बेळगाव/पेडणे : प्रतिनिधी
गोव्याला पर्यटनासाठी गेलेल्या बेळगावच्या दोघा युवकांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. आदित्य अभयकुमार मगदूम (वय 26, रा. सम्मेदनगर, उदमबाग), अभिजित अशोक मगदूम (वय 33 रा. हिंदवाडी) अशी बुडालेल्यांची नावे आहेत. या घटनेतील बुडणार्या तिसर्या युवकाला जीवरक्षकांनी वाचविले आहे. घटनेची नोंद पेडणे पोलिस स्थानकात झाली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव येथील 8 जण गोव्याला पर्यटनाला गेले होते.
दरम्यान, पेडणे पोलिस स्थानकाच्या व्याप्तीत येणार्या मोर्जीयम बीचवर पोहायला गेले होते. यामधील तिघे जण पोहता पोहता समुद्रात ओढले गेले. यावेळी इतर सहकार्यांनी आरडाओरड केली. यावेळी समुद्र किनार्यावर असणार्या जीवरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली व बुडणार्या एकाचे प्राण वाचविले तर यामधील दोघा जणांचा शोध घेण्यात विलंब झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
पेडणे पोलिस उपनिरीक्षक आदित्य नाईक गावकर यांनी मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळ बांबोळी येथे शवचिकित्सेसाठी पाठवून दिले. पुढील तपास पेडणे पोलिस निरीक्षक संदेश चोडणकर करत आहेत.