पिंजर्‍यातील कुस्तीत किरण भगतची बाजी (व्हिडिओ)

Published on
Updated on

सांगली : प्रतिनिधी

सांगलीत झालेल्या लोखंडी पिंजराबंद ऐतिहासिक कुस्तीत उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत याने बेल्जियमचा मल्ल मनजितसिंग याला चितपट केले. कुस्तीप्रेमी महाराष्ट्र संघाच्या स्थापनेनिमित्त संस्थापक महाराष्ट्र चॅम्पियन मारुती जाधव यांच्या पुढाकाराने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर खचाखच गर्दीत ही नेत्रदीपक कुस्ती पार पडली. 'तुझ्यात जीव रंगला' फेम अभिनेता (राणादा) हार्दिक जोशी याची उपस्थिती खास आकर्षण होती.

देशात इतिहासजमा झालेली पिंजराबंद कुस्ती पहिल्यांदाच होत असल्याने राज्यभर चर्चेचा विषय होती. निकाली आणि जिंकणारा पैलवान पिंजर्‍याचे कुलूप काढून बाहेर येणार असा या कुस्तीचा निकष होता.
बेल्जियममध्ये सराव करणारा पंजाबचा 140 किलो वजनाचा मनजितसिंग आणि 105 किलो वजनाचा किरण भगत यांची कुस्ती तुल्यबळ होणार का? अशी चर्चा उपस्थितांत होती. सायंकाळी 8.30 च्या सुमारास मनजितसिंग व भगत यांच्यातील कुस्तीला  हार्दिक जोशी, मारुती गायकवाड यांनी पिंजर्‍याला कुलूप लावून कुस्तीला प्रारंभ केला. 

सुरुवातीला किरण भगतने मनजितसिंगच्या ताकदीचा अंदाज घेतला. दोनच मिनिटात एकलांगी डावावर किरणने मनजितसिंगला खाली घेतले. चपळाईने मनजितसिंगने सुटका करण्याचा प्रयत्न केला. परंतु लांग पकडून किरणने त्याला अक्षरश फिरवले. पुन्हा दोन मिनिटांनी मनजितसिंगने ताकदीच्या बळावर सुटका करून घेतली. पण कुस्तीच्या निकषानुसार मारुती जाधव यांनी मनजितसिंगला घुटण्यावर बसण्याची सुचना केली. त्यानुसार किरणने मानेवर घुटना लावत पुन्हा मनजितसिंगला लांग पकडून पट काढला. अवघ्या सात मिनिटांच्या या झटापटीत किरणने लांग पकडून मनजितला चितपट केले. किरण विजयी होताच उपस्थितांनी मैदानावर जल्लोष केला. 

यावेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे, महापौर हारुण शिकलगार, उपमहापौर गटाचे नेते नगरसेवक शेखर माने, राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, भारतीय कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष डी. आर. जाधव, माजी स्थायी सभापती हरिदास पाटील,  विज्ञान माने, रावसाहेब देसाई, ताजुद्दीन तांबोळी, उपायुक्‍त सुनील पवार, भीमराव माने आदी उपस्थित होते. 
 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news