ब्रिटिशांच्या राज्यामध्ये एका बाजूला राज्यकर्ते आहेत. दुसर्या बाजूला ख्रिस्ती धर्मप्रचारक आहेत. हे सगळे लोक ते सगळ्या दृष्टिकोनातून बलिष्ठ आहेत. त्यांच्याकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे विज्ञान आहे, त्यांच्याकडे सत्ता आहे. तर भारतातले लोक म्हटलं तर त्यांच्याकडे काहीच नाहीये. अशा अवस्थेमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांपुढे अनेक प्रश्न आहेत. हे जे सातासमुद्राच्या पलीकडून जे लोक आलेले आहेत, ते नेमके कोण आहेत हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यांचं सामर्थ्य कशामध्ये आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. ते जर कळलं तर आपण त्यांची बरोबरी करू शकतो, ते कळलं तर आपण आपलं राज्य परत मिळवू शकतो. म्हणून ब्रिटिशांची सगळीच जीवनपद्धती, संस्कृती, भाषा, राज्यपद्धती समजून घेण्याचा प्रयत्न आपल्याकडचे लोक करू लागले.
त्याचवेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की, उद्या आपण त्यांच्यासारखेच झालो तर आपला काय उपयोग….त्यामुळे आपलं अस्तित्व म्हणून काहीतरी असलं पाहिजे…म्हणजे आपल्या अस्तित्वाच्या खुणा काय आहेत, याचा आपण शोध घेतला पाहिजे. आपलं अस्तित्व शाबूत ठेवून आपल्याला त्यांच्याकडे जे जे काही चांगलं आहे ते घेतलं पाहिजे हे त्यांना कळलं. आता राजेशाही कालबाह्य झाली होती. मग, त्यांच्याकडे कोणती राज्यपद्धती आहे. तर त्यांच्याकडे लोकशाही हे आपल्याकडच्या लोकांना कळलं. आपल्याकडच्या लोकांना लोकशाहीबद्दल उत्सुकता वाटायला लागली. महात्मा जोतिराव फुलेंचे साहित्य पाहिले तर ते लोकशाहीचे कट्टर समर्थक आहेत हे आपल्याला दिसून येईल. त्यांना अमेरिकेची लोकशाही इंग्लंडपेक्षा अधिक आदर्श वाटते. कारण इंग्लंडच्या लोकशाहीत राजेशाहीचे अवशेष सापडतात. म्हणून त्यांना ती भेसळीची लोकशाही वाटते. मग, शुद्ध लोकशाही कुठे चालू झाली तर ती अमेरिकेत, हे फुलेंनी लिहून ठेवलं आहे.
पाश्चात्त्य लोकाचं राज्यतंत्र काय आहे, अशा प्रकारची एक उत्सुकता आणि कुतूहल सगळ्या लोकांमध्ये निर्माण झाले. हे चालू असताना आपलं काहीतरी आहे स्वत्त्व, आपली ओळख, आपली निजखूण ती आपण जपली पाहिजे. आपण इंग्रज होऊन चालणार नाही. गोपाळ गणेश आगरकर हे कट्टर सुधारक होते. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा त्यांच्यावर प्रभाव होता. लोकांना वाटायचे की, हे सुधारक आहेत, पाश्चात्त्यांच्या प्रभावाखाली आहेत. यांना आपल्या देशाचं पाश्चात्त्यीकरण करायचे आहे की काय…तर आगरकरांनी स्पष्ट केलं की, तसं काही करायचे नाही आम्हाला…त्यांच्याकडच्या काळानुरूप असलेल्या चांगल्या गोष्टी स्वीकारायच्या आणि आपलं भारतीय आर्यत्व न सोडता आपल्याला त्यांच्याकडून काही गोष्टी घेता यायला हव्यात…
हा आपलं स्वत्त्व टिकवण्याचा मुद्दा आहे. ते म्हणतात, आम्ही स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आहोत. आमच्याकडची चिमा आणि त्यांच्याकडची यमा याचं सख्ख्य झालं पाहिजे. त्यांचा एकमेकांशी संवाद झाला पाहिजे. लगेच आम्ही असं नाही म्हणणार की, चिमाने यमासारखे जगावे.
याची आगरकरांना जाणीव होती म्हणून त्यांनी स्वत्त्व रक्षणासाठी आपल्याला काय करता येईल हे सांगितले. आधी स्वत्त्वाचा शोध घेतला पाहिजे. हे स्वत्त्व त्यांना महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या संतांच्या विचारात मिळाले म्हणून ते पुस्तकं काढायला लागले. परमहंस सभेचे जे लोक होते त्यात एक होते तुकाराम तात्या पडवळ. त्यांनी काय केलं. त्यांनी स्वतंत्र तत्त्ववेचक छापखाना काढला. या छापखान्याच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातल्या सर्व संतांच्या गाथा प्रकाशित केल्या. त्यात ज्ञानेश्वरीचाही समावेश आहे. त्यांना याचं एवढं महत्त्व वाटलं आणि एवढचं नव्हे तर संत तुकाराम महाराज यांचं अभंग छापायचे. त्यांच्यापूर्वी अनेकांनी तुकोबांचे अभंग छापले होते. यांना असं वाटलं की, अनेक असे अभंग आहेत की, जे लोकांनी छापलेल्या गाथांमध्ये दिसत नाहीत.
मग, त्यांनी तुकोबांच्या आणखी अभंगांचा शोध लावायचं ठरवलं. ते महाराष्ट्रातल्या कानाकोपर्यात गेले. त्यांनी अभंगांच्या वह्या गोळा केल्या. त्यांनी सर्व अभंग एकत्र करून एक भलीमोठी गाथा छापली. त्यात साडेआठ हजार अभंग आहेत. त्यातले सर्व काही अभंग हे तुकोबांचे नाहीत; पण निश्चितपणे असे अभंगही आहेत की, जे तुकोबांचे अभंग आहेत. ते वारकर्यांच्या गाथेत आलेले नाहीत. हे काम पडवळांनी केले. त्यांनी 'जाती-भेद विवेकसार' हे पुस्तकं लिहिलं. जातीप्रथा ही कशी वाईट आहे, समाजाला कशी घातक आहे हे युक्तिवाद करून पुस्तकात सांगत आहेत. हा युक्तिवाद करताना ते संतांच्या वचनांचा आधार घेत आहेत.
तुकाराम महाराजांच्या शिष्या या संत बहिणाबाई होत्या. त्या मराठवाड्यातील गावातून देहूला आल्या. तुकोबांच्या शिष्या झाल्या. त्यांनी तुकोबांप्रमाणेच अभंग रचले. अभंगातून आत्मचरित्र लिहिले. बौद्ध विचारवंत अश्वघोष यांची वज्रसूची नावाची एक कृती याला उपदेशक म्हणून लोकांनी मान्य केलं. वैदिक परंपरेतही ते घेण्यात आलं. या वज्रसूचीमध्ये जन्माधिष्ठित ब्राह्मणाच्या कल्पनेला खोडून काढलेलं आहे. त्याचा एक अभंगही आहे. त्या अभंगाचा मराठी अर्थ बहिणाबाईंनी केला.
ती वज्रसूची म्हणजे बहिणाबाईंचे अभंग पडवळकरांनी 'जाती-भेद विवेकसार' या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले आहेत. या पुस्तकाने त्या काळात खूप खळबळ माजवली. ते पुस्तक खळबळजनक असणार हे त्यांना माहीत होते. त्यांनी स्वत:च्या नावाने पुस्तक छापलं नाही. टोपण नावानं ते लिहिलं. हे पुस्तक महात्मा फुले आपल्या घरातील दुकानात विकायचे. हे दुकान मुंबईमधील नवरंगे या गृहस्थाचे होते. जे परमहंस सभेनंतर प्रार्थना समाजात गेले. ते महात्मा फुलेंचे मित्र होते. पुढे असं झालं की, या पुस्तकाचे मूळ प्रकाशक नवरंगे हे होते. ते इंग्लंडला गेले आणि पुस्तकाची आवृत्ती संपली. त्या पुस्तकाची पुढची आवृत्ती महात्मा फुलेंनी काढली.
एवढा हा संतांच्या विचारांचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये आहे. खासकरून महाराष्ट्रातील आधुनिक मुख्य धर्म संप्रदाय परमहंस सभा, प्रार्थना समाज आणि सत्यशोधक समाज यावरती हा प्रभाव आहे. 19 व्या शतकामध्ये महाराष्ट्रात फार मोठे वैचारिक मंथन झाले, प्रबोधन झाले. या प्रबोधनामध्ये या संतांच्या विचारांचा फार मोठा वाटा आहे. संतांच्या वाटेतूनच सर्व मंडळी पुढे गेली. या प्रकारचे प्रबोधन महाराष्ट्राच्या पूर्वी पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. राजाराम मोहन राय यांच्यामुळे ते प्रबोधन झालं. ते खरंही आहे; पण त्या प्रबोधनाच्या मागे कोण होतं. कुठला विचार होता. त्यांच्या संपूर्ण चळवळीमध्ये त्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्या चळवळीत बंगालच्या संतांएवढा प्रभाव नाही. थोडा प्रयत्न झाला पण तो वैचारिक पातळीवर कमी होता.
महाराष्ट्रातलं प्रबोधन हे पूर्णपणे इथल्या संतांच्या विचारांवरच आधारित आहे. इथल्या आधुनिक संप्रदायाबद्दल दुरावा कोणालाही वाटला नव्हता. या काळात सगळी मंडळी पुढे आली. त्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांची आवृत्ती काढली. हे फक्त धार्मिक भाव म्हणून घडत नव्हतं तर त्यात वैचारिकताही होती. ख्रिस्ती धर्मातील जशी पुस्तके आली तशी आपण लिहिली पाहिजेत, हा विचार पुढे आला. त्यांचे जसे धर्मग्रंथ आहेत त्याप्रमाणे धर्मग्रंथ छापले पाहिजेत, असे आपल्या मंडळींना वाटले. म्हणून आपल्याकडील लोक असे धर्मग्रंथ छापू लागले.
मिशनर्यांनी बायबल इतर भाषांमध्ये छापले पाहिजे, यासाठी छापखाने काढले. त्यांनी छपाईबद्दल सामान्यांना प्रशिक्षण दिले. गणपत कृष्णाजी त्यातीलच एक. त्यांनी ती कला आत्मसात केली. बाहेर पडून स्वत:चा छापखाना उघडला. त्यांनी तुकाराम महाराजांची गाथा छापली. त्यांनाही वाटले की, हे आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्या काळात असे अनेक लोक पुढे आले. असा हा प्रवास आपल्या संतांसंबंधीचा आहे. त्याची आपण दखल घेण्याची गरज आहे.
सदानंद मोरे
(लेखक साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.)