सांगली : मामाच्या मुलीशी लग्न होऊनही दुसऱ्या मामाची मुलगी पळवणाऱ्या तरुणाचा निर्घृण खून! 

जत; पुढारी वृत्तसेवा : खिलारवाडी (ता. जत) येथील एका तरुणाचे मामाच्या मुलीशी लग्न झाले होते. परंतु त्याने दुसऱ्या मामाच्या मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून संबंधित तरुणाचे कर्नाटकात अपहरण करून दगडाने ठेचून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. 

नाना शिवाजी लोखंडे (वय २७, रा. खिलारवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जत पोलिसांनी तिघांना अटक केली असून यातील एकटा फरार आहे. सदरची घटना (तोरवी ता. विजापूर) हद्दीत तिकोटा ते विजापूर जवळील नेटीकट्टी ओढ्याच्या पुलाजवळ घडली. गुंतागुंतीचा व क्लिष्ट खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

खून केल्याप्रकरणी अर्जुन महादेव शिंदे (वय ४०, रा. अभिनंदन कॉलनी सांगली) जगन्नाथ बाळासो लोखंडे (वय २३, रा. खिलारवाडी) विनायक बाळासाहेब शिंगाडे (वय २१, रा.सुभाषनगर ता. मिरज) या तिघांना अटक केली आहे. यातील संशयित आरोपी रावसाहेब लक्ष्मण लोखंडे (रा. सुभाषनगर) हा फरार आहे. या चौघांवर अपहरण करून खून केल्याचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नाना शिवाजी लोखंडे यास चार मामा होते .यातील एका मामाने सेंट्रींग कामावर देखरेख करण्यासाठी सांगलीला नेले होते व नानाचे लग्न ४ वर्षांपूर्वी स्वतःच्या मुलीशी लावून दिले होते. मयत नानाचे आपल्या सर्व मामाशी घरगुती संबंध होते. यातील एका मामाच्या मुलीला कॉलेजला ने-आण करत होता. याचा गैरफायदा घेत नानाने १ वर्षापूर्वी अर्जुन महादेव शिंदे या मामाच्या मुलीस पळवून नेले होते. 

त्यानंतर दोघांनाही घरी आणण्यात आले होते. यावेळी नानाला मारहाण केली होती व सांगलीतून हाकलून दिले होते. आपल्या मूळगावी खिलारवाडी येथे नाना राहायला आला होता. तरीही नाना संबंधित मुलीला व्हाट्सअप वरून चॅटिंग व कॉल करत होता. ही माहिती अर्जुन शिंदे या मामाला समजली होती. या कारणावरून दोघात फोनवरून बाचाबाची झाली होती एकमेकास बघून घेण्याची धमकी देखील दिली होती. मंगळवार दि.२२ रोजी रात्री खिलारवाडी येथून आठ वाजण्याच्या सुमारास नानाला चार चाकी गाडीत घालून अपहरण करण्यात आले होते. याबाबत मयत नानाचा भाऊ धानु शिवाजी लोखडे यांनी भावाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याबाबत जत पोलिसात तक्रार दाखल केली होती. 

मोबाईल लोकेशनवरून झाला खुनाचा उलगडा 

पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासासाठी पथके रवाना केली. आरोपींनी कोणताही पुरावा न ठेवल्याने सदरचा गुन्हा उघडकीस आणणे हे पोलीसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान केली. मयत नाना लोखंडे यांचे लोकेशन तपासले असता तोरवी (ता. विजापूर )गावचे हद्दीत दिसून आले. विजापूर पासून सहा किलोमीटर अंतरावर ओढा आहे. तेथे नाना लोखंडेचा मृतदेह मंगळवारी मिळून आला. 

पोलिसांनी मयत नानाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांना नानाचे मामाशी वाद झाल्याची कुणकुण होती यावरून पोलीसानी संशयितांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता खून केल्याची कबुली दिली आहे. सदरचा तपास पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अप्पासाहेब कोळी , सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश मोहीते, संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक युवराज घोडके, पोलीस नाईक बजरंग थोरात, सचिन ढाके,उमर फकीर, अमोल चव्हाण, प्रशांत गुरव, शरद शिंदे यांनी केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news