गाेवा राज्यात लवकरच सोलर फेरीबोट सेवा

पणजी : विठ्ठल सुकडकर

राज्यात येणार्‍या पर्यटकांना आकर्षित  करून पर्यटनाला हातभार लागावा आणि प्रवाशी वाहतुकीतही मदत व्हावी, या हेतूने बंदर कप्तान खात्याने केरळच्या धर्तीवर  सोलर फेरीबोट सेवा नदी पात्रात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्वावर चार कोटी रुपये खर्चून एका सोलर फेरीबोटीची बांधणी करण्याचे कंत्राट दिवाडीतील अ‍ॅक्वेरियस शिपयार्ड कंपनीला दिले आहे. ऑक्टोेबरपर्यंत सोलर फेरीबोेट खात्याच्या ताब्यात मिळणार असून लवकरच मांडवी नदीत सुरू केली जाणार असल्याचे माहिती कप्तान जेम्स ब्रागांझा यांनी दिली. 

सरकारने सध्या अ‍ॅक्वेरियस शिपयार्ड कंपनीला एक सोलर फेरीबोट बांधणीची ऑर्डर दिली आहे. तरी सोलर फेरीबोटी सरकारी पर्यटन सेवेत उतरविण्याचे सरकारचे नियोजन आहे. टप्प्या-टप्प्याने आणखी सोलर फेरीबोटी आणून पर्यटन विकासात प्रगती करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. नंतरच्या काळात सोलर फेरीबोटी नदी परिवहनाच्या जलवाहतूक मार्गावर चालविण्याचे सरकारचे नियोजन असल्याचे कॅप्टन ब्रागांझा यांनी सांगितले.

या सोलर फेरीबोटी नदीच्या पात्रात इंधनाच्या ऐवजी  सौरऊर्जेवर चालणार आहेत. फेरीबोटीमध्ये  सौरऊर्जेबरोबरच  विद्युत यंत्रणाही असणार आहे. ज्यावेळी सौरऊर्जा नसेल, त्यावेळी फेरीबोटी विद्युत ऊर्जेवर चालणार आहेत. यामुळे सरकारचे हजारो लिटर इंधन व लाखो रुपयांचा खर्च वाचणार आहे. या  सौर फेरीबोटीतून प्रवाशांबरोबर दुचाकी व चारचाकी वाहनांनाही प्रवास करता येणार आहे. नदी परिवहन खात्याकडून प्रवाशांना मोफत प्रवास सेवा दिली जात आहे. तर दुचाकी व चारचाकी वाहनांना रू.10 व रु. 20 रुपये आकारले जात आहेत. या फेरीबोटीत 60 प्रवाशांची क्षमता असणार असे कप्तान ब्रागांझा यांनी सांगितले.

राज्यात एकूण 18 जलवाहतुकीचे मार्ग असून त्या जलमार्गांवर 34 फेरीबोटी प्रवाशांची वाहतूक करीत आहेत. तर  बंदर कप्तानकडे एकूण 38 फेरीबोटी असून चार फेरीबोटी नादुरूस्त आहेत. रायबंदर ते चोडण या जलमार्गावर नियमितपणे फेरीबोटींची जलवाहतूक सुरू आहे. या जलमार्गावरून जास्त प्रमाणात लोक फेरीबोटीतून प्रवास करीत असून पाच फेरीबोटी जलवाहतूक करीत असते. इतर ठिकाणी असलेल्या जलवाहतुकीच्या मार्गांवर दोन किंवा तीन फेरीबोटी प्रवाशांची वाहतूक करीत असते. ही एक  सौर फेरीबोट ताब्यात मिळाल्यानंतर प्रयोग म्हणून जलमार्गावर प्रवासी वाहतूक करणार आहे. यशस्वी ठरल्यास आणखी सोलर फेरीबोटींची मागणी केली जाणार असल्याचे ब्रागांझा यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news