'पंढरपूरची वारी' वारी कोण करतं… हा कोणाचा उपक्रम आहे किंवा कोणाच्या कार्यक्रमाचा हा भाग आहे, असे जर विचारले तर आपण सांगतो की, हा वारकरी संप्रदायाचा आचारधर्म आहे. वारकरी संप्रदाय म्हणजे अगदी संत बहिणाबाईंचा आधार घेऊन सांगायचे तर संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्यापासून सुरू होऊन त्यावर तुकोबांनी कळस चढवला.
'ज्ञानदेवे रचिला पाया, तुकोबा झालासे कळस' असं बहिणाबाईंनी सांगितलेलं आहे. तो संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय याचा मूळ अर्थच वारी करणार्या लोकांचा संप्रदाय. ज्या संप्रदायामध्ये वारीचा मुख्य आचारधर्म आहे आणि वारी ही मुख्य उपासनापद्धती आहे, असा हा संप्रदाय…
हा संप्रदाय महाराष्ट्रामध्ये गेली काही शतकं प्रचलित आहे. बहिणाबाई म्हणतात,
। ज्ञानदेवे रचिला पाया । उभारिले देवालया ॥ नामा तयाचा हा किंकर । तेणे केला हा विस्तार ।
। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत ॥ तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ॥
अशा वारकरी संप्रदायाचा इतिहास बहिणाबाई थोडक्यात सांगतात.
त्यात त्यांनी ज्ञानेश्वरमहाराजांनी पाया रचला असे म्हटले आहे. याचा अर्थ असा की, ज्ञानेश्वरमहाराजांनी वारकरी संप्रदायाची स्थापना केली. त्यांच्यापूर्वी तो संप्रदाय नव्हता, असा अर्थ घ्यायचा का? तर असा अर्थ नाही. वारकरी संप्रदाय हा ज्ञानेश्वरमहाराजांच्या अगोदरपासून काही शतकं तरी कमीत कमी अस्तित्वात होता. हे विद्वानांनी मान्य केलेलं आहे. त्यासाठीचे पुरावे आपल्याला मिळतील. ते वाङ्मयीन पुरावे आहेत, ते शिलालेखाच्यासंदर्भातील पुरावे आहेत. खुद्द ज्ञानेश्वरमहाराजांच्या समकालीन नामदेव महाराजांच्या ओव्या-अभंगांमध्ये पंढरीच्या वारीचे, पंढरी क्षेत्राचे, विठ्ठलाच्या महिम्याचे अनेक पुरावे आढळून येतील. वाटचाल करणार्या वारकर्यांचे अनेक अभंग त्यात सापडतील. हा संप्रदाय आणि ही वारी नावाची त्यांची प्रथा ही पूर्वीच्या काळापासून म्हणजे संत ज्ञानेश्वर-नामदेवमहाराजांच्या काळापासून ते रामदेवराव यादव यांच्या राज्याच्या अगोदरपासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे.
येथे महाराष्ट्र हा शब्द व्यापक घ्यायचा. आज ज्याला आपण कर्नाटक म्हणतो… त्या कर्नाटकाच्या आणि महाराष्ट्राच्या सीमा सतत लवचिक राहिलेल्या आहेत. आज जर आपण ज्याला उत्तर कर्नाटक म्हणू कदाचित तो त्यावेळेला दक्षिण महाराष्ट्र असेल किंवा आज आपण ज्याला दक्षिण महाराष्ट्र म्हणू कदाचित त्यावेळेला ते उत्तर कर्नाटक असेल. त्यामुळे वारकरी संप्रदायाचे विठ्ठल हे मुख्य दैवत जसे महाराष्ट्राच्या लोकांचे होते, तसेच ते कर्नाटकातल्या लोकांचेही होते. तसेच ते आंध्र प्रदेशातील लोकाचे दैवत होते. आजही हे चित्र आहे. अनेक विठ्ठल माऊलीचे भक्त तिकडून महाराष्ट्रात येतात. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातही अनेक मंदिरे आहेत.
तमिळनाडूमध्येसुद्धा आपल्याला अनेक विठ्ठलभक्त दिसतील. विठ्ठलाची मंदिरेही पाहायला मिळतील. दक्षिण भारतातील एक मुख्य दैवत आहे, असे आपण म्हणू शकतो. त्याचे मुख्य केंद्र महाराष्ट्र आहे आणि पंढरपूर आहे. हे पंढरपूरमधील विठ्ठल नावाचे दैवत केव्हापासून अस्तित्वात आहे, त्यासंबंधी विद्वानांमध्ये मतमतांतरे आहेत. त्याचा निर्णायक निकाल अजून लागलेला नाही. तो लागेल याची शक्यता कमी आहे. जेवढे विद्वान तेवढी त्यांची मते, असे साधारणपणे आपल्याला या क्षेत्रातील चित्र दिसते.
जेव्हा केव्हा विठ्ठल हे पंढरपुरात आले. ते कसे आले, यासंबंधी वारकरी संप्रदायाचे एक म्हणणे आहे. ते आपल्याला संतांच्या अभंगांमधून दिसेल. इतकेच नव्हे, तर शिलालेखाच्या माध्यमातूनही ते लक्षात येईल. विठ्ठल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून द्वारकेवरून पंढरीला येऊन कंबरेवर हात ठेवून विटेवर उभा राहिलेले कृष्णच आहेत.
विठ्ठल म्हणजे कृष्णच आहेत. ही धारणा, ही श्रद्धा वारकरी संप्रदायाची आहे, महाराष्ट्राची आहे. कोणी त्यांना आणले, ते कोणामुळे इथे आले, तर पुंडलिकांमुळे महाराष्ट्रात आले. पुंडलिक यांच्यासंबंधीच्या कथाही खूप प्रचलित आहेत. त्यातली सर्वमान्य असणारी कथा म्हणजे पुंडलिक हे पंढरीमध्ये आपल्या माता-पित्यांची सेवा करीत होते. ते चित्र पाहिले विठ्ठल-रुक्मिणी यांनी… म्हणजे श्रीकृष्ण यांनी पाहिले.
त्यांना असे वाटले की, या पुंडलिकांकडे आपण जायला पाहिजे, या चांगल्या कृत्याची दखल घेतली पाहिजे, म्हणून विठ्ठल म्हणजे श्रीकृष्ण पंढरपुरात आले. ते येथे आल्यानंतर पुंडलिक नेहमीप्रमाणे माता-पित्यांच्या सेवेत मग्न होते. विठ्ठल म्हणजे साक्षात् श्रीकृष्ण आपल्यासमोर उभे आहेत हे पुंडलिकांनी पाहिले. ते म्हणाले, इकडे कसे येणे झाले… विठ्ठल म्हणजेच श्रीकृष्ण पुंडलिकांना म्हणाले, मी तुमच्यासाठीच इथे आलो आहे. तुझ्या या सेवेवर प्रसन्न होऊन मी इथे आलो. तू मला सांग की, तुला काय पाहिजे?
ही फार महत्त्वाची कथा आहे. तिचे महत्त्व आजसुद्धा आहे. आपण आपल्या आई-वडिलांशी कसे वागावे, याच्यासंबंधीची ही एक कथा आहे. आज तर काही कारणांमुळे आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात होते. पुष्कळ वेळेला आपण पाहतो की, मुलं परदेशी निघून जातात. तिथून आई-वडिलांना पैसे पाठवतात. आई-वडील एकटे असतात. कोरोनाच्या काळात तर आई-वडिलांनी प्राण सोडले, पण मुलांना त्यांची भेट घेता आली नाही. परस्पर त्यांचा अंत्यसंस्कार करावा लागला.
अशा प्रकारच्या युगामध्ये पुंडलिक यांच्या कथेचे महत्त्व अधिक आहे की, त्यांनी आई-वडिलांची सेवा केली आणि साक्षात् परमात्मा पुढे आला, त्यांनी विचारले की तुला काय हवे आहे? त्यावर पुंडलिकांनी उत्तर दिले की, मला आता काही नकोय; पण एक काम करा ही माझी मातापित्यांची सेवा संपेपर्यंत इथेच राहा. म्हणून पुंडलिकांनी शेजारी पडलेली वीट विठ्ठल म्हणजेच कृष्ण यांच्यासमोर ठेवली. विटेवर त्यांना उभं केलं. तेही या विटेवर उभे राहिले. पुंडलिकांच्या मनात आले की, विठ्ठल म्हणजेच कृष्ण यांना नुसते असेच उभे ठेवण्यापेक्षा त्यांना काहीतरी काम द्यावे. म्हणूनच पुंडलिक म्हणाले, येथे जे जे भाविक येतील त्यांचा तुम्ही उद्धार करा. त्यांची लायकी पाहू नका. ते ज्ञानसंपन्न आहेत का? त्यांच्या मनात काय भक्तिभाव आहे का? अशांचासुद्धा तुम्ही उद्धार केला पाहिजे. ज्यांच्या अंगात पात्रता आहे, त्यांचा उद्धार आपोआप होतो, तुम्ही सर्वांचा उद्धार करा.
हे श्रीकृष्णाने मान्य केले. ते इथेच विटेवर उभे राहिले आणि तेव्हापासून त्यांचे ते रूप विठ्ठल या नावाने प्रचलित झाले. तर ही कथा पुंडलिकांची आहे. त्यामुळे सर्व संतांनी पुंडलिक यांच्यावर कौतुकाची उधळण केली आहे, त्यांच्याबद्दल ऋणभाव व्यक्त केलेले आहेत.
तुकाराममहाराज म्हणतात,
कारे पुंड्या मातलासी।
उभे केले विठ्ठलासी ।
ऐसा कैसा रे धीट । मागे भिरकाविली वीट ।
हे सर्व कौतुकाने म्हटलेलं आहे. ते म्हणतात, तू मातलास की काय, खुशाल देव इथे आला आणि त्याला विटेवर उभे केलेस.
॥ वैकुंठीचा देव आणिला भूतळा ।
धन्य तो आगळा पुंडलिक ॥
वैकुंठात असणारा श्रीकृष्ण परमात्मा.त्यांना भूतलावर आणला. ते कृष्ण असल्यामुळे ते द्वारकेमधून पंढरपुरात आले. तेही संतांच्या अभंगांमध्ये येते. तुकाराममहाराज म्हणतात, द्वारकेवरून भक्ताच्या शोधामध्ये म्हणजे पुंडलिकाच्या शोधात श्रीकृष्ण पंढरपुरात आले. म्हणून हे श्रेय पुंडलिकाला जाते.
म्हणून यादृष्टीने विचार केला तर वारकरी संप्रदाय किती जुना… वारकर्यांचे दैवत विठ्ठल. हे दैवत पंढरपुरात आल्यापासून वारकरी संप्रदाय खर्या अर्थाने सुरू झाला. दुसर्या बाजूने आपल्याला म्हणता येईल की, या संप्रदायाचे संस्थापक कोण ? जरी बहिणाबाई म्हणत असल्या की, ज्ञानदेवेे रचिला पाया. ते बरोबरच आहे; पण ज्याने विठ्ठलाला पंढरपुरात आणले त्यालाच आपण संस्थापक म्हणूयात की! कारण त्यांच्यामुळे विठ्ठल येथे आले. म्हणून राजारामशास्त्री भागवतांनी आपल्या पुस्तकातील एका लेखात फार चांगले लिहून ठेवलेले आहे.
ते असे म्हणतात की, या महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाचे जे तत्त्वज्ञान आहे हे संतांनी त्यांच्या ओव्यांमधून आणि अभंगांमधून मांडले. त्याला आपण पुंडलिकांचे दर्शन असे म्हणूयात. जशी परंपरेमध्ये सहा दर्शने आहेत, तसे हे पुंडलिकाचे सातवे दर्शन म्हणूयात. त्यातले मुख्य ग्रंथ कोणते तर भागवत म्हणतात की, ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा हे दोन मुख्य ग्रंथ आहेत. ते एकदा जवळ असले तर महाराष्ट्रातल्या लोकांना कशाचीही गरज नाही. न वेदांची, न शास्त्रांची, न पुराणांची, ना शंकराचार्यांच्या ग्रंथांची.
उत्तरकालीन सर्व तत्त्ववक्त्यांमध्ये शंकराचार्यांना मानले जाते. त्यांचा खूप मोठा मान आहे. त्यांनी संपूर्ण तत्त्वज्ञानातील वातावरणावर एवढा प्रभाव पाडला की, वेदांत म्हटल्यानंतर लोकांच्या डोळ्यापुढे आपोआप शंकराचार्यांचे वेदांत पुढे येते. जरी बाकीचे आचार्य होते… पण, लोकांच्या डोळ्यापुढे पटकन शंकराचार्यांचा विचार पुढे येतो. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे मोठे नाव होते. पण, त्यांच्याही त्या ग्रंथांची, त्यांच्या उपनिषद भाष्याची, ब्रह्मसूत्रावरील भाष्याची, त्यांच्या भगवद्गीतेवरील भाष्याची आम्हाला गरज नाही. आमचा धर्म, धर्म संप्रदाय हा वारकरी आहे, असे रामशास्त्री भागवत म्हणतात. हा वारकरी संप्रदाय पुंडलिकाचा संप्रदाय आहे. याचे प्रमुख दैवत म्हणजे पंढरपूरचे श्री विठ्ठल.
डॉ. सदानंद मोरे (लेखक माजी साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत; तसेच संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.)