सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
एक कर्तृत्ववान, उत्तम प्रशासक, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. अहिल्यादेवी एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. संपूर्ण देशभरात त्यांचे महान कार्य अजरामर आहे. अहिल्यादेवी यांनी सोलापूर जिल्ह्यात निर्माण केलेल्या वास्तू, शिल्प, वाडा, बारवा, मंदिरांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून अभ्यास करण्यात येणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला रविवारी डॉ. फडणवीस यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या, सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यापीठात अहिल्यादेवी यांच्या नावाने अध्यासन केंद्राची निर्मिती होत आहे. अध्यासन केंद्र अंतर्गत अहिल्यादेवी यांच्या जीवनकार्यावर संशोधन व अभ्यास होणार आहे. यामुळे नव्या पिढीला अहिल्यादेवींचे आदर्श महान कार्य समजणार आहे त्यातून त्यांना एक नवी दिशा प्राप्त होणार आहे. याचबरोबर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारतीसमोर अहिल्यादेवी यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारणार आहे. याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
डॉ. फडणवीस म्हणाल्या, पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांनी सोलापूर जिल्ह्यात मोठे काम केले आहे, विशेषतः मंगळवेढा, सांगोला या भागात निर्मिती केलेल्या वास्तू, शिल्प, वाडा, बारवा, मंदिरे जीर्णोद्धारांचा अभ्यास व संशोधन केले जाणार आहे. पुरातत्वशास्त्र विभागप्रमुख डॉ. माया पाटील आणि इतर तज्ञ संशोधकांकडून याचा अभ्यास होणार आहे. विद्यापीठाकडून निर्मिती होत असलेल्या अध्यासन केंद्र व स्मारक येथे अहिल्यादेवी यांचे शिल्प, लँडस्केपमधून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला जाणार आहे.
अहिल्यादेवींचे कार्य सोलापूर वस्त्रोद्योगासाठी प्रेरणादायी
डॉ. फडणवीस म्हणाल्या, महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. अहिल्यादेवी यांनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले. कोष्टी वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. सोलापूरदेखील वस्त्रोद्योगनगरी म्हणून परिचित आहे. यामुळेच विद्यापीठाकडून हँडलूम युनिटची निर्मिती करून त्यासंदर्भात अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. विविध प्रकारचे हँडलूम प्रॉडक्ट्सची निर्मिती सध्या सुरू आहे. याचाच विस्तार करण्यासाठी प्रयत्न सुरू असून 'एमएसएमई'कडूनदेखील मदत घेण्यात येणार आहे.