तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा
शारदीय नवरात्रौत्सवाच्या अष्टमीच्या दिवशी तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची महिषासुर मर्दिनी स्वरूपात अलंकार महापूजा बांधण्यात आली. यानिमित्ताने भवानीमातेच्या गाभारा परिसराला आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.
दुर्गाष्टमी हा तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील महत्त्वाचा दिवस असतो. या दिवशी होमकुंडावर होम हवन आणि धार्मिक विधी परंपरेने चालत आलेले आहेत. जिल्हाधिकारी व संस्थांचे अध्यक्ष डॉक्टर कौस्तुभ दिवेगावकर यांनी सपत्नीक होम कुंडावर यजमान म्हणून बसले होते. मंदिर संस्थानचे उपाध्ये बंडोपंत पाठक आणि इतर उपाध्ये यांनी वैदिक मंत्रोच्चारमध्ये होम प्रज्वलित केला. परंपरागत पाठाचे पठण ब्राह्मणाकडून करण्यात आले. पहाटे चरणतीर्थ पूजा महंत तुकोजी महाराज व पाळीचे पुजारी राजाभाऊ मलबा यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. त्यानंतर अभिषेक पूजा करण्यात आली.
महंत वाकोजी महाराज, महंत हमरोजी महाराज, पुजारी अतुल मलबा यांनी मातेची नित्योपचार पूजा संपन्न केली. त्यानंतर तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष परमेश्वर, सचिन परमेश्वर, सुधीर कदम, दिनेश कदम, समाधान परमेश्वर, गब्बर सोंजी, यांनी तुळजाभवानी देवी समोर महिषासुरमर्दिनी महालक्ष्मी महापूजा मांडली. यावेळी तुळजाभवानी देवीला लाल रंगाचा शालू नेसवण्यात आला. कपाळावर भरलेले मळवट आणि हातामध्ये दिलेला त्रिशूल तसेच भवानी माते समोर युद्ध करणारा महिषासूर होता. त्याच्यासमोर चांदीचा सिंह रौद्र रूप धारण करून बसलेला दाखविण्यात आलेला आहे. तुळजाभवानी देवी महिषासूर राक्षसाचा वध करीत असल्याचा हा अत्यंत रौद्र रूपातील देखावा दुर्गाअष्टमीचे वैशिष्ट्य आहे. तत्पूर्वी व्यवस्थापक सिद्धेश्वर इंगोले व विश्वास कदम यांच्या उपस्थितीत भवानी मातेची आरती झाली व अंगारा काढण्यात आला.
अश्विनी शुद्ध अष्टमीस तुळजाभवानी देवीने साक्षात पार्वतीचे रूप घेऊन दैत्यराज असणाऱ्या महिषासुराचा वध केला. या निमित्ताने ही पूजा तुळजाभवानी मंदिर संस्थांकडून परंपरेने दुर्गा अष्टमीच्या दिवशी मांडण्यात येते. देवीचे पुजारी सचिन परमेश्वर यांनी दुर्गाष्टमीच्या अनुषंगाने तुळजाभवानीचे महत्व खूप मोठे आहे आणि भवानीमातेची ही पूजा पाहण्यासाठी हजारो भाविक नवरात्र काळात दर्शनासाठी येतात. नवरात्र काळात केलेले दर्शन हे हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र असल्यामुळे मंदिरामध्ये भक्तांची मोठी गर्दी असते, अशी प्रतिक्रिया या निमित्ताने दिली.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मंदिर संस्थांकडून अनेक महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याचे काटेकोर पालन होत असल्याचेही त्यांनी या निमित्ताने सांगितले. हैदराबाद येथील बहादुर संस्थानच्या वतीने गणेश विहार येथे याच वेळी होम हवन पूजा संपन्न झाली. या प्रसंगी तुळजाभवानी उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो आणि सौ. अश्विनी कोंडो ह्या होमकुंडावर यजमान म्हणून होते. स्थानिक ब्रह्मवृदांनी विधिवत पद्धतीने या होमकुंडावर दुर्गाष्टमीच्या निमित्ताने पूजा केली. आई राजा उदे उदे च्या जयघोषात मध्यरात्रीपासून तुळजाभवानी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.