना एकमेकांसाठी वेळ काढला जातो. धावपळीच्या जगात 'हे' डेज नाती टिकविण्यासाठी उपयोगी पडतात. 

रोज डे पासून सुरु झालेला प्रेमाचा प्रवास 'व्हॅलेंटाईन डे' वर येवून थांबतो…म्‍हणजेच येथूनच सुरुवात होते आयुष्‍यातील प्रेमाच्‍या प्रवासाला….

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news