पर्यावरणपूरक विसर्जनही व्हावे | पुढारी

Published on
Updated on

 योगेश चौगुले

श्री गणेश सर्वांचे लाडके आराध्य दैवत असल्यानेच गणेशोत्सव काळात सगळी सृष्टी चैतन्यमय होते. कार्यारंभी गणेशपूजनाची प्रथा आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील महत्वाचा सण आहे. भाद्रपदातील चतुर्थीला वाजत गाजत गणरायाचे आगमन होते आणि पुढील दहा दिवस बाप्पा घरात विराजमान होतात. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक रुप दिले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाज एकत्र यावा, विचारांची देवाण – घेवाण व्हावी, समाज प्रबोधन व्हावे हा त्या मागचा उद्देश होता. लोकांनी त्यांच्या हाकेला उदंड प्रतिसाद दिला. लोकं घरात आणि मंडळात दोन्ही ठिकाणी गणेशोत्सव उत्साहात साजरा करु लागली.

सामाजिक बदल हा विचारांच्या बदलांनी घडून येतो. विचार बदलले उत्सव साजरे करण्याची पद्धत बदलत गेली. हा उत्सव भव्य स्वरुपात साजरा करण्यासाठी चढाओढ निर्माण झाली. माझी मूर्ती जास्त भव्य, आकर्षक असावी असे प्रत्येकाला वाटू लागले. सुबकता व रेखीवता यापेक्षा भव्यतेला महत्व दिले जावू लागले. या संघर्षात माती आणि शाडूच्या मूर्तीर्ंंची जागा प्लास्टर ऑफ पॅरिसने कधी घेतली हे समजलेच नाही. आकर्षक रासायनिक रंग, उंचच्या उंच गणेशमूर्ती सर्वत्र दिसू लागल्या.आता या मूतीर्र् विसर्जित कुठे करायच्या?  नदी, तलाव, समुद्र असे मोठे मोठे जलसाठे आहेतच.

पण हे नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होत आहेत, याचे भानही आपल्याला राहिले नाही. निसर्ग माणसाला नेहमी देतो. मात्र, त्याच्या दातृत्वाची माणसाला किंमत राहिलेली नाही. गणेशोत्सव धामधुमीत साजरा करण्याच्या पद्धतीमुळे माणूस निसर्गाचा र्‍हास करत आहे. गणेशमूर्ती मातीची असेल तर त्यांचे व्यवस्थित विसर्जन होते. मात्र, प्लास्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नसल्याने पाण्याचेे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. रासायनिक रंग जलचर प्राण्यांसाठी घातक आहेत. अनंत चतुर्दशीनंतर नदी, तलावाच्या किनारावर मूर्त्यांचे अवशेष, पाण्यावर तरंगणारा कचरा अशी विदारक परिस्थिती पहावयास मिळते. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे. 'एक गाव एक गणपती' या उपक्रमासही चालना मिळाली पाहिजे.  विसर्जन करताना थर्माकोलचा वापर करुन तयार केलेले मखर, हार, फुले पाण्यात टाकल्याने जलप्रदूषणात वाढ झाली आहे.

या भीषण समस्येवर मात करणे काळाची गरज आहे.  त्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे, कचर्‍याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे, अशा छोट्या छोट्या जबाबदार्‍या उचलून आपण आपल्या घरापासून सुरुवात करू शकतो. गणेशोत्सवादरम्यान होणार्‍या सार्वजनिक कार्यक्रमांनीही विकृत रुप धारण केले आहे. मोठमोठ्या आवाजात लावलेले अशोभनीय गाणे, डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होते.

या वर्तनामुळे सणाचे पावित्र्य नष्ट होत आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी ढोल-ताशा व लेझीम पथकांना चालना देणे गरजेचे आहे. पर्यावरणाचे संरक्षण करणे ही काळाची गरज बनली आहे.

आपली संस्कृती पर्यावरणपूरक आहे. पर्यायाने आपले उत्सवही पर्यावरणपूरक असले पाहिजेत. कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो तसाच उत्सवही पर्यावरणपूरक असावा. यासाठी जनजागृती कार्याची सुरुवातही गणेशोत्सवापासून केली पाहिजे. थर्माकोलचा वापर टाळून नैसर्गिक मखर वापरावे, तसेच समाज प्रबोधनात्मक संस्कृती पूरक व पर्यावरणाचा समतोल ढळू न देता गणेशोत्सव साजरा केला पाहिजे.

 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news