भक्तराज पुंडिलक यामध्ये भक्त हा शब्द तुकाराम महाराज यांनी वापरलेला आहे. पुंडलिक भक्तराज आहे. त्याने वैकुंठीचे परब्रह्म भूतलावर आणले आहे आणि विटेवर उभे केले आहे. त्यामुळे आपण कायमस्वरूपी पुंडलिकाचे ऋणी आहोत. पुंडलिकाने विठ्ठलाला पंढरपूरला आणले, तिथे श्रीकृष्ण विठ्ठलाच्या रूपाने उभा राहिला. आता हे दैवत तर पंढरपुरातून आले. कुठलाही धर्म संप्रदाय जर धर्म संप्रदाय म्हणून उभा राहायचा असेल, त्याला धर्म संप्रदायाचा दर्जा लाभायचा असेल, प्रतिष्ठा मिळवायची असेल तर त्यासाठी तीन घटक लागतात. पहिला घटक म्हणजे दैवत, जे विठ्ठलाच्या रूपाने आपल्याला विटेवर उभे असल्याचे दिसून येते. विठ्ठलाच्या रूपाने श्रीकृष्ण तिथे उभा आहे. त्याचे नाव म्हणजे विठ्ठल….
तसे विठ्ठलाचे नाव वेदात सापडणार नाही. पुराणात सापडणार नाही. शास्त्रामध्येही सापडणार नाही. रामायण-महाभारतातही सापडणार नाही. एवढे पुरे आहे की, विठ्ठल हे धर्म संप्रदायाचे दैवत आहे.
आता त्या दैवताची एक वेगळी उपासना पद्धत आहे. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक दैवताची एक विशिष्ट उपासना पद्धत असते. काही उपासना सर्व देवतांना लागू पडतात. उपासना हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
श्री खंडेरायाची एक उपासना पद्धत आहे. तुळजापूरच्या भवानीमातेची एक उपासना पद्धत आहे. या विशिष्ट उपासना पद्धतींचे वेगवेगळे भाग असतात. विठ्ठल हे दैवत महाराष्ट्रात नव्याने आले. त्या विठ्ठलाची उपासना म्हणजे पंढरीची वारी.
विठ्ठलाचे गाव आहे म्हणजे पंढरपूर! त्या पंढरपुरात जाणे म्हणजे वारी, तर तिथे केव्हा जावे..? पंढरपुरात आपण केव्हाही जाऊ शकतो. त्याचा असा काही वेगळा नियम नाही. वारकरी संप्रदायही असे म्हणत नाही; पण विशिष्ट वेळेला जाणे याला एक वेगळे महत्त्व आहे. ही वेळ म्हणजे आषाढ शुद्ध एकादशी! म्हणून त्याला आषाढी एकादशी म्हणतात. आषाढी वारीएवढेच महत्त्व कार्तिक शुद्ध एकादशीच्या वारीलाही आहे. या वारीला अनेक लोक जातात. वारकरी संप्रदाय हा मुख्यत्वे करून महाराष्ट्रामधल्या खेडोपाडी पसरलेल्या शेतकर्यांचा, बहुजनांचा संप्रदाय होता आणि आहे. त्यामुळे त्यांच्या उपासना पद्धतीला तुम्ही कर्मकांड म्हणू नये; पण ते त्या अर्थाने कर्मकांड नाही. कारण, कर्मकांड हे काही केल्यानंतर फळ मिळावे, या उद्देशाने केले जाते आणि त्याचे फळ मिळते, असा आपला विश्वास असतो.
पंढरपूरच्या वारीचे फळ काय? पंढरपूरचा वारकरी वारी करण्याच्या मोबदल्यात काहीही मागत नाही. त्यांचे काही लौकिक, भौतिक मागणे असे काहीही नसते. तुम्ही पंढरीच्या विठ्ठलापर्यंत गेलात अन् तुम्ही त्याच्याकडे पाहिले, तर तुमच्या सर्व इच्छा गळून पडतात. त्यामुळे पंढरीच्या विठ्ठलाला कुठल्याही प्रकारचा नवस बोलला जात नाही. हे एक वेगळे दैवत आहे. त्यामुळे त्याची उपासना पद्धती ही वारी आहे.
वारी म्हणजे तुम्ही पंढरपुरात जाणे. काही लोकांना आषाढी एकादशीला वारी करणे शक्य होत नाही. हे सगळे शेतकर्यांच्या वेळापत्रकावर अवलंबून आहे. सामान्यपणे वारीचे प्रस्थान होते तेव्हा पाऊस पडलेला असतो. कधी पाऊस पडतो, तर कधी पडत नाही; पण एरव्ही तो नियमितपणे पडतो. पाऊस पडून शेतात वाफसा झाल्यानंतर शेतकरी पेरणी करतो. पेरणी करून झाल्यानंतर पीक खुरपायला येईपर्यंतचा जो काळ आहे तो वारीचा काळ आहे. त्यामुळे वारीला जाणार्या शेतकर्यांचे कामाचे तास कधीच वाया जात नाहीत. शेतकर्यांचे काम पाहूनच वारीची आखणी झालेली आहे.
आषाढी, कार्तिकी वारीला जायला जमणार नाही त्यांची सोय करून ठेवलेली आहे. एक चैत्र महिन्यातील वारी आणि एक माघ महिन्यातील वारी. वारकरी संप्रदायात तुम्ही जेव्हा प्रवेश करता तेव्हा जास्त काही कर्मकांड नसते. तेव्हा तुमच्याकडून ठरवून घेतले जाते की, तुम्ही कोणती वारी पत्कराल. कोणी सांगते की, मी आषाढी वारी करीन, कोणी म्हणते की मला कार्तिकी वारीला जायचे आहे. हे तेव्हा ठरवले जाते.
साधारणपणे आषाढीची वारी मुख्य म्हटली जाते, तर दुसरी वारी म्हणजे कार्तिकी वारी. आषाढी आणि कार्तिकी वारीत तसे फारसे अंतर नाही. मग, कोणी चैत्राची वारी, तर कोणी माघ वारी करतो. काही लोक तर असे आहेत की, ते प्रत्येक महिन्यात पंढरपूरला जातात. त्यांना महिन्याचे वारकरी असे आपण म्हणतो.
पंढरपूरला जाऊन विशिष्ट दिवशी तिथे थांबायचे अशी ते वारी करतात. मग, इतर क्षेत्राला ते जातात. कधी आळंदीला संत ज्ञानेश्वर महाराजांकडे जातात, तर कधी त्र्यंबकेश्वरला निवृत्तीनाथ महाराजांकडे जातात. सासवडला सोपानकाकांकडे जातात. हे ठरलेले असते. ही वारी म्हणजे महिन्याचीही असू शकते. महिन्याचे वारकरी नावाचे वारकरी असतात. त्यांची स्वतंत्र दिंडीही असते. वारी ही उपासना पद्धत आहे. वारी ही सहसा एकट्याने केली जात नाही. वारी करणार्यांच्या गटाला किंवा समूहाला दिंडी असे म्हटले जाते. वारकरी संप्रदायाचा सगळा परमार्थ हा सामूहिक परमार्थ असतो.
'एकमेका साहाय्य करू, अवघे धरू सुपंथ' हा तुकाराम महाराजांचा अभंग प्रसिद्ध आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारच्या आध्यात्मिक सहकार्याची प्रेरणा आहे. तुम्हाला परमात्म्याला शोधायचे आहे अन् तो सापडेल…तुमच्यामध्ये जर तेवढा भाव असेल, भक्ती असेल तर तो तुमच्या हाकेला ओ देईल, अशी श्रद्धा आहे; पण एकट्या माणसाच्या भावाच्या बळावर ते शक्य नाही. एकट्याने हे काम करण्यापेक्षा जर अनेक लोक एकत्र आले आणि सगळ्यांनी मिळून परमात्म्याला हाक मारली तर..! तुकाराम महाराज म्हणतात, एकट्याच्या भावामुळे परमात्मा सापडेल; पण त्याला खूप कालावधी लागेल. वैष्णवांचा मेळा एकत्र आला तर एका हाकेसरशी परमात्मा तुमच्या पुढे प्रकट होऊ शकेल.
म्हणून सामूहिक उपासना महत्त्वाची ठरते. वारकर्याचा मार्ग कुठे तरी डोंगरदर्यांत, अरण्यात, हिमालयात जाऊन एकट्याने साधना करण्याचा नाही. तो सामूहिक उपासना करण्याचा आहे. त्यामुळे तुकाराम महाराजांना म्हणावे लागले की,
॥ तुका पायां लागे । दान समुदाय मागे॥
सामुदायिक उपासनेला दिंडीत लोक जातात. जाताना कसे जातात, तर तुकाराम महाराज पुन्हा सांगतात,
नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळिया। तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे॥
गदारोळ करत, नाचत, गात, आनंदात वारकरी मंडळी जातात. म्हणून ही साधना नाहीये. वारी हा उत्सव आहे. आम्ही मनुष्य जन्माला आलो, वारकरी संप्रदायाचा अंगीकार केला आणि पंढरपूरला चाललो आहे. त्यात परमात्म्याच्या जवळ चाललो आहे, याचा उत्सव वारी आहे. म्हणून नाचायचे असते. गायचे असते. अशा प्रकारचा हा वारकरी संप्रदाय आहे. पंढरपूरला जाताना वारकरी एखाद्या ठिकाणी थांबतात, तिथे भजन गातात, तिथे त्यांचा जागर असतो, प्रवचने असतात, कीर्तनही असते. म्हणजे जाता जाता आसपासच्या लोकांचे प्रबोधन करण्याचे कामही त्यांच्याकडून होते, तर हे खूप महत्त्वाचे काम आहे. हा सामुदायिक प्रबोधनाचाही कार्यक्रम आहे.
हा जसा उत्सव आहे तसाच तो सामुदायिक प्रबोधनाचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे अभंगांचे धन आहे. ते कित्येक दिवस मौखिक परंपरेनं टिकून राहिले आहे. कित्येक वारकर्यांची गाथा पाठ असते. अभंग मुखोद्गत असतात. ज्ञानेश्वरी पाठ असते. माझे एक आजोबा होते. जयराम महाराज देहूकर असे त्यांचे नाव. पंढरपुरात त्यांचा मुक्काम असायचा. ते एका फडाचे चालक होते. त्यांचे एक वैशिष्ट्य होते की, त्यांनी गाथा पाठ केलीच शिवाय त्यांनी ती गाथा उलटी पाठ केली. ते तुका म्हणेपासून सुरुवात करायचे. पहिले चरण आधी न म्हणता शेवटचे चरण ते आधी म्हणायचे. संपूर्ण अशा प्रकारे त्यांची गाथा पाठ होती.
सांगायचे असे आहे की, हे भजन असते, अभंग असतात. हे अभंग वारकरी वारीला जाताना म्हणतात. ती सामुदायिक उपासना ठरते. त्याचबरोबर त्यानिमित्ताने प्रबोधन केले जाते. वारकर्यांच्या कीर्तनाच्या दोन प्रथा आहेत. सकाळी जे कीर्तन असते त्या कीर्तनाला फारशी गर्दी होत नाही, तर ते कीर्तन असते आत्मोद्धारासाठी. म्हणजे आपण आणि ईश्वर यांच्या संबंधांबद्दल ते असते. आपल्या अंत:करणातील अवस्था परमात्म्याला सांगायची. त्याच्याशी संवाद करायचा, असे असते, तर सायंकाळचे कीर्तन हे लोकोद्धाराचे असते. त्याला अनेक लोक येतात. त्यांना उपदेश करायचा असतो. असा आत्मोद्धार आणि आणि लोकोद्धार यांचा समन्वय साधणारा वारकरी संप्रदाय आहे. हा समन्वय साधण्याची रीत म्हणजे वारी..!
(लेखक माजी साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)