कुरनूर धरणावर परदेशी पक्ष्यांचे आगमन

Published on
Updated on

हंजगी : यशवंत पाटील

अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूरचे धरण आता दुर्मीळ पक्ष्यांच्या वास्तव्यासाठी पोषक ठरत चालले आहे. धरणावर अनेक दिवसांपासून दुर्मीळ आणि नामशेष होत चाललेल्या परदेशी पक्ष्यांचा वावर वाढत आहे. एशियन पाईड स्टर्लिंग, डोमेसियल क्रेन, ऑस्प्रे या जातीच्या दुर्मीळ परदेशी पक्ष्यांचे भर हिवाळ्यात कुरनूर धरणावर आगमन झाले आहे.

सोलापूर नेचर कॉन्झर्वेशन सर्कल  या निसर्ग संवर्धनासाठी अग्रेसर असणार्‍या संस्थेतर्फे 'बर्डमॅन' डॉ. सलीम अली यांच्या जयंतीचे औचित्य साधून अक्कलकोट तालुक्यातील  कुरनूर धरण क्षेत्रामध्ये पक्षीनिरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जे पक्षी आपल्याला शहरामध्ये आढळत नाहीत, असे कवडी मैना, करड्या डोक्याची मैना, गुलाबी मैना, गुलाबी चटक, माळ मुनिया, लालमुनिया, काळ्या डोक्याची मनोली, पांढर्‍या भुवयाचा बुलबुल, हळद्या, पाणकावळा, धोबी, नदी सुरय आदी दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन कुरनूर धरण क्षेत्रामध्ये झाले. सोलापुरातील होटगी, हिप्परगा इ. तलावांपेक्षाही कुरनूर धरण परिक्षेत्राचे आवार मोठे असल्याने या परिसरामध्ये मुबलक प्रमाणात जैवविविधता आढळते. त्यामुळे हा भाग सुजलाम् सुफलाम असल्याने हे दुर्मीळ पक्षी याठिकाणी आढळून आले. 

'बर्डमॅन' डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त नेचर  कॉन्झर्वेशनकडून  कुरनूर धरणावर पक्षी निरीक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षीप्रेमींनी या भागाचे निरीक्षण केले. यामध्ये जवळपास 90 प्रकारच्या पक्ष्यांचे दर्शन झाले. वास्तविक हिवाळ्यामध्ये परदेशी पाहुणे पक्ष्यांचे  आगमन सोलापूर जिल्ह्यात होत आहे. यावर्षी भरपूर प्रमाणात पक्ष्यांचे आगमन झाले आहे. ऑस्प्रे हा शिकारी पक्षीदेखील कुरनूर धरणावर पोहोचला असून त्याचे आवडते खाद्य मासे आहेत. हा एक विश्वव्यापी पक्षी असून याचे प्रजनन केवळ अमेरिकेतील भौगोलिक परिस्थितीत होते. वास्तविक हा पक्षी आपल्याकडे जास्त प्रमाणात आढळत नाही. या अगोदर सलग तीन वर्षे कुरनूर धरणावर आढळत आहे. यावर्षी परत आलेला असून याचे वास्तव्य वाढत चालल्याचे आढळून आले आहे.

धरण परिसरातील जुन्या बावकरवाडी गावातील पडकी घरे, आजूबाजूच्या शेतात मिळणारे खाद्य, धरणाची पोषक अशी भौगोलिक परिस्थिती आणि व्याप्त स्वरूपातील मैदानी प्रदेशांमुळे कुरनूरचे धरण अलीकडच्या काही वर्षांत दुर्मीळ पक्ष्यांसह नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्यांचे माहेरघर बनत चालले आहे.

पक्षी निरीक्षण केल्यानंतर सदस्यांनी धरण परिसराची स्वच्छता केली. यावेळी नेचर कॉन्झर्वेशनचे भरत छेडा, शिवानंद हिरेमठ, नीलकंठ पाटील, सचिन पाटील, रत्नाकर हिरेमठ, विनायक दुधगी, संतोष धाकपाडे, अजित चौहान, तरुण जोशी, प्रतीक तलवाड, दाजी क्षीरसागर, सोमानंद डोके, महादेव कुंभार, अमोल मिस्कीन, बसवराज बिराजदार, आदित्य घाडगे, विनय गोटे, शुभम भागानगरे, गणेश बिराजदार, अजय हिरेमठ, सिद्धांत चौहान, राकेश धाकपाडे, माही जोशी, रुद्रप्रताप चौहान, प्राजक्ता धनशेट्टी आदी नव्या पिढीतील सदस्यांनीसुद्धा उत्साहाने यात सहभाग घेतला.

संपूर्ण अक्कलकोट तालुक्यासाठी वरदायिनी ठरलेल्या कुरनूर धरणाची भौतिक व भौगोलिक परिस्थिती समृद्ध आहे. यामुळेच येथे विविध जातींचे पक्षी, प्राणी वावर करतात. येथे पक्षी निरीक्षण केंद्रासह विविध गोष्टी साकारल्यास भविष्यात पर्यटनासाठी वाव मिळेल. पर्यायाने रोजगार निर्माण होऊन परिसरात सुजलाम् सुफलाम् होईल.यासाठी शासनदरबारी आवश्यक पाठपुरावा करेन.

– सचिन कल्याणशेट्टी, आमदार

कुरनूर धरण परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून मी निरीक्षणाचे काम करत आहे. अनेक वर्षांपासून याठिकाणी दुर्मीळ पक्ष्यांचे वास्तव्य वाढत चालले आहे, ही बाब लक्षात घेता याठिकाणी निरीक्षण केंद्र झाल्यास तालुक्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी फार मोठा फायदा होईल.

– शिवानंद हिरेमठ, पक्षी अभ्यासक, नेचर कॉन्झर्वेशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news