मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास असमर्थ असल्याच्या आशयाचे एक पत्र राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहमंत्रालयाला पाठवले आहे. परमबीर सिंग यांनी नव्याने आरोप करत उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर संजय पांडे यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यामुळे राज्य शासन पुढे काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटके आणि धमकीचे पत्र ठेवलेली गाडी उभी केल्याचे प्रकरण आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्याप्रकरणावरून मुंबई पोलिस नाचक्की झाली. याप्रकरणात वादग्रस्त चकमक फेम अधिकारी सचीन वाझे याला अटक झाल्यानंतर याचा ठपका ठेऊन मार्च महिन्यात परमबीर सिंग यांची मुंबई पोलिस आयुक्त पदावरुन थेट होमगार्डच्या पोलिस महासंचालक पदावर उचलबांगडी करण्यात आली. त्यानंतर परमबीर सिंग यांनी राज्याच्या गृहविभागाच्या कारभारवर बोट ठेवत तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले.
परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तर तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदावरुन पाय उतार व्हावे लागले आहे. याच दरम्यान, राज्य शासनाने 01 एप्रिलला ऑल इंडिया सर्विसच्या नियमावलीतील निर्देशांचा भंग केल्याबद्दल परमबीर सिंग यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. तर, 20 एप्रिलला परमबीर सिंग यांच्याविरोधात असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांत चौकशीचे आदेश राज्याचे पोलिस महालंचालक संजय पांडे यांना दिले होते.
राज्य शासनाने आपल्या विरोधात सुरु केलेल्या दोन प्रकरणांतील चौकशी आणि दाखल करण्यात आलेल्या एका गुन्ह्याला परमबीर सिंग यांनी विरोध दर्शवला आहे. परमबीर सिंग यांनी याविरोधात पुन्हा एकदा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. यासंदर्भात त्यांनी एक याचिका दाखल करुन त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. परमबीर सिंग यांनी यावेळी महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जर, मी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधातील तक्रार मागे घेतली. तर, ते माझ्या विरोधात सुरु असलेली चौकशी मार्गी लावतील, असा दबाव पांडे यांच्याकडून टाकण्यात आल्याचा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे आपल्याला हा विनाकारण त्रास दिला जात आहे. इतकेच नव्हे तर आपल्या विरोधात एकापाठो पाठ एक गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगत देशमुखांविरोधात केलेल्या आरोपांचे ते पत्र मागे घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात असल्याचा आरोपही परमबीर सिंग यांनी या याचिकेतून केला आहे. परमबीर सिंग यांनी पुरवा म्हणून काही कॉल रेकॉर्डिंग सादर केले आहेत. परमबीर सिंग यांनी यासंदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागालाही (सीबीआय) पत्र लिहिले आहे.