पुलंनी, त्यांना आलेले विचित्र वाचकांचे अनुभव (काही खरे आणि काही काल्पनिक) अतिशय गमतीदार पद्धतीने सांगितले आहेत. त्याला त्यांनी नांवही अगदी मजेशीर दिलं, 'साहित्यभोग'. फेसबुकमुळे आपल्याकडे लाखोंच्या संख्येत लेखक,कवी, राजकीय विश्लेषक, साहित्य समीक्षक, सिनेमा समीक्षक, सामाजिक कार्यकर्ते, इत्यादी प्रकार उदयास आले आहेत. खासकरून लेखक आणि कवींची संख्या तर दिवसेंदिवस 'वाढता वाढता वाढे.." अशी आहे.
सोशल मीडियावर रोजच्या चालू घडामोडींवर काहीतरी विनोदी पद्दतीने पोस्ट्स करत राहिल्याने आमचीही इमेज केवळ विनोदी अशीच झाली आणि आम्हालाही पुलंनी रंगवलेल्या अनुभवांप्रमाणे असेच काहीसे मजेशीर अनुभव आले (अर्थात त्या अनुभवांना थोडी कल्पनेची आणि विनोदाची फोडणी दिलेली आहे). त्यातलेच हे दोन साहित्यभोग.
"तुम्हां विनोदी पोस्ट करणाऱ्यांना हार्टच नसतं मुळी"
"हार्ट नसतं ? कोणी सांगितलं हे तुम्हाला?
"सांगायला कशाला हवं..कोणीही ओळखेल..तुमच्या फेसबुकवरील पोस्ट्समधून"
"अहो हार्ट नाही म्हणताय? परवा मी 'तुझ्यात जीव रंगला' मधील राणादाच्या फॅमिलीचे आणि 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील राधिकाचे हाल बघून चक्क रडलो होतो..हसू येत होतं तरी रडलो होतो..म्हणे हार्ट नाही.."
"तेच तर …हसू येत असताना रडलात न ..म्हणून तर हार्ट नाही..आणि परवा तर कहर केलात तुम्ही"
"का? काय झालं?"
"इतके निष्पाप उंदीर मेले आणि तुम्ही चक्क त्यांच्यावर विनोदी पोस्ट करत राहिलात"
"अहोsss ते उपहासाने"
"काहीही बोलू नका हं, उपासाने उंदीर कसे मरतील, गोळ्या खाऊन मेलेत त्यें"
"त्यातली एखादी गोळी शिल्लक आहे का हो?"
"कशाला हो?"
"मी घेईन म्हणतो"
"इश्शss…काहीही हं..अहो तुम्हाला भूतदया वगैरे काही आहे कि नाही?"
"बरं..त्या मेलेल्या उंदरांची भुतं झाली कि त्यांच्यावर नाही विनोद करत..बास्स??
"कर्म माझं..तुम्हाला सामान्यज्ञान देखील नाहीय..अहो भूतदया म्हणजे प्राणीमात्रांवर दया"
"अहो..कोटी आहे"
"अहो पण उंदीर लाखांच्या संख्येत आहेत"
"मग?"
"उंदीर लाखोंच्या संख्येत असताना कोटी कोटी काय करता तुम्ही..निर्दयी आहेत गsssबाई हे एकदम निर्दयीss"
"बापरे…तुम्ही न्यूजचॅनेलमध्ये काम करता काहो?"
"इश्शss..नाही हो.. पण काही म्हणा तुम्हांला हार्ट नसतंच..हार्ट असतं ते फक्त कवी लोकांना"
"आता माझं बीपी वाढू लागलंय हो.."
"अय्या हो?? पाणी प्या.. पाणी प्या..फॅन सुरु करा.."
"पाणी कशाला ?विष द्या विष"
"अहो..मी चांगलीच विश करते हं तुमच्याबद्दल..पटकन बरं वाटेल तुम्हाला"
"अहो ..मला हार्ट नाहीय हे मान्य आहे मला.."
"हं आता कसं बोललात ..त्या तुमच्या लिस्ट मधल्या त्या हँडसम कवीला बघा किती हार्ट आहेत"
" ऑ? एकापेक्षा जास्त आहेत ?"
"हो तर ..मला मेसेंजर चॅटिंग करताना तो चारोळी सोबत सहा-सात वेगवेगळ्या रंगांचे हार्ट पाठवत असतो रोज "
"आपण नंतर बोलूयात का हो ?"
"का हो? का?"
"मला आमच्या घरातल्या उंदरांना कविता ऐकवायच्या आहेत.."
"ऑ?"
……………………………………………………………………………………
"माफ करा हं ..एक विचारायचं होतं.."
"गुन्हा तरी करा मग बघू माफीचं..ह्याह्याह्या"
"ऑ?..अं ..हो..तुम्ही माझ्या कविता वाचल्याहेत का?
"मलाच गुन्हा करायला सांगताहात की काय तुमच्या कविता वाचण्याचा? कोण तुम्ही?
"मला नाही ओळखत का?"
"का?"
"ऑ?.. का म्हणजे?
"का म्हणजे कशासाठी ओळखू?
"अहो ..अं..अं… म्हणजे मी कोण ते ओळखता का?
"माफ करा म्हणून सुरवात केलीय म्हणजे पुणेकर नक्की नाहीय. .अवतारावरून कवी वाटताय खरे"
"थ्यांक्यू हं ..दोन्ही कॉम्प्लिमेंट्स साठी.."
"राहूद्या ..कुठली कविता लिहिलीय तुम्ही.एखादी ऐकवा आता..तुमचं तरी समाधान होउदे."
"उंदीर मेले ओलेचिंब होऊनी…श्रावणातल्या संततधारेनी…"
"अरे बापरे …."
"का हो काय झालं?"
"प्रेम कविता आहे वाटतं."
"ऑ?..अं..अं..चालेल..चालेल.. प्रेम कविता म्हणून वाचलीत तरी चालेल."
"एकच लिहिलीय का कविता? कि अजून आहेत?
"असं कसं..एक कविता लिहून थांबेल तो कवी कसला?
"ठीक आहे..जस्ट विचारलं..वाचून नका दाखवू.."
"का?
"माफ नाही करणार मी ..पण तुमचं नांव नाही ऐकलं कुठेही"
"ऑ ..म्हणजे तुम्ही फेसबुकवर नाही?
"आहे कि ..नसायला काय झालंय"
"मग अहो.. तिथला फेमस कवी आहे मी.."
"हो का ?..आम्ही सामाजिक,वैचारिक, राजकीय पोस्टी वाचतो फक्त…"
"राजकीय कविताही लिहितो मी ..ही बघा .."
"राहूद्या माफ केलं.."
"कश्यासाठी?"
"काहीही गरज नसताना इतक्या कविता लिहिल्यात म्हणून.."
"ऑ??????
Tags : Social Media, Literature on Facebook, Blog, Interesting Post, Facebook Post Reaction