बाळासाहेब पाटील
नरवीर तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकताना प्राणांची आहुती दिली. त्यावेळी बलाढ्य गड स्वराज्यात आल्याचा आनंद आणि दुसरीकडे जीवलग सखा गमावल्याचे दु:ख छत्रपती शिवाजी महाराजांना झाले. कोंढाण्यावरून ज्यावेळी तानाजी मालुसरेंचे पार्थिव राजगडाखाली आणले तेव्हा छत्रपतींनी गळ्यातील कवड्यांची माळ अर्पण केली. आजही हा अनमोल दस्ताऐवज मालुसरे कुटुंबाने जीवापाड जपला आहे. मालुसरेची १२ वी पिढी आजही तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाच्या गाथेचे जतन करण्याचे काम करत असल्याचे मत डॉ. शीतल मालुसरे यांनी व्यक्त केले.
वाचा : नाशिक : बिबट्याच्या बछड्यासोबत सेल्फी काढणे पडले महागात!सातपुड्याच्या पायथ्याशी भव्य स्टॅच्यू ऑफ पीस!
तानाजी मालुसरे यांच्या ३५१ व्या पुण्यतिथीनिमित्त पुढारी ऑनलाईनशी त्यांनी खास बातचीत केली. या मुलाखतीत त्यांनी तानाजी मालुसरे यांच्यानंतर त्यांच्या १२ पिढ्यांच्या वाटचालीचा पट मांडला.
त्या म्हणाल्या, तानाजी मालुसरे यांच्यानंतरची सध्या आमची सध्या १२ वी पिढी आहे. माझे पती शिवराज मालुसरे हे १२ वे वंशज. तानाजी मालुसरे यांनी स्वराज्यासाठी प्राणार्पण केले. त्याचा आम्हाला अभिमान आहे. तो वसा आणि वारसा आजही आम्ही चालवतो. तानाजी मालुसरे यांनी रायबा मालुसरे यांच्या लग्नाचा विडा ठेवून कोंढाण्याचा विडा उचलला होता. शत्रूशी कोंढाण्यावर लढताना धारातीर्थी पडले पण गड सर केला. त्यांनतर त्यांचा मृतदेह मळेघाटातून उंबराटला आणला. तेथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तेथे जी समाधी आहे अग्निसमाधी आहे. दोन वर्षांपूर्वी सिंहगडावर जी समाधी शोधून काढली ती देहसमाधी आहे. तानाजी मालुसरे यांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी रायबा मालुसरेंचे लग्न लावून दिले आणि चंदगड तालुक्यातील पारगडची किल्लेदारी दिली. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला हा किल्ला स्वराज्यातील महत्त्वाचा किल्ला होता. जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोवर हा गड जागता ठेवा असा आदेश छत्रपतींनी दिला होता. तेव्हापासून आठव्या पिढीपर्यंत मालुसरे कुटुंबीय पारगडावर राहत होते. येसाजी, सूर्याजी, तानाजी अशा प्रत्येक पिढीगणिक मालुसरे यांचा पराक्रमाचा वारसा चालवत आले. मात्र, गडावर उपजिविकीचे कोणतेही साधन नसल्याने गड सोडावा लागला. अन्नधान्य, लाकूडफाटा खालून आणयला लागायचा. नाचणी आणि वरी पिकायची. घनदाट जंगल आणि अल्प साधने अशा प्रतिकूल वातावरणामुळे आणि बाहेरच्या जगाचा संपर्क आल्याने आठव्या पिढीनंतर बळवंत मालुसरे हे बेळगावला स्थायिक झाले. त्यांचा मुलगा नारायण मालुसरेंची दोन मुले तानाजी आणि बाळकृष्ण मालुसरे ही मुले तेथे स्थायिक झाली. बाळकृष्ण हे माझे सासरे. त्यांनी ५० वर्षे तानाजी मालुसरे आणि आमच्या घराण्याच्या इतिहासासंदर्भात संशोधन केले. तानाजी मालुसरे यांच्या वंशजांची इत्यंभूत माहिती काढली. इतिहास संशोधक दत्ताजी नलवडे यांनीही संशोधन केले. नलवडे यांनी केलेल्या संशोधनात तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव गोडवली. उंबरट ही त्यांची कर्मभूमी. तानाजी मालुसरे हे गोडवलीचे पाटील. यासंदर्भात अस्सल पत्र आजही उपलब्ध आहे. गोडवलीतील वाडा आजही आहे. तानाजी मालुसरेंचे वंशज तेथून उंबरठ आणि त्यांच्या निधनानंतर पारगडची किल्लेदारी रायबा यांच्यासह अन्य मावळे उंबरठहून पारगडला आले.
पारगडच्या किल्लेदारीसंदर्भात अस्सल सनद मिळाल्यानंतर हा सगळा इतिहास समोर आला. आजही आमच्याकडे छत्रपतींची कवड्यांची माळ, जवळपास २०० पत्रे , ब्रिटिशांनी दिलेल्या सनदा आदी आमच्याकडे उपलब्ध आहे.
वाचा : सातपुड्याच्या पायथ्याशी भव्य स्टॅच्यू ऑफ पीस!
पारगडावर अजूनही मावळ्यांचे वंशज
आजही गडावर तानाजी मालुसरे यांचे घर आहे, त्यात देवघर आहे. आम्ही कुटुंबीय माघी पौर्णिमा, शिवजयंती, दसरा, दिवाळी, गणेश चतुर्थीला गडावर जातो. ज्यावेळी रायबा मालुसरे यांना पारगडाची किल्लेदारी मिळाली त्यानंतर त्यांच्यासोबत उंबरटहून जवळपास ५०० मावळे तेथे आले. कुबल, भालेकर, मावळे, झेंडे, शिंदे, शेलार आदी कुटुंबं आजही तेथे आहेत. गडावर सध्या तीसहून अधिक घरे आहेत. छत्रपतींच्या सैन्यात अठरापगड जातीचे लोक होते तसाच पारगड होता. छत्रपतींनी गड ताब्यात देताना सांगितले होते की, जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत गड जागता ठेवा. हाच वसा या कुटुंबांनी चालविला आहे. या गडावरील मावळ्यांनी राजाराम महाराजांना, ताराराणींना मदत केली आहे. गडावर एक सतीची समाधी आहे. ही समाधी तोफखाना प्रमुख विठोजी मावळे यांच्या पत्नीची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली पारगडच्या किल्लेदारीची सनद, मोडी लिपीतील पत्रे आजही मालुसरे कुटुंबाकडे आहे.
पहा : एकाच पाषाणात निर्माण केलेली कोल्हापुरातील ही मंदिर तुम्ही पाहिलीत का? Scenic Monolith's in Kolhapur
कवड्यांची माळ जीवापाड जपलीय
कवड्यांची माळ ही राजमाळ आहे. तानाजी मालुसरे यांचे पार्थिव राजगडाच्या पायथ्याशी आणल्यानंतर छत्रपतींनी स्वत:च्या गळ्यातील कवड्यांची माळ काढून अर्पण केली. त्यानंतर रायबा मालुसरे यांच्या पत्नीने ही माळ अतिशय श्रद्धेने त्यांच्या दागिन्यांसोबत जपली. पुढे ही वंशपरंपरेंने आमच्याकडे आली. आजही हा अनमोल ठेवा अगदी जीवापाड जपला आहे. तानाजी मालुसरेंचा इतिहास माझ्या सासऱ्यांनी शोधून काढला. त्या कागदपत्रांचा अनुवाद करून त्याची सूची तयार केली आहे. मी कर्नाटक विद्यापीठाकडे पीएचडीसाठी नोंदणी केली. शिवशाही आणि नरवीर तानाजी मालुसरे हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. तानाजी मालुसरे यांची कोंढाण्याची लढाई माहीत आहे. मात्र, अन्य पराकम्र माहीत नाही. त्यामुळे या अप्रकाशित इतिहासावर आम्ही प्रकाश टाकला आहे.
सिनेमा प्रदर्शित होताना केली मदत
अजय देवगण याच्यावर चित्रीत झालेला 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' सिनेमा प्रदर्शित होताना कोळी समाजाने तानाजी मालुसरे हे कोळी समाजाचे असल्याचे सांगत सेन्सॉर बोर्डाकडे तक्रार केली आणि सिनेमाला स्थगिती मिळाली. त्यावेळी निर्मात्यांनी डॉ. शीतल मालुसरे यांना विनंती करून कागदपत्रे देण्याबाबत विनंती केली. त्यावेळी संशोधन करून मिळालेली कागदपत्रे, सनद आणि प्रकाशित पुस्तकाची कॉपी सेन्सॉर बोर्डाला सादर केली. त्यानंतर हा सिनेमा प्रदर्शित झाला.