अंबेजोगाई : प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरातील स्वाराती रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये दररोज शंभरच्या पुढे पॉझिटिव्हचा आकडा वाढत असताना मृत्यूचा दर देखील झपाट्याने वाढत आहे. स्वाराती रुग्णालयातील सात व लोखंडीच्या कोविड सेंटरमधील एक अशा एकूण आठ कोविड रुग्णांच्या मृतदेहावर नगरपालिका प्रशासनाने मांडवा रोडवरील स्मशानभूमीत एकाच सरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
वाचा : आमदार प्रताप सरनाईक यांच्या बिल्डर मित्राला अटक; ईडीची कारवाई
अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालय व लोखंडीच्या कोविड सेंटरमध्ये परळी, केज, धारूर, गंगाखेड, माजलगाव आदी तालुक्यातील रुग्ण कोरोनावरील उपचारासाठी येतात. कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण हे उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार असे ६० ते ८० वयोगटातील रुग्ण उपचारासाठी येत असल्याने हे सर्व रुग्ण अंगावर आजार काढून जास्त झाल्यानंतरच रुग्णालय गाठतात त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढू लागली आहे.
वाचा : हे कसले निर्बंध? हा तर लॉकडाऊनच!
अंबाजोगाई तालुक्यात चार दिवसांमध्ये पाचशेच्या जवळपास रुग्ण पॉझिटिव्ह निघाले आहेत. तरीदेखील नागरिक अजूनही गंभीर नसल्याचे दिसून येते. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मृतांचे प्रमाण कमी असले तरी अंबाजोगाई हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. सोमवारी मंगळवार पेठ, भटगल्ली, बोरखेड (परळी), लोखणी दावारागाव, अंबलटेक, आपेगाव, मंगरूळ (माजलगाव) व धारूर या आठ गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा सोमवारी मृत्यू झाला. मृत पावलेल्या रुग्णावर मंगळवारी दुपारी पठाण मांडवा रस्त्यावरील पालिकने निर्माण केलेल्या कोविड रुग्णांच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी एकाच सरणावर आठ जणांना अंत्यसंस्कार करण्यात आले. यात एक महिला असून सर्व रुग्ण ६० वर्षांपुढील आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी जिल्हाधिकाऱ्यांनी आज कठोर निर्बंध लादलेले असतानाही नागरिक गंभीर नसल्याचे दिसून आले. नेहमी प्रमाणेच शहरातील मुख्य रस्ते गजबजलेले दिसून आले.
मंगळवारी दुपारी घाटनांदूर येथील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तिच्या पार्थिवावर उद्या बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शासनाच्या कठोर निर्बंधाचे पालन केले तर कोरोनाचा आकडा कमी होऊ शकतो असा दावा प्रशासनाने केला आहे.