डॉ. सदानंद मोरे
(लेखक माजी साहित्य संमेलनाध्यक्ष आहेत
आणि संत साहित्याचे अभ्यासक आहेत.)
पंढरपूरच्या वारकर्यांची जी उपासना आहे, ती सामुदायिक उपासना आहे. धर्म संप्रदाय म्हणून प्रतिष्ठा लाभण्यासाठी दैवत असावं लागतं. उपासना पद्धत असावी लागते. वारकरी संप्रदायाचे दैवत श्री विठ्ठल आहे जे श्रीकृष्णाचे मूर्तीरूप आविष्कार आहे, अवतरण आहे. त्यांची एक उपासना पद्धत आहे जिला आपण वारी म्हणतो. वारी करणार्या लोकांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय!
वारी म्हणजे वारकर्यांचा मुख्य आचारधर्म आहे. वारकरी संप्रदायाला स्वतंत्र धर्म संप्रदायाचा दर्जा मिळाला का, या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हो…
एखाद्या धर्म संप्रदायाला स्वतःचा प्रमाण धर्मग्रंथ असावा लागतो. त्याला पवित्र मानले जाते. जसे ख्रिश्चन धर्मीयांचा 'बायबल' धर्मग्रंथ आहे. मुस्लीम धर्मीयांचा 'कुराण' हा धर्मग्रंथ आहे. शीख धर्मीयांचा 'गुरुग्रंथसाहिब' हा धर्मग्रंथ आहे. जगात वेगवेगळ्या धर्मपंथांचे असे प्रमाण ग्रंथ असतात. प्रमाण म्हणजे ज्या धर्मग्रंथावर आपली श्रद्धा असते. त्या ग्रंथातील लिहिलेले सर्वकाही खरे आहे, असे आपण मानतो.
जोपर्यंत प्रमाण ग्रंथ नाही तोपर्यंत त्या धर्मपंथाला स्वतंत्र धर्मपंथ असा दर्जा मिळत नाही. तो लोकधर्म म्हणून मानला जातो. त्या धर्माचे खूप उपासक असतात. आपल्याकडे अनेक देवी-देवता आहेत. त्यांचे उपासकही आहेत. त्यांची एक उपासना पद्धत आहे; पण त्यांचा धर्मग्रंथ स्वतंत्र नसल्यामुळे त्यांच्या धर्माला धर्मपंथ असा स्वतंत्र दर्जा मिळालेला नाही.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापर्यंत वारकरी संप्रदाय अशाच प्रकारचा लोकधर्म होता. त्यांच्या काळात वारकरी संप्रदायाला धर्मग्रंथ मिळाला. कोणता ग्रंथ? कोणी लिहिला? तर त्या ग्रंथाचे नाव म्हणजे 'ज्ञानेश्वरी'. तो ग्रंथ अर्थात कोणी लिहिला तर ज्ञानेश्वर महाराजांनी. त्यांनी हा ग्रंथ लिहिला म्हणून त्याला 'ज्ञानेश्वरी' म्हणतात. 'भावार्थदीपिका' असेही या ग्रंथाला वेगळे नाव आहे. हा ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला आणि तो त्या काळातल्या वारकर्यांनी धर्मग्रंथ म्हणून स्वीकारला. त्याला मान्यता दिली. या ग्रंथाला धर्मग्रंथ म्हणून मान्यता का मिळाली, त्याचे स्वरूप काय, हे पाहावे लागेल.
ज्ञानेश्वरी म्हणजे दुसरं-तिसरं काही नाही, तर भगवान श्रीकृष्ण यांनी कुरुक्षेत्रावर कौरव आणि पांडव यांचे सैनिक एकमेकांच्या समोर युद्धासाठी उभे ठाकलेले असताना जो उपदेश केला तो. अर्जुनाला ऐनवेळेला वाटले की, हे युद्ध करणे योग्य की अयोग्य आहे? हे तर आपलेच भाऊबंध आहेत, हे शत्रू नव्हेत, यांच्याशी कसं युद्ध करणार म्हणून अर्जुनाने मी युद्ध करीत नसल्याचे सांगितले.
अर्जुनाला उपदेश करून श्रीकृष्ण यांनी त्याला युद्धप्रवृत्त केलं आणि जो उपदेश केला त्याला आपण 'श्रीमद्भगवद्गीता' म्हणतो. ज्ञानेश्वर महाराजांनी याच ग्रंथाचा अर्थ मराठीत सांगायचे असे ठरविले. 'श्रीमद्भगवद्गीता' संस्कृत भाषेत आहे, श्लोकांमध्ये उपलब्ध आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी या ग्रंथाचा अर्थ मराठीमधून आणि ओव्यांच्या स्वरूपात सांगितला तो ग्रंथ म्हणजे 'ज्ञानेश्वरी'.
त्यामुळे मराठी भाषेला एक चांगला ग्रंथ मिळाला, एक काव्य मिळालं; पण तो वारकर्यांनी धर्मग्रंथ म्हणून का स्वीकारला, हा प्रश्न पडतो.
या ग्रंथाचे मूळ काय, तर हा श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला सांगितलेला उपदेश आहे. श्रीकृष्णावर आधारित हा ग्रंथ आहे आणि विठ्ठल म्हणजे श्रीकृष्णाचेच मूर्तीरूप अवतार आहे. त्यामुळे श्रीकृष्णाचा जो ग्रंथ ते विठ्ठलाचाच आहे. 'श्रीमद्भगवद्गीता' ही विठ्ठलाचीही आहे आणि विठ्ठल हे वारकर्यांचं दैवत आहे.
त्यामुळे धर्मग्रंथ म्हणून 'ज्ञानेश्वरी' स्वीकारायला कोणतीच अडचण वारकर्यांना नव्हती. उलट 'श्रीमद्भगवद्गीता' हा संस्कृत ग्रंथ वारकर्यांना मान्यच आहे. कारण, हा ग्रंथ श्रीकृष्ण यांचा आहे आणि श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतार आहेत. विठ्ठल हे श्रीकृष्णाचे अवतार आहे. त्यामुळे हा वैष्णवांचा संप्रदाय आहे, यात वाद होण्याचे कारण नाही. त्यांचा ग्रंथ जो संस्कृतमध्ये आहे, संस्कृत 13 व्या शतकामध्ये बहुतांश लोकांना कळतं नव्हतं. त्यांना 'श्रीमद्भगवद्गीता' कशी सांगायची, त्यांना हा ग्रंथ कळेल का? ज्यांना संस्कृत कळतं नव्हतं, तर तेच लोक वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते.
स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र अशा घटकांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आणि ब्राह्मण्यांचा अभिमान सोडलेल्या ब्राह्मणांचा तो संप्रदाय आहे. ब्राह्मण्यांचा अभिमान सोडलेल्या ब्राह्मणांचे सर्वात मोठे श्रेष्ठ पुरुष कोण होते, तर संत एकनाथ महाराज. असा हा वारकरी संप्रदाय आहे. यातले ब्राह्मण्य सोडलेले ब्राह्मण सोडले तर बाकीच्यांना कुणालाही संस्कृत येत नव्हते. म्हणून त्यांच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी 'श्रीमद्भगवद्गीता' ग्रंथाचा अर्थ मराठीमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपात लिहिला. तो वारकरी संप्रदायाने मान्य केला. अशाप्रकारे वारकरी संप्रदायाला दैवत आहे ते श्रीविठ्ठल, उपासना पद्धती आहे ती म्हणजे वारी आणि धर्मग्रंथ आहे तो म्हणजे 'ज्ञानेश्वरी'.
इथे वारकरी संप्रदाय अशाप्रकारे पूर्णत्वाला आला. बहिणाबाई असे म्हणतात की, ज्ञानदेवे रचिला पाया…' त्याचे कारण असे की, ज्ञानेश्वर महाराज यांच्यापासून वारकरी संप्रदायाचा इतिहास सुरू झाला. त्याच्यापूर्वी जे होतं पुंडलिक यांच्या काळापासून ते ज्ञानेश्वर महाराज यांच्यापर्यंत याला संप्रदायाचा पूर्व इतिहास म्हणायचा. ज्ञानेश्वर महाराज यांच्यापूर्वी धर्मग्रंथ नसल्यामुळे तो पूर्व इतिहास ठरतो. त्यांच्यापासून धर्मग्रंथ आल्यामुळे संप्रदायाचा खर्या अर्थाने इतिहास सुरू होतो. म्हणून बहिणाबाईंचे म्हणणेही बरोबर आहे. दैवत, उपासना पद्धत आणि धर्मग्रंथ अशाप्रकारे वारकरी संप्रदाय पूर्ण स्वरूपात दिसतो.
त्यामुळेच वारकर्यांच्या सर्व व्यवहाराचा आधार 'ज्ञानेश्वरी' आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन, उत्तरकालीन सर्व संतांनी ज्ञानेश्वर महाराज याचं वारंवार गुणगान केलेलं आहे. ज्ञानेश्वरीचं वारंवार गुणगान केलेलं आहे. आपल्याला देवी-देवतांची आरती होते महिती आहे. पण, बहिणाबाईंनी तर ज्ञानेश्वरीची आरती लिहिलेली आहे. एखाद्या ग्रंथाची आरती होणे हे कुतूहलाचे आहे. म्हणून वारकरी संप्रदायात ज्ञानेश्वरीला मोठे महत्त्व आहे. वारकरी पंढरपूरला जातात त्याला आपण वारी म्हणतो. एकत्र जातात म्हणून ही सामुदायिक उपासना आहे.
वारकरी हे वारीला एकट्याने जात नाहीत, तर त्यात काही लोक एकत्र येतात आणि एकत्र येऊन समूहाने जातात. त्या समूहाला म्हणतात दिंडी. दिंडी हे वारकरी संप्रदायाचे आणि वारीचे लहान स्वरूप आहे. ज्याच्या गळ्यात वीणा असते तो दिंडीचा प्रमुख असतो. तो दिंडीचा संचालक असतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे दिंडी चालते. तो वीणेकरी या नावाने ओळखला जातो. दिंडी हे नाव वीणेचे नाव आहे. दिंडी म्हणजे वीणा… ते सगळ्यात महत्त्वाचं असल्यामुळे लोक त्या समूहाला दिंडी या नावाने पुकारू लागले.
वारीला जाताना या दिंडीत अभंग म्हणतात, गाणं म्हणतात. त्या गाण्यात एक ताल असतो. तो ताल पकडण्यासाठी जे वाद्य असते ते म्हणजे मृदंग किंवा पखवाज. वारकर्यांचा विशिष्ट भजनी ठेका असतो. कीर्तनात ते विविध प्रकारच्या चाली म्हणतात. त्यासाठीचे वाद्य म्हणजे पखवाज किंवा मृदंग. एक वीणेकरी, एक पखवाज वाजवणारा दिंडीत असतो. दिंडीत एकच वीणेकरी असतो. पण, एकापेक्षा अधिक पखवाज वादक असू शकतात. दिंडीतील बाकीच्या लोकांच्या हातात एक वाद्य असतं ते म्हणजे टाळ. सर्व वारकरी विशिष्ट प्रकारचा ठेका जो पखवाजच्या ठेक्याला पूरक असतो तशा पद्धतीने टाळ वाजवतात.
'लावोनी मृदंग श्रुती टाळ घोष।
सेवू ब्रह्मरस आवडीने'
मृदंग, पखवाज आणि वीणा यात एक स्वर असतो. अशाप्रकारे पंढरीचे वारकरी जणू एक प्रकारचे नादब्रह्म उभं करतात. हे नादब्रह्म वारकर्यांच्या वाटचालीत दिसून येतं. अशी वारकर्यांची दिंडी पुढे जाते. चालती-बोलती ही वारकर्यांची दिंडी असते. कधी कधी एका व्यापक छत्राखाली अनेक दिंड्या एकत्र असतात. त्या व्यापक संघटनेला फड असे म्हणतात. पुष्कळशा दिंड्या कुठल्या तरी फडाशी संलग्न असतात. त्यांचं त्यांचं स्वतंत्र अस्तित्व असतं. परंतु, अनेक दिंड्या एका फडाखाली असतात. म्हणून फड ही संकल्पनाही महत्त्वाची आहे. ती संत नामदेव महाराज यांनी नावारूपाला आणली.
त्यांच्यापासून फड ही संकल्पना अस्तित्वात आली. कोणत्या दिवशी, कोणत्या गावात मुक्काम करायचा असा संपूर्ण फडाचा कार्यक्रम ठरलेला असतो. हे अतिशय काटेकोर ठरवलेलं असतं. ते प्राधान्याने पाळलं जातं. त्यामुळे फड ही संघटना अशाच प्रकारे महत्त्वाची आहे. तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या फडावर जो येतो, तो कधीच निराश होऊन परत जात नाही. त्याला एखादे निरुपण जरी कळले नाही, तरी तो निराश होऊन परत जात नाही. त्याला काहीतरी प्राप्त झालेलं असतं. एक समाधान म्हटलं, तर पुण्य मिळालेलं असतं.
तर असा हा फड असतो. असे हे वेगवेगळे फड आपापल्या दिंड्या घेऊन हे वारीत समाविष्ट झालेले असतात. काही दिंड्या या स्वतंत्र असतात. ज्या कुठल्याही फडाशी संलग्न नसतात. दिवसेंदिवस नवीन फड काढता येणं अवघड आहे. पण, दिंड्या निघतात. दरवर्षी दहा ते पंधरा वेगवेगळ्या नव्या दिंड्या वारीत सहभागी होतात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीत त्या सहभागी होण्यासाठी विचारतात. त्यांना याबाबत मान्यताही दिली जाते. त्याचीसुद्धा एक नियमावली आहे. जर तुम्ही सलग तीन वर्षे वारीत चाललात, तर आपल्याला त्या दिंडीचा क्रमांक मिळतो आणि मग बाकीचे नियम, शिस्त त्यांना कबूल असते. त्यामुळे ते दिंडीत सहभागी होऊ शकतात हे खूप महत्त्वाचे आहे.