वाळवा : पुढारी वृत्तसेवा
मूळचे पडवळवाडी (ता. वाळवा) येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव 'एव्हरेस्ट'वीर ठरले आहेत.त्यांनी पहिल्याच प्रयत्नात रविवारी हिमालयातील सर्वोच्च असे एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा बहुमान मिळविला.
संभाजी यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. 15 वर्षांपूर्वी ते पोलिस दलात भरती झाले. सुरुवातीपासूनच त्यांना गिर्यारोहणाची आवड होती. केवळ छंद म्हणून; नव्हे तर एव्हरेस्ट सर करायचे त्यांचे ध्येय होते. त्यासाठी त्यांनी पहिल्यापासूनच तयारी सुरू केली होती.
त्यासाठी त्यांनी पहिला टप्पा म्हणून शारीरिक क्षमता तपासणीसाठी एव्हरेस्ट बेस कॅम्पचे प्रशिक्षण पूर्ण केले. आणि मुंबईमधून दि. 6 एप्रिलला त्यांनी नेपाळमधील पायोनिअर अॅडव्हेंचर या गिर्यारोहक कंपनीमध्ये ते सहभागी झाले. या अॅडव्हेंचरमध्ये त्यांनी किलीमांजरो शिखर सर केले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.आपण एव्हरेस्ट सर करू शकतो असा आत्मविश्वास बाळगून त्यांनी तसेच प्रयत्न सुरू केले.
शुक्रवारी (दि. 21 मे) गिर्यारोहणासाठी वातावरण चांगले असल्याची माहिती हवामान खात्याकडून त्यांनी घेतली. आता काहीही करून एव्हरेस्ट सर करायचेच अशी इच्छा बाळगून त्यांनी प्रयाण सुरू केले. सुरूवातीला त्यांचा मार्गदर्शक शेर्पा आजारी पडल्याने मोहिमेत अडथळा आला.
प्रतिकूल हवामानामुळे शारीरिक आणि मानसिक कसोटी सुरू झाली. त्यातच बर्फवृष्टी, बर्फाळ धुके यांचाही त्रास होऊ लागला. मात्र त्यांनी जिद्द सोडली नाही. उणे 19 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असणार्या एव्हरेस्ट शिखरावर काठमांडूकडून चढायला त्यांनी सुरूवात केली. अनेक अडथळ्यांवर मात करीत त्यांनी दि. 17 मे रोजी बेस कॅम्प 2 पर्यंत, दि. 18 मे रोजी बेस कॅम्प 3, दि. 19 मे रोजी बेस कॅम्प 4 गाठले. दि. 20 मे रोजी एव्हरेस्ट शिखरासाठी चढाई सुरू केली. निसर्ग आणि वातावरणाने साथ दिल्यामुळे रविवारी (दि. 23) अखेर त्यांनी एव्हरेस्टवर तिरंगा फडकावून आनंद साजरा केला. त्यांनी महाराष्ट्र पोलिस दलाचे आणि वाळवा तालुक्यातील पडवळवाडी गावाचे नाव सार्थ केले. गावच्या सुपुत्राने एव्हरेस्ट शिखर सर केल्याचे वृत्त पडवळवाडीमध्ये येऊन पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी जल्लोष केला.
मुलाने नाव उज्ज्वल केले
एव्हरेस्ट सर करून मुलाने गावाचे, तालुक्याचे, जिल्ह्याचेच काय पण, महाराष्ट्राचे नाव उज्वल केले. त्याचा निश्चितच अभिमान वाटतो अशा भावना एव्हरेस्ट वीर संभाजी गुरव यांचे वडील नारायण गुरव यांनी दै. पुढारीशी बोलताना व्यक्त केल्या. मूळचे पडवळवाडी (ता. वाळवा) येथील व सध्या नवी मुंबई येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी गुरव यांनी कालच एव्हरेस्ट सर करून पोलिस दलाची मान उंचावली. सांगलीचे तत्कालिन पोलिस अधिक्षक सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोलिस कर्मचारी रफिक शेख यांनी यापूर्वी एव्हरेस्ट सर केले. त्यानंतर राज्यात संभाजी गुरव हे एव्हरेस्ट सर करणारे तिसरे पोलिस अधिकारी आहेत. ते म्हणाले,शालेय जीवनात त्याला ट्रेकिंगची आवड होती. गावाशेजारील येडेनिपाणीच्या मल्लिकार्जुन डोंगरावर तो सतत जात असे. निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये चांगलेच त्याने यश मिळविले होते. तर अंधश्रद्धा निर्मूलनातून प्रबोधन करीत होता. ते म्हणाले, मुंबई आणि परिसरातील मॅरेथॉन, सायकलिंग अशा अनेक स्पर्धा आजही तो जिंकतो. यामध्ये त्याची पत्नी सुजाता हिची चांगली साथ आहे. मंत्रालय लिपिक असणार्या सुजाता हिने संभाजीचे एव्हरेस्ट जिंकण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. पाच वर्षांची मुलगी आराध्या हिची व घरची काळजी ती घेते. पडवळवाडी गावाचे नाव महाराष्ट्रभर संभाजी याने उज्वल केले, अशा सदगदीत शब्दात त्यांचे मोठे बंधू शिवाजी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
एव्हरेस्ट सर करणारे संभाजी हे पोलिस दलातील तिसरे
सांगलीचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, औरंगाबाद येथील पोलिस कर्मचारी रफिक शेख यांनी यापूर्वी एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. त्यामुळे हे शिखर सर करणारे संभाजी गुरव हे तिसरे पोलिस कर्मचारी ठरले आहेत. संभाजी यांनी गडचिरोलीमध्ये असताना नक्षलवाद्यांच्या विरोधात केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल 2014 मध्ये राष्ट्रपती पदक, 2015 मध्ये विशेष सेवा पदक, 2018 मध्ये आंतरिक सेवा पदक व महासंचालकाचे विशेष पदक त्यांना मिळाले आहे.
माझा विजय आईस अर्पण…
रविवारी (दि. 23) सकाळी 6.30 वाजता जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट (सागर माथा) वर पोहोचलो. आणि तीन वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. खरे तर हे स्वप्न माझ्यासाठी वेदनादायक होते आणि राहील. माझ्या आईचे तीन वर्षांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यावेळी मला माझ्या आईचे आजारपण ओळखता आले नाही. ज्याचे शल्य माझ्या मनात आयुष्यभर राहील. माझ्या आईच्या निधनानंतर मी कोणताही विधी केला नाही. फक्त मनोमन एक संकल्प केला की मी असे स्वप्न पाहीन की जे पूर्ण करताना माझ्या शरीराला इतक्या वेदना होतील. जेणेकरून मला माझ्या आईच्या त्यागाची, तिच्या समर्पणाची, तिच्या मातृत्वाची पदोपदी आठवण राहील आणि तीच माझ्या आईस खरी श्रद्धांजली असेल. म्हणून खडतर जिवाची बाजी लावणारे असे स्वप्न पाहिले ते जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे आणि ते पूर्ण झाले. जगातील सर्वोच्च शिखर जरी सर केले तरी आईविना सर्वच शून्य. -संभाजी नारायण गुरव.
संभाजी गुरव झपाटलेला कमांडो…
संभाजी गुरव यांनी महाराष्ट्र पोलिस दलात इतिहास घडविला. गेली दोन वर्षे त्याची तयारी सुरू होती. 2018 मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण केला होता. आम्ही त्याच्यासोबत होतो. दक्षिण आफ्रिकेतील किलीमांजेरो हे शिखर त्याने सर केले होते. त्याची शारीरिक क्षमता अतिशय चांगली आहे. त्याचबरोबर तो जिद्दी आहे. कसल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याची त्याची क्षमता अफाट आहे. झपाटलेल्या कमांडोप्रमाणे तो दिलेले काम अतिशय धाडसाने करण्यात तरबेज आहे. गडचिरोलीसारख्या नक्षलवादी भागात त्याने केलेले काम निश्चितच कौतुकास्पद आहे. त्याच्या या कामगिरीबद्दलच त्याला राष्ट्रपती पदक मिळाले होते. तो अनेक स्पर्धामध्ये सहभागी होऊन यशस्वी होतो. त्यामुळे पोलिस दलाला त्याचा निश्चितच अभिमान वाटतो. सातत्याने केलेल्या कष्टामुळेच संभाजी एव्हरेस्ट वीर ठरला. महाराष्ट्र पोलिस दलाची त्याने मान उंचावली. -सूरज गुरव ( अप्पर पोलिस अधीक्षक, पुणे)