जनतेसाठी आम्ही स्वयंपाक करू, फक्त ‘त्या’ धरणातील पाणी नको : ठाकरे
बार्शी : तालुका प्रतिनिधी
जनतेसाठी स्वयंपाक करणे हे काही वाईट नाही. आम्ही प्रसंगी जनतेसाठी स्वयंपाक करू; मात्र 'त्या' धरणातील पाणी नको, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांनी शिवसेनेच्या दहा रुपयांच्या थाळीवरून उडवलेल्या खिल्लीचा खरपूर समाचार घेतला. उद्धव ठाकरे यांनी सोमवारी बार्शी येथे महायुतीचे उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ सभा घेतली.
अध्यक्षस्थानी शशिकांत पवार होते. यावेळी शिवसेना नेते तानाजी सावंत, बार्शी विधानसभेचे उमेदवार दिलीप सोपल, महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, योगेश सोपल, नगरपालिका विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे, जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी बार्शीतील सभेत शिवसेनेवर बोचरी टीका केली होती. दहा रुपयांत थाळी देण्याच्या शिवसेनेच्या वचननाम्यातील आश्वासनाची चिरफाड करीत खिल्ली उडवली होती. शिवसेनेची झुणका-भाकर योजना कधी सुरू आणि कधी बंद पडली हे समजले नाही. तेच लोक आता दहा रुपयांत थाळी देणार आहेत. तुम्हाला राज्य करायचे आहे की स्वयंपाक करायचा आहे, असे म्हणत शरद पवार यांनी खिल्ली उडवली होती. पवार यांचे हे विधान शिवसेनेच्या चांगलेच जिव्हारी लागल्याचे ठाकरे यांच्या भाषणातून दिसून आले.
