उंडाळे : पुढारी वृत्तसेवा
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा इतिहास पाहता 1989 नंतर अपवाद वगळता दर पाच वर्षांनी सातत्याने सत्तापरिवर्तन झाल्याचे दिसते. या संघर्षातूनच कृष्णेच्या सभासदाने आजपर्यंत सातत्याने कारखान्यात सत्तांतर घडवून आणले आहे. यातील पहिले सत्तांतर यशवंतराव मोहिते यांच्या उठावानंतर 1989 साली झाले होते.
स्व. यशवंतराव मोहिते यांनी 1980 ते 1985 या कालखंडात कराड लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेतील प्रतिनिधित्व केले. तत्पूर्वी, भाऊ सलग तीस वर्षे महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य व मंत्री होते. 1985 साली स्व.भाऊ राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी विधानसभा अथवा लोकसभेची एकही निवडणूक लढवणार नाही असे जाहीर केले. त्यांनी आपल्या मूळ रेठरे बुद्रुक गावी आपला मुक्काम हलवला. याच काळात 1955 सालापासून जयवंतराव भोसले हे कृष्णा कारखान्याच्या स्थापनेपासूनचे चेअरमन होते.
जयवंतराव भोसले हे यशवंतराव मोहिते यांचे सख्खे धाकटे बंधू. ही बंधू जोडी सर्व महाराष्ट्राला राम – लक्ष्मणाची जोडी म्हणून परिचित होती. जयवंतराव आप्पा यांनी कारखाना कारभार पहायचा आणि यशवंतराव मोहिते भाऊ यांनी राजकारण पहायचे असा अलिखीत करार कृष्णाकाठी होता.
परंतु, 1985 नंतर यशवंतराव मोहिते राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी कृष्णा कारखान्याच्या कारभाराकडे लक्ष घातले. कारखान्याच्या कारभारामध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत त्यांनी कृष्णाकाठी 1987 पासून रयत संघर्ष मंचच्या माध्यमातून कारखान्याच्या कारभाराविरोधात आवाज उठवला. इथूनच कृष्णा कारखान्याचा दोघा बंधूंमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला.
ज्येष्ठ विचारवंत व माजी मंत्री म्हणून राज्यात नाव लौकिक असलेल्या यशवंतराव मोहिते यांनी कृष्णा कारखान्याच्या लढ्यासाठी रयत संघर्ष मंचाची स्थापना केली. कारखान्याच्या पर्यायाने जयवंतराव भोसले यांच्याविरोधात लढा उभारला. जयवंतराव भोसले यांच्या भ्रष्टाचाराचा उचलून धरत यशवंतराव मोहिते यांनी भोसले यांच्याकडे ट्रक भरून पैसे आहेत असे सातत्याने सभासदांच्या मनावर बिंबवले. त्यामुळे सभासद भाऊंच्या पाठीशी उभा राहिले.
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील हा लढा महत्त्वपूर्ण ठरला होता. कारखान्याच्या माध्यमातून राज्यात राजकीय भाऊबंदकी उफाळून आली व ही भाऊबंदकी सातत्याने कृष्णेच्या निवडणुकीच्या राजकारणात दर पंचवार्षिक निवडणुकीत उफाळून येत होती.
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा इतिहास पाहता 1989 नंतर अपवाद वगळता दर पाच वर्षांनी सातत्याने सत्तापरिवर्तन झाल्याचे दिसते.
या संघर्षातूनच कृष्णेच्या सभासदाने आजपर्यंत सातत्याने सहा ते सातवेळा कारखान्यात सत्तांतर घडवून आणले आहे. यातील पहिले सत्तांतर यशवंतराव मोहिते यांच्या उठावानंतर 1989 साली झाले.
1989 साली सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांच्या 40 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावून कारखान्याचे नवे चेअरमन म्हणून यशवंतराव मोहिते यांनी आपले पुतणे मदनराव मोहिते यांना कारखान्याचे चेअरमन बनवले. मदनराव मोहिते यांनी त्यांच्या कारकीर्दीत चांगले काम केले.