राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची घराणेशाही उलथवून टाका; अमित शहा

जत : शहर प्रतिनिधी

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक धाडसी निर्णय घेत देशात सुरक्षितता आणली तर देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या प्रमाणावर विकास करत महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर नेला. गेल्या १५ वर्षात महाराष्ट्रात आघाडी सरकारने राज्याला रसातळाला नेले. कोणताही विकास न करता भ्रष्ट कारभार केला. त्यांचा महाराष्ट्राततील गेल्या १५ वर्षातील विकासकामांचा लेखा-जोखा व शिवसेना-भाजप युतीच्या पाच वर्षातील केलेल्या कामाचा हिशोब मांडल्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेले काम दिसून येईल. असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. 

लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींना महाराष्ट्रात पुन्हा जनाधार मोठ्या प्रमाणावर मिळाला. राज्याच्या विकासासाठी  राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची  घराणेशाही उलथवून टाका. पंतप्रधान मोदी  व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करण्यासाठी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार विलासराव जगताप यांना बहुमतानी निवडून द्यावे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

महायुतीचे उमेदवार आमदार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या मैदानावरील आयोजित सभेत बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख,आमदार सुधीर गाडगीळ, सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख ,नीता केळकर, मकरंद देशपांडे, सुनिल पवार ,सरदार पाटील, मंगल नामद, रेखा बागेळी, सभापती सुशीला तावशी, अजितकुमार पाटील, शिवसेनेचे बजरंग पाटील, रिपाईचे संजय कांबळे ,अमृतानंद स्वामी, उमेश सावंत आदी उपस्थित होते.

 

अमित शहा यांनी भाषणाच्या सुरुवातीला जतचे आराध्य दैवत श्री यल्लामा देवी व दान्नम्मा देवीला वंदन करीत व क्रांतिकारी नाना पाटील यांना प्रणाम करीत भाषणास सुरुवात केल्याने उपस्थित लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कर्नाटकात भाजपची सत्ता असून येडीयुराप्पा मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बोलणे होऊन लवकरच जतच्या पूर्व भागासाठी तुबची-बबलेश्वर योजनेतून पाणी मिळेल असे शहा म्हणाले. 

गृहमंत्री शहा यांनी पंतप्रधान मोदी यांनी कलम३७० व तलाक हे विधेयक धाडसाने मंजूर केले. मात्र याच निर्णयाला काँगेस व राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध करत देशाच्या अखंडतेच्या जम्मू- काश्मीरच्या ३७० कलम रद्द करण्याचा विधेयकाला विरोध केला. आज हे कलम रद्द करून एक महिना झाला तरीसुद्धा काश्मीर खोऱ्यात शांतता आहे. केंद्रात व राज्यात १५ वर्षे सत्ता असणाऱ्या काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व शरद पवार यांनी काय केले ते सांगावे असे आवाहनही गृहमंत्री शहा यांनी करत तुमचे मिळणारे  पवित्र मत म्हणजे देशाच्या पंतप्रधान मोदींना  व मुख्यमंत्री फडणवीस यांना मिळणार असून मोठ्या मताधिक्याने आमदार जगताप यांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी आमदार विलासराव जगताप म्हणाले की, गेल्या २०१४च्या विधानसभा निवडणुकीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह प्रचारासाठी आले होते, त्यावेळी १७ हजार मतांनी आघाडी मिळून विजय झाला होता ,आता तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आले असल्याने निश्चितच आणखी मोठे मताधिक्य मिळून माझा विजय निश्चित आहे. मला मिळालेली उमेदवारी ही पक्षातून व जनतेच्या पाठींब्याने मिळाली आहे.

आता आमची एकच मागणी वंचित गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी. आ. जगताप

३५ वर्षापूर्वी जत तालुक्यात म्हैसाळ योजनेवर ३६८ कोटी रुपये खर्च झाले,तर माझ्या पाच वर्षांच्या काळात ३९२ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला. सेना-भाजप युती सरकारमुळे  तालुक्यात रस्त्यांची कोट्यवधी रुपयांची कामे होऊन गेल्या ७० वर्षातील बॅकलॉग भरून निघाला असून विजेचा प्रश्न, जलयुक्त शिवार योजना, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे आदी  कोटयवधी रुपयांची विकासकामे झालेली असून आता आमची एकच मागणी आहे,ती म्हणजे उर्वरित जत पूर्व भागाला पाणी मिळावे. या पूर्व भागातील ६५ गावांना पाणी मिळण्यासाठी ६०० कोटी रुपयांची योजना शासनाला सादर केली असून या योजनेला गृहमंत्री अमित शहा यांच्या माध्यमातून तातडीने मंजुरी मिळावी अशी मागणी आमदार जगताप यांनी हिंदी भाषेतून  केली.

भाजप प्रवेश

यावेळी भाजप प्रवेश खासदार पाटील, आमदार जगताप,यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.  माजी जिल्हा परिषद सदस्य चन्नाप्पा होर्तिकर, माजी सभापती आकाराम मासाळ, माजी जि. प.सदस्य कुंडलिक पाटील, लक्ष्मण जखगोंड, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव टोणे, उद्योगपती सतीश चव्हाण, उमदीचे फिरोज  मुल्ला, माजी उपसभापती  रेवापा लोणी, कुडनूरचे माजी सरपंच अज्ञान पांढरे, रामगोंडा कोळगीरी, मानसिध्द पुजारी आदी पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news