संदीप शिरगुप्पे : पुढारी ऑनलाईन ; राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना मुंबईत झाली असली तरी राष्ट्रवादीच्या स्थापनेचा संदर्भ हा कोल्हापुरशी निगडीत आहे. १९९९ साली कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शंकरराव पाटील कौलवकर यांच्या मुलांनी कोल्हापुरात हॉटेल काढले होते. या हॉटेलच्या उद्घाटनासाठी शरद पवार यांना आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान कोल्हापुरात हॉटेलच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम झाल्यावर शरद पवारांनी जिल्ह्यातील निष्ठावंत नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीतूनच १९९९ साली राष्ट्रवादीच्या स्थापनेची सुत्रे पहिल्यांदा हालली होती. या सर्व घटनांचे साक्षीदार दैनिक पुढारीचे वृत्तसंपादक चंद्रशेखर माताडे आहेत. राष्ट्रवादी स्थापना दिनाच्या निमीत्ताने कोल्हापुरातूनच राष्ट्रवादीच्या स्थापनेसाठी मुहुर्तमेढ रोवली गेल्याचा आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
तत्कालीन मंत्री दिवंगत नेते दिग्वीजय खानलीवकर यांच्या बंगल्यावर जिल्ह्यातील महत्वाच्या नेत्यांना बोलवण्यात आले होते. राष्ट्रवादीची स्थापना करण्याच्या हेतूने शरद पवारांनी ही बैठक घेतली होती. यामध्ये आघाडीवर सदाशिवराव मंडलीक, बाबासाहेब कुपेकर, दिग्विजय खानविलकर, यांच्यासह अन्य नेत्यांनी हजेरी लावली होती. यामध्ये कोल्हपूर जिल्ह्याचे काँग्रेसचे निष्ठावंत नेते माजी खासदार उदयसिंह गायकवाड, माजी खासदार कल्लाप्पा आवाडे, यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांना काळजीपुर्वक वगळण्यात आले होते.
राष्ट्रवादीच्या स्थापनेपूर्वी बाबासाहेब कुपेकर काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष होते तर कोल्हापूर शहराध्यक्ष आर. के. पोवार होते. शरद पवार यांनी खानविलकर यांच्या बंगल्यावर मीटिंग झाल्यावर कोण कोण नेते आपल्यासोबत येतील याची चाचपणी केली. यामध्ये उदयसिंह गायकवाड, कल्लाप्पा आवाडे, जयंतराव आवळे हे नेते आपल्यासोबत येणार नसल्याची खात्री शरद पवार यांनी करून घेतली.
या दरम्यान रत्नाप्पा कुंभार यांनी उभारलेल्या काँग्रेसला धक्का न पोहोचवण्यासाठी उदयसिंह गायकवाड तातडीने २० मे १९९९ रोजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर शहर अध्यक्ष बदलण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस कमीटीकडून हालचाली केल्या आणि तडकाफडकी हकालपट्टी करत दोन्हीही पदे बदलली. रत्नाप्पा कुंभार यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस वाढवली होती त्यातील जिल्हाध्यक्ष आणि शहरध्यक्षांसह काँग्रेस फुटेल या काळजीने उदयसिंह गायकवाड यांनी ही पदे बदलली होती.
या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीची स्थापना झाली यात कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला १२ पैकी ५ आमदार मिळाले. राष्ट्रवादी सत्तेत आल्यावर जिल्ह्याला पुढल्या पाच वर्षांसाठी तीन मंत्रीपदे मिळाली. राष्ट्रवादी स्थापनेत कोल्हापूरचा मोलाचा वाटा आहे. शरद पवार यांनी त्याकाळी कोल्हापुरचाच विचार न करता पश्चिम महाराष्ट्राचा विचार करत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील तरूण नेत्यांना संधी देत त्या संधीचे सोने केले. त्याकाळी काँग्रेसचा मोठा दबदबा होता यात पश्चिम महाराष्ट्रात दिग्गज नेत्यांची चलती होती त्या तरूण नेतृत्वाला वाव पाहिजे होता. हीच संधी ओळखत शरद पवारांनी तरूण वर्गाला त्यांनी आकर्षीत केले याचाच परिभाग म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रात नेतृत्वात आताही पुढे असल्याचे दिसून येत आहे.