कोल्हापूरकरांच्या गनिमी काव्याने शिवरायांचा पुतळा रायगडावर विराजमान

Published on
Updated on

बाळासाहेब पाटील; पुढारी ऑनलाईन : रायगड आणि महाराष्ट्राचे नाते अतूट आहे. स्वराज्य स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून रायगडाचे पवित्र स्थान आजही प्रत्येक महाराष्ट्रवासीयांच्या मनात आहे. याच रायगडावरील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नसल्याने प्रत्येक शिवभक्ताच्या मनात खंत होती. अखेर प्रशासनाशी लढा देत २००९ ला मेघडंबरीत शिवरायांचा वीरासनातील पुतळा विराजमान केला आणि शिवभक्तांच्या आनंदाश्रूंना वाट मोकळी झाली. अनेकजण हर्षोल्हासाने रडू लागले. काहींनी नतमस्तक होत महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे मेघडंबरीत विराजमान होणे ही घटना रायगडच्या इतिहासातील महत्त्वाची घटना म्हणून नमूद केली गेली. कोल्हापूर ते रायगडावरील मेघडंबरीपर्यंतचा पुतळ्याचा प्रवास खूप रोमांचकारी होता.  

वाचा : किल्ले रायगडावर सापडले पुरातन सोने

मेघडंबरीलाही झाला होता प्रशासनाचा विरोध

छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आणि स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाचे महत्त्‍व अनन्य साधारण आहे. पूर्वेकडील जिब्राल्टर म्हणून या किल्ल्याचा अनेक परदेशी राज्यकर्ते आणि प्रवाशांनी उल्लेख केला आहे. बेलाग आणि दुर्गम असलेल्या या किल्ल्यावर मराठ्यांची राजधानी होती. वैभवात न्हालेला हा गड स्वराज्याचा मुकुटमणी होता. संभाजीमहाराजांना कैद झाल्यानंतर हा किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला. पुढे या गडावर अनेकांनी स्वाऱ्या केल्या. शेवटी इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतला.  तोफेने गड उद्‍ध्‍वस्‍त करण्‍याचा प्रयत्‍न केला. पुढे संशोधन होत गेले आणि किल्‍ले रायगडावरील सदर, सिंहासनाची जागा, मेघडंबरी आदीबाबत स्पष्टता येत गेली. सदरेवर मेघडंबरी बसविण्याबात चर्चा झाली मात्र, त्याला पुरातत्व विभागाने विरोध केला. अखेर १९८५ मध्ये तत्कालिन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते मेघडंबरीचं अनावरण केले. तेव्हा त्यात पुतळा नव्हता, तो नंतर बसवण्यात आला. कालांतराने तो पुतळाही तेथून हलविण्यात आला. तेव्हापासून अनेकदा पुतळा बसविण्याचा प्रयत्न केला मात्र तो प्रशासनाने प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. 

वाचा : रायगड रोप-वे सोळा दिवसांसाठी बंद, पर्यटकाकंची होणार गैरसोय!

शिवराज्याभिषेक सोहळ्यास परवानगी नाकारली

जून २००८ च्या शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा या इर्षेने शिवप्रेमी कामाला लागले; परंतु पंचधातूचा पुतळा तयार झाला नसल्याने फायबरचा पुतळा तयार केला. हा पुतळा १०० किलोचा होता. तत्कालिन केंद्रीय सांस्कृतिक व पर्यटनमंत्री अंबिका सोनी यांच्याशी संभाजीराजे चर्चा करण्यासाठी दिल्लीत होते. त्यांनी वारंवार विनंती करूनही सोनी यांनी संभाजीराजे यांची मागणी मान्य केली नाही. केंद्राने परवानगी दिली नसल्याने राज्य सरकारने शिवराज्याभिषेक सोहळ्यावरच बंदी घातली.

४ जून रोजी संभाजीराजे दिल्लीहून रायगडावर आले. त्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. मात्र, ती माहिती काहीजणांपुरतीच मर्यादित होती. सोहळा संपल्या संपल्या पोलिसांकडून अखिल भारतीय राज्याभिषेक सोहळा समितीला नोटीस बजावण्यात आली. त्यामुळे काही वेळात ही मूर्ती काढण्यात आली. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप होता. अनेकांनी नाराजी व्यक्त केली. अनेकांचे गैरसमजही झाले होते. मात्र, त्यानंतर समिती पुन्‍हा एकदा कामाला लागली.

सतीश घार्गेंनी अथक परिश्रमांनी तयार केला पुतळा

मेघडंबरीत पुतळा बसविण्याची मागणी २००५ पासून होत होती.मात्र, ती पूर्ण होत नव्हती. २००८ ज्या सोहळ्यानंतर काहीही झाले तरी पुतळा बसवायचाच या इर्षेने सर्वजण कामाला लागले. कोल्हापुरातील शिल्पकार सतीश घार्गे यांनी पुतळ्याच्या कामाला सुरुवात केली. घार्गे यांनी ऐतिहासिक संदर्भांचा आणि सिंहासनारुढ शिवपुतळ्यांचा अभ्यास केला.

काही ठिकाणी असलेले सिंहासनारुढ पुतळे युरोपियन पद्धतीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मुळात खुर्चीच्या पद्धतीने सिंहासनावर बसण्याची पद्धत शिवकाळात नव्हती. नेमकी पद्धत काय होती याचा अभ्यास करण्यासाठी घार्गे यांनी शिवपुत्र राजाराम महाराजांनी बांधलेल्या सिंधुदूर्ग येथील मंदिरातील शिवाजी महाराजांचे शिल्प, पन्हाळ्यावरील ताराबाई पुत्र शिवाजी महाराजांचे शिल्पे, ठिकठिकाणी देव्हाऱ्यांमध्ये असलेल्या टाकांचाही अभ्यास केला. तसेच ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इंद्रजित सावंत यांनी केलेल्या संशोधनानुसार मूर्तीचे काम सुरू झाले. वेळोवेळी बदल सुचवत गेले. संदर्भांचा अभ्यास करून, सिंहासन, राजचिन्हे आदींचा बारकाईने अभ्यास करून त्याचा वापर करत पुतळा करणे हे मोठे काम होते. आठ महिने हे काम सुरू होते. तीन भागांमध्ये हा पुतळा साकारण्‍यात आला. आसन, शिवाजी महाराजांची मूर्ती, तलवार आणि प्रभावळ असा जवळपास १३०० किलोंचा हा पुतळा बनविला. तो साकारत असताना इतिहास संशोकांच्या टीमसह संभाजीराजे छत्रपती यांचे बारीक लक्ष होते.

वाचा : तौक्‍तेने रायगडचे 600 कोटींचे नुकसान

पुतळा गडावर नेताना 'जय भवानी…जय शिवाजी' ही एकच उर्जा

३० मे रोजी कोल्हापुरातून सुरू झालेला पुतळ्याचा प्रवास ३ जून रोजी संपला. पायथ्यापासून राजसदरेपर्यंत हा पुतळा कसा घेवून जाणार, याची चिंता सर्वांना होती. अगदी दोन माणसे जातील, अशा चिंचोळ्या चित्तदरवाजाच्या चिंचोळ्या मार्गाने ही मूर्ती नेण्यास सुरुवात केली. सहाशे किलोचा सिंहासन चौथरा, साडेचारशे किलोची शिवमूर्ती आणि चिंचोळ्या रस्त्यावरून जाणे म्हणजे एकप्रकारची लढाईच होती. 

पोलिसांची चौकशी आणि चतुर कार्यकर्ते

२००८ मध्ये पुतळा बसविण्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. २००९ मध्ये मात्र चार दिवस पुतळा गडावर नेत असल्याने पोलिस प्रशासनाला माहिती मिळणे स्वाभाविक होते. त्यामुळे पोलिस पुतळ्याबाबत प्रत्येकाकडे चौकशी करत होते. त्यावेळीही कार्यकर्ते 'सोहळा झाला की पुतळा काढून नेणार' असेच सांगत होते. पोलिस तसे रिपोर्टिंग वरिष्ठांना करत होते. त्यामुळे प्रशासन गाफील होते.

होळीच्या माळावर प्रचंड आतषबाजी

प्रत्यक्षात पाच जून रोजी सायंकाळी पुतळा राजसदरेवर आणला आणि सतीश घारगे यांच्यासह त्यांचे सहकारी तो मेघडंबरीत बसवू लागले तेव्हा होळीच्या माळावर प्रचंड आतषबाजी करण्यात आली. समितीचे दीडदोनशे कार्यकर्ते सदरेवर  गर्दी करून उभे होते. पुतळ्याचे जोडकाम सुरू झाल्यानंतर या कार्यकर्त्यानी भोवतीकडे करून उगाच गोंधळाचे वातावरण तयार केले. आतषबाजी आणि या गोंधळामुळे नेमके काय सुरूआहे ते कुणालाच काही कळेना. दोन-तीन तासांमध्‍ये पुतळा मेघडंबरीत बसला आणि मोहीम फत्ते झाली. त्यानंतर झालेला जल्लोष हा शब्दातीत होता. 

अनेकांच्या खाद्याला जखमा… काहींची पायाची बोटे फुटली

या मोहितेत सहभागी झालेले सत्यजित आवटे म्हणाले, ' पुतळा गडावर घेवून जाण्‍यासाठी आमच्याकडे मोठे एच अँगल होते.आम्‍ही पुतळा पालखीत बंदिस्त केला. सपाट जागेत तो खाद्यावरून नेला तर पायऱ्यांच्या जागेत एच अँगलवर ठेवून दोरीने ओढण्‍याची कसरत करावी लागली. यामध्‍ये अनेकांच्या खाद्याला जखमा झाल्या, पायाची बोटे फुटली, पोटातील वाट सरकून ओकाऱ्या येऊ लागल्या. पाठीच्या मणक्याला दुखापती झाल्या; पण कार्यकर्ते मागे हटले नाहीत. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुतळा गडावर नेण्यासाठी लोडिंग अपलोडिंग करणाऱ्या कंपनीला पुतळा रायगडावर चढविण्याचे टेंडर दिले होते. त्या कंपनीने पुतळा आणि रायगडाची पाहणी केली. कालांतराने या कंपनीने ॲडव्हान्स म्हणून घेतलेले लाखभर रुपये परत दिले. नंतर ती कंपनी संपर्कातच राहिली नाही. चिंचोळी वाट, एका बाजुला खोल दरी आणि दुसरीकडे कातीव कडे अशा प्रतिकूल परिस्थिीत हा पुतळा गडावर नेणे म्हणजे मोठे काम होते. चार पाचशे मीटर दिवसभरात अंतर कापून व्हायचे. दमछाक झाली की तेथेच विश्रांती घ्यायची आणि जेवून मूर्तीशेजारीच सर्वजण झोपी जायचे आणि पुन्हा पहाटे आमची मोहीम सुरू व्हायची. चार दिवस आम्ही असे करत होतो. चौथ्या दिवशी होळीच्या माळावर ४ तारखेला पुतळा पोहाचला. त्यावेळचा जल्लोष आणि रोमांच आजही विसरू शकत नाही. आपण काहीतरी आहोत ही तीव्र भावना मनात उमटली. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आमचे हे काम पुढच्या पिढ्या कायम लक्षात ठेवतील. यापेक्षाही मराठ्यांच्या राजधानीत महाराजांचा पुतळा बसला ही भावना अन्य कुठल्याही आनंदापेक्षा मोठी होती. पुतळा चढविताना खांद्याला झालेल्या जखमा शिवप्रेमी विसरून गेले.  हा पुतळा सदरेवर बसविण्यात आल्यानंतर शिवप्रेमींनी जल्लोष केला तो अभूतपूर्व होता. हा पुतळा बसेपर्यंत प्रशासनाला कुणकूण लागली नव्हती. हा पुतळाही काढून घेतील असे त्यांना वाटले होते. मात्र, मुळात हा पुतळा टनभर वजनाचा असल्याने आता तो प्रशासनालाही हलविणे अवघड झाले होते.'

या पुतळ्याचे काम करणारे शिल्पकार सतीश घारगे म्हणाले, 'हे फार मोठे काम होते, ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. ही संधी होती. की महाराजांचे एक चांगले शिल्प बनवावे असे एक स्वप्न पाहिले होते. पण ज्या जागेवर महाराजांचा राज्याभिषेक झाला त्या जागेवर मी तयार केलेले शिल्प बसेल याची कल्पनाही केली नव्हती. पण ती संधी मला मिळाली. हा आनंद मी शब्दातही व्यक्त करू शकता नाही. ज्या दिवशी पुतळा सदरेवर बसला तो क्षण अविस्मरणीय होता. इतके दिवस मेघडंबरी पुतळ्याविना होती. ती मेघडंबरी भरून पावली होती. शिवभक्त अक्षरश: रडत होते. सर्वांचे डोळे पाण्याने भरले होते. हा क्षण अविस्मरणीयच होता. मंदिर होते पण त्यात देव नव्हता ही भावना अनेकांच्या मनाला खात होती ती भावना भरून पावली होती. लोक अक्षरश: रडत होते. रायगडावरील सदरेवर गेला की तुम्ही सर्वकाही विसरून जाता, आपण शून्य होतो. तनमन धन केवळ आणि केवळ शिवाजी महाराज होते. रायगडावर दगड धोंडे, बुरुज तेच आहे पण सदरेवरील वातावरण वेगळेच असते. ते दरवेळी नवे काही शिकवत असते.' 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news