पत्नी, दोन मुलींची हत्या करून तरुणाची आत्महत्या

पिलीव : वार्ताहर

माणुसकीला काळीमा फासणारी आणि हृदय पिळवटून टाकणारे हत्याकांड पिलीवजवळच्या सुळेवाडी हद्दीतील घाटात करण्यात आले. पतीने पत्नीस दगडाने ठेचून मारले, तर दोन कोवळ्या मुलींना एकाच दोरीने झाडाला गळफास दिल्यानंतर स्वतःही आत्महत्या केली. हा अमानुष प्रकार मंगळवारी उघडकीस आला. या कौटुंबिक वादातून घडलेल्या या घटनेचे वृत्त समजताच माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे. 

सुभाष शामराव अनुसे   (वय 28), पत्नी सौ. स्वाती सुभाष अनुसे (25), मुली ऋतुजा (9) आणि कविता ऊर्फ प्रणिता (8, सर्व रा. ऊंबरे-वेळापूर, ता. माळशिरस) अशी या हत्याकांडातील दुर्दैवी बळींची नावे आहेत.

दोन मुलींना एकाच दोरीने फास
मूळचा ऊंबरे येथील सुभाष शामराव अनुसे हा सुळेवाडी (ता. माळशिरस) येथील घाटात  पत्नी दोन मुलींना मोटारसायकलवरून घेऊन आला. सातारा-पंढरपूर रस्त्यालगत वन खात्याच्या हद्दीत त्याने पत्नी सौ. स्वातीची डोके ठेचून हत्या केली. तसेच ऋतुजा आणि कविता ऊर्फ प्रणिता या दोन कोवळ्या कळ्यांनाही अतिशय निर्दयतेने खूडून टाकले आहे. त्यानंतर लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा कयास आहे.

अंगावर शहारे आणणारे द‍ृश्य
 मृत स्वातीच्या शेजारी रक्‍ताने माखलेला दगड, छिन्‍नविच्छिन्‍न अवस्थेत मृतदेह पडल्याचे दिसून आला. तर दोन्ही मुलींना एकाच दोरीने एकाच झाडाला गळफास देऊन लटकवलेले दिसत होते. श्रीपूर येथील चंद्रशेखर विद्यालय येथे शिकणार्‍या दोन्ही मुलींचे मृतदेह शाळेच्या गणवेशात लटकत असल्याचे पाहून पोलिसांसह उपस्थितांना अश्रू आवरता आले नाहीत. 

सततच्या भांडणातून हत्याकांड
सौ. स्वाती अनुसे यांच्या वडिलांनी दिलेल्या माहिती नुसार, शेती करणार सुभाष अनुसे याचा पंधरा वर्षेपूर्वी सांगवी -कंरकब (ता पंढरपूर)  येथील बिरा आबा सोंलकर यांची मुलगी स्वाती हिच्याशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुली होत्या  सौ. स्वाती व सुभाष यांच्यात वारंवार भांडण होत असे. तीन वर्षी पूर्वी या भांडणाला कंटाळून ती माहेरी राहत होती. नुकतीच तर ती पतीच्या घरी नांदायला आली होती.  सुभाष अनुसे यास आई वडील, दोन भाऊ असून सोमवारी सुभाष, स्वाती ,ऋतुजा व प्रणिता हे घरातून अकलूज येथे दवाखान्याचे कारण सांगून मोटार सायकल वरून गेले होते.ते रात्री उशीरापर्यंत परत आले नाहीत म्हणून  सुभाषचे भाऊ तानाजी अनुसे यांनी अकलूज पोलिस स्टेशनलाची तक्रार नोंद केली होती. 

दरम्यान, सुळवाडी घाटातील  हत्याकांडाची माहिती पिलीव पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांना  मिळाली.   त्यांनी अकलूज पोलिस स्टेशनाला संपर्क साधून घटनेची व मयताची नावे याची खात्री केली. पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलिस निरीक्षक अरूण सांवत , उपनिरीक्षक संदिप पवार,  यांनी घडनास्थळी धाव घेऊन रीतसर पंचनामा करून मृतदेह शवविच्छदनासाठी माळशिरस येथे पाठविण्यात आले. या हत्याकांडाने माळशिरस तालुक्यासह संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातही खळबळ उडाली असून हळहळ व्यक्‍त होत आहे.

एकाच दोरीने, एकाच झाडाला मुलींना लटकवले
नराधम बापाने ऋतुजा आणि कविता या दोन्ही मुलींना एकाच दोरीने, एकाच झाडाला गळफास देऊन लटकवलेले दिसत होते. श्रीपूर येथील चंद्रशेखर विद्यालय येथे शिकणार्‍या दोन्हीही मुली शाळेच्या गणवेशात आल्या होत्या.

दवाखान्यात म्हणून चौघेही आले
अकलूज येथे दवाखान्यात जायचे म्हणून चौघेही मोटारसायकलवरून आले होते. मात्र, डोक्यात खुनाचे भूत सवार झालेल्या बापाने सगळ्यांना सुळेवाडीच्या घाटात आणले आणि मृत्यूच्या दरीत लोटले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news