भगवान दत्तात्रेय हे दैवत आणि दत्तसंप्रदाय यांचे अतिप्राचीनत्त्व प्रसिद्ध आहे. अत्री आणि अनसुया या अतिप्राचीन दाम्पत्याच्या पोटी परब्रह्म 'दत्त' या नावाने अवतीर्ण झाले. 'तीन नसून एकच आहे' असा 'अ-त्री' भाव तसेच असुयारहित (अनसुया) अवस्था निर्माण झाल्यावर परमेश्वराने जगाच्या कल्याणासाठी स्वतःचे 'दान' केले म्हणून 'दत्त' हे नामाभिधान मिळाले. मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोष काळी हा अवतार झाला आणि परंपरेने याच दिवशी श्रीदत्त जयंती सर्वत्र साजरी केली जात असते.
परमेश्वराचा हा अवतार 'गुरुदेव' या स्वरुपात आहे. आजही भगवान दत्तात्रेयांचा उल्लेख 'गुरुदेव दत्त' असाच केला जातो. प्राचीन काळापासूनच अनेक देव-देवतांपासून ते राजांपर्यंत आणि ऋषींपासून ते भिल्लांपर्यंत अनेकांना दत्तात्रेयांनी गुरुपदेश केल्याची वर्णने आहेत. गणेश, कार्तिकेय, परशुराम यांच्यासारख्या देवता व अवतारांपासून ते प्रल्हादासारख्या असुर राजापर्यंत तसेच दलादन, पिंगलनाग यांच्यासारख्या मुनींपासून ते दूरश्रवा भिल्लापर्यंत अनेकांचा दत्तगुरूंच्या शिष्यांमध्ये समावेश होतो. यदु, आयु, सहस्त्रार्जुन (कार्तवीर्य), अलर्क आदी राजेही दत्तगुरूंचे शिष्य होते. अनेक संप्रदायांचे आदिगुरू म्हणूनही दत्तात्रेय विख्यात आहेत. त्यापैकी अतिशय प्राचीन म्हणजेच पाच हजार वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या आनंद संप्रदायाचा समावेश होतो. आनंदप्रभू, सदानंद आणि हरिपादानंद या आनंद संप्रदायाच्या आद्य प्रवर्तकांना दत्तानुग्रह लाभला होता. आखाडा परंपरेचे श्रीरत्नयती, नाथसंप्रदायाचे मत्सेंद्रनाथ, महानुभाव पंथाचे चक्रपाणी आदी अनेक संप्रदायांच्या आद्य गुरूंना दत्तात्रेयांचा अनुग्रह मिळालेला होता. संत एकनाथांचे गुरू जनार्दनपंत हे दत्तानुग्रहित होते. समर्थ रामदास यांनाही माहुर व गिरनार येथे दत्तदर्शन झाले होते. विविध संप्रदायांच्या आद्यगुरूंच्या रुपात दत्तात्रेय असल्याने साहजिकच त्यांचे स्वरुप सर्व समन्वयात्मक झालेले आहे. मूळातच सृष्टीनाथ (ब्रह्मदेव), जगन्नाथ (विष्णू) आणि आदिनाथ (शंकर) या परब्रह्माच्या तीन रुपांमध्ये भेद नाही हे दर्शवण्यासाठीच त्यांचा अवतार झाला. एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले देव व असुर, परशुराम व सहस्त्रार्जुन वगैरेही दत्तगुरूंच्या एकाच कृपाछायेखाली आलेले होते. त्यामुळे आजही समन्वयाचे एक सुंदर प्रतीक म्हणूनही दत्तगुरूंकडे पाहिले जाते. मूळात आपली संस्कृतीच 'नेह नानास्ति किंचन' (किंचितही भेद नाही) असेच सांगणारी आहे. त्यावरूनही श्री दत्तावताराचे प्रयोजन सहज लक्षात येऊ शकते. दत्तात्रेयांचे अवतारही अनेक मानले जातात. योगीराज, अत्रिवरद असे सोळा अवतार मानण्याचीही परंपरा आहे. दत्तावतारी संत तर अनेक होऊन गेले आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंह सरस्वती यांचे चरित्र आपल्याला दत्तसंप्रदायातील विख्यात ग्रंथ असलेल्या 'गुरुचरित्र'मध्ये पाहायला मिळते. याशिवाय स्वामी समर्थ, माणिकप्रभू, श्रीकृष्ण सरस्वती, वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये स्वामी), शिरडीचे साईबाबा आदी अनेक महात्म्यांना दत्तावतारी म्हणूनच ओळखले जात असते. संपूर्ण भारत वर्षात दत्तगुरूंची अनेक ठिकाणे, मंदिरे आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि कर्नाटकात दत्तसंप्रदायाचा प्रसार अधिक झाला असेच दिसते. महाराष्ट्रातीलच माहुर हे ठिकाण दत्तगुरूंचे आद्य पीठ मानले जाते. श्रीपाद श्रीवल्लभांची लीलास्थळे असलेली पीठापूर व कुरवपूर, नृसिंह सरस्वतींची लीलास्थळे असलेली कारंजा, औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूरही दत्तभक्तांनी फुललेली असतात. सध्या तर दत्तभक्तांची संख्या अधिकाधिक प्रमाणात वाढतच असल्याचे दिसून येते. त्याबरोबरच सर्व संप्रदायांमधील समन्वय, ऐक्य, भेदभावरहीत वृत्तीही वाढावी अशीच अपेक्षा आहे. भगवान दत्तगुरूंच्या ज्ञानदानाचे, उपदेशांचे तेच खरे मर्म आहे. स्वतः दत्तगुरूंनी आपल्या निरीक्षणातून चोवीस गुरू करून त्यामधील मर्म, सार ग्रहण केले होते. संप्रदाय, पंथ कोणताही असला तरी सार ग्रहण करून, अंतर्यामी ऐक्याचे मर्म जाणून घेणे आवश्यक आहे, हेच दत्तगुरूंनी स्वतःच्या अशा चरित्रातूनही दाखवून दिले आहे. श्री दत्त जयंतीनिमित्त हे समन्वयाचे, ऐक्याचे महत्त्वही अधिक ठसावे!