‘नू-शि-नलिनी’तील नाफ्ता काढण्यासाठी कडक अटी

पणजी : प्रतिनिधी

दोनापावलाजवळ समुद्रात खडकावर अडकलेल्या 'नू-शि-नलिनी' जहाजातील नाफ्ता काढण्यासाठी नेमलेल्या सिंगापूरच्या 'पेट्रो स्टार' कंपनीला केंद्रीय 'डीजी शिपिंग'ने कडक अटी घातल्या आहेत. नाफ्ता स्थलांतर करताना गळती वा बाधा होऊन हानी झाल्यास त्यास कंपनी जबाबदार असल्याचे स्पष्ट कळविण्यात आले आहे. त्यामुळे नाफ्ता स्थलांतराबाबत बुधवारी 'जैसे थे' परिस्थिती निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

जहाजातील नाफ्ता हलविण्यासाठी विदेशातील तज्ज्ञ व अनुभवी कंपन्यांकडून अंदाजे खर्चाच्या बोली मागविल्या होत्या. सिंगापूर येथील दोन कंपन्यांनी बोली लावल्या आहेत. यातील  'पेट्रो स्टार' कंपनीला नाफ्ता सुरक्षितपणे हलविण्याचे कंत्राट देण्यात आले असले तरी या जोखमीच्या कामगिरीची राज्य सरकारने कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी मंगळवारीच पत्रकार परिषदेत समुद्रात अडकलेल्या 'नू-शि-नलिनी' जहाजातून नाफ्ता स्थलांतरविषयी सर्व जबाबदारीतून हात झटकले होते. नाफ्ता हलविण्यासाठी येणारा पूर्ण खर्च जहाजाचा मालक आणि एमपीटीकडून वसूल करावा व   राज्य सरकार याप्रकरणी एक पैसाही खर्च करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. 

जहाजाचा  मालक आणि एमपीटीने  जबाबदारी नाकारली तरच 'डीजी शिपिंग'ने सदर खर्च आणि जबाबदारी उचलावी, अशी सूचनाही सावंत यांनी केली होती. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार,  'डीजी शिपिंग'ने अशी कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार दर्शविला असून धोकादायक नाफ्ता हलविण्याआधी अटी मान्य कराव्यात, अशी जाचक अटक कंपनीला घातली आहे. त्यामुळे, सदर कंपनी पेचात सापडली असून यामधून मार्ग न निघाल्यास सदर कंपनीही कंत्राट सोडून देण्याची भीती व्यक्‍त होत आहे. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news