सर्वच पक्षांना बंडाचे ग्रहण; युतीत 52, आघाडीत आठ ठिकाणी बंडाळी

Published on
Updated on

मुंबई : उदय तानपाठक

शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांना बंडखोरीची लागण मोठ्या प्रमाणात झाली असून, अधिकृत उमेदवारांविरोधातच या बंडोबांनी अर्ज भरून ठेवले आहेत. दोन दिवसांत बंड मागे घ्या, असा सज्जड दमच मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे या बंडखोरांना भरला आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी नेत्यांचे संयुक्‍त पथकच तयार केले असून, या नेत्यांवर बंडोबांना थंड करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. काही ठिकाणी युतीमधील असंतुष्ट बंडखोरांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे किंवा पाठिंबा दिला आहे. सर्वच पक्षांना या बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. राज्यात अशा 62 बंडोबांनी अधिकृत उमेदवारांविरोधात दंड थोपटले आहेत. 

भाजपच्या उमेदवारांविरोधात 26 ठिकाणी बंडखोरी झाली आहे. यात अनेक जण शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत. यवतमाळमधून भाजपचे विद्यमान आमदार मदन येरावार यांच्याविरोधात शिवसेनेच्या संतोष ढवळेंनी बंडखोरी करीत अर्ज भरला आहे. रामटेकमधून भाजपच्या मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याविरोधात शिवसेनेच्या आशिष जयस्वाल यांनी बंड केले आहे. वाशिमचे भाजप उमेदवार लखन मलिक यांच्याविरोधात शिवसेनेच्या नीलेश पेंढारकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जत मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांच्याविरोधात सर्वपक्षीय आघाडीने भाजपच्या डॉ. रवींद्र आरळींना पाठिंबा दिला आहे. मिरजमधून भाजप उमेदवार सुरेश खाडेंविरोधात भाजपच्या माजी नगरसेविका शुभांगी आनंदा देवमाने यांनी अर्ज भरला असून, शिराळा मतदारसंघातून भाजपच्या शिवाजीराव नाईकांविरोधात भाजपच्याच सम्राट महाडिक यांनी अर्ज भरला आहे. सांगलीतून भाजपच्या सुधीर गाडगीळ यांच्याविरोधात भाजपचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शिवाजी ऊर्फ पप्पू डोंगरे यांनी बंड केले आहे. वाईचे भाजप उमेदवार मदन भोसलेंविरोधात शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांनी बंड केले असून, अहमदपूरमधून   भाजपच्या विनायक जाधव-पाटील यांना भाजपच्याच दिलीप देशमुखांनी आव्हान दिले आहे. आष्टी-पाटोदा-शिरूरमधून भाजपच्या भीमराव धोंडेंविरोधात भाजपच्या जयदत्त धस यांनी अर्ज भरला असला, तरी ते मागे घेतील, असे सांगण्यात आले.

राणेंविरोधात सावंत; युती तुटण्याची शक्यता

बहुचर्चित कणकवली मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिलेल्या नितेश राणेंविरोधात उभ्या राहिलेल्या बंडखोर सतीश सावंत यांना शिवसेनेने उघड पाठिंबा दिला असून, सावंत यांनी माघार न घेतल्यास  सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती युती तुटण्याची शक्यता आहे. याच मतदारसंघातून भाजपच्या संदेश पारकर यांनीही राणे यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज भरला.

रायगड जिल्ह्यात पेण मतदारसंघात काँग्रेसमधून आलेल्या रविशेठ पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेच्या नरेश गावंड यांनी बंडखोरी केली आहे. कल्याण पूर्वमध्ये भाजपचे तिकीट मिळालेले  उमेदवार गणपत गायकवाड यांच्यासमोर शिवसेनेचे नगरसेवक धनंजय बोडारे यांनी आव्हान उभे केले आहे. 

रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध सेना जिल्हाप्रमुखाचे बंड

नाशिक पश्‍चिममधून भाजपच्या  सीमा हिरेंविरोधात शिवसेनेच्या विलास शिंदे, सुधाकर बडगुजर, मामा ठाकरे अशा तिघांनी बंड करून अर्ज दाखल केला आहे. नाशिक पूर्वमधून भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांच्याविरोधात उमेदवारी नाकारलेले विद्यमान बाळासाहेब सानप यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर अर्ज भरला आहे. मुक्‍ताईनगर हा एकनाथ खडसे यांचा मतदारसंघ. खडसेंना उमेदवारी नाकारत त्यांच्या मुलीला, रोहिणी खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली असली, तरी खडसेंची डोकेदुखी संपलेली नाही. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंविरोधात अर्ज भरला आहे. नंदुरबारमधून भाजपच्या विजयकुमार गावितांविरोधात भाजपच्याच उदयसिंग पाडवींनी बंड केले आहे.

अन्य ठिकाणच्या भाजप उमेदवारांविरोधात भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोरांनी भरलेल्या अर्जांची यादी अशी… 

मावळ : भाजपच्या बाळा भेगडेंविरोधात रवींद्र भेगडे, तर भाजपच्या सुनील शेळके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी.

खडकवासला : भाजपच्या भीमराव तापकिरांविरुद्ध शिवसेनेचे रमेश कोंडे.

कसबा : भाजपच्या मुक्‍ता टिळक यांच्याविरुद्ध शिवसेनेचे विशाल धनवडे.

माण : भाजपचे उमेदवार जयकुमार गोरेंविरुद्ध त्यांचेच सख्खे भाऊ शेखर गोरे यांना शिवसेनेची उमेदवारी.

वर्सोवा : भाजपचा मित्रपक्ष शिवसंग्राम उमेदवार भारती लव्हेकर विरुद्ध शिवसेनेच्या राजुल पटेल.

मीरा भाईंदर : भाजप उमेदवार नरेंद्र मेहतांविरोधात माजी महापौर आणि भाजप नगरसेविका गीता जैन.

ऐरोली : भाजप उमेदवार गणेश नाईकांविरोधात शिवसेनेचे विजय नाहटा.

पंढरपूर : मित्रपक्ष रयत क्रांतीकडून उमेदवारी मिळालेले माजी आमदार सुधाकर परिचारक विरुद्ध भाजपच्या समाधान औताडे आणि शिवसेनेच्या शैला गोडसे. शिवसेनेच्या उमेदवारांविरोधात बंडखोरी

अंधेरी : शिवसेना उमेदवार रमेश लटके विरुद्ध भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल.

वांद्रे पूर्व : शिवसेनेच्या विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्याविरोधात शिवसेनेच्याच विद्यमान आमदार तृप्‍ती सावंत.

भिवंडी पूर्व : शिवसेना उमेदवाराविरोधात भाजप शहराध्यक्ष संतोष शेट्टी. 

कल्याण पश्‍चिम : शिवसेना उमेदवार विश्‍वनाथ भोईर विरुद्ध भाजपचे विद्यमान आमदार नरेंद्र पवार.

खेड-दापोली : शिवसेनेचे योगेश कदम विरुद्ध भाजपचे केदार साठे.

सावंतवाडी : शिवसेनेचे दीपक केसरकर विरुद्ध भाजपचे राजन तेली.

गुहागर : शिवसेनेच्या भास्कर जाधवांविरोधात भाजपचे विनय नातू. शिवाय, शिवसेनेचेच सहदेव बेटकर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी. याशिवाय भाजपचे जिल्हाध्यक्ष रामदास राणेंचे बंड.

चिपळूण : भाजपचे तुषार खेतल यांची सेना उमेदवाराविरोधात बंडखोरी.

देवळाली : शिवसेनेच्या योगेश घोलप यांच्याविरोधात भाजप नगरसेविका सरोज अहिरेंची राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी.

चोपडा : शिवसेनेच्या उमेदवार लताबाई सोनवणेंविरोधात भाजपच्या मगन सैंदाणे आणि शामकांत सोनवणेंची बंडखोरी.

अक्‍कलकुवा : शिवसेनेच्या आमशा पाडवी यांच्याविरोधात भाजपच्या नागेश पाडवींची बंडखोरी.

बुलडाणा : शिवसेना उमेदवार विजयराज शिंदे यांची वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर बंडखोरी.

सिल्लोड : शिवसेना उमेदवार अब्दुल सत्तारांविरोधात अपक्ष उमेदवार प्रभाकर पलोदकर यांना भाजप नाराजांचा पाठिंबा.

वैजापूर : शिवसेनेच्या रमेश बारणारेंविरोधात भाजपच्या एकनाथ जाधव आणि दिनेश परदेशींची बंडखोरी.

पालघर : शिवसेना उमेदवार श्रीनिवास वनगा यांच्याविरोधात शिवसेनेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांची राष्ट्रवादीकडून उमेदवारी. काँग्रेसचे उमेदवार योगेश नम यांच्याविरोधात राष्ट्रवादीचा अर्ज. 

बोईसर : शिवसेनेच्या विलास तरेंविरोधात भाजपचे संतोष जनाठे.

शहापूर : शिवसेनेचे उमेदवार आमदार पांडुरंग बरोरा यांच्याविरोधात शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा यांची राष्ट्रवादीतून उमेदवारी.

उरण : शिवसेनेचे आमदार आणि जिल्हाप्रमुख मनोहर भोईर विरुद्ध भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी. 

पिंपरी : शिवसेनेच्या आमदार गौतम चाबुकस्वारांविरोधात भाजपच्या अमित गोरखे.

कागल : शिवसेनेच्या संजय घाटगेंविरोधात भाजपच्या समरजित घाटगेंची बंडखोरी.

माढा : शिवसेनेच्या संजय कोकाटेंविरोधात भाजपच्या मीनलताई साठे.

करमाळा : शिवसेनेच्या रश्मी बागलांविरोधात शिवसेनेचे आमदार नारायण पाटील. 

इस्लामपूर : शिवसेनेच्या गौरव नायकवाडींविरोधात नगराध्यक्ष भाजप नेते निशिकांत पाटील. 

श्रीरामपूर : शिवसेनेच्या भाऊसाहेब कांबळेंविरोधात शिवसेनेचेच विद्यमान खासदार सदाशिव लोखंडेंचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडेंची बंडखोरी.

काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या महाआघाडीतील बंडखोरी

अलिबाग : काँग्रेसच्या उमेदवार श्रद्धा ठाकूर यांच्याविरोधात माजी आमदार मधू ठाकूर यांच्या दोन नातेवाईकांची उमेदवारी. 

सोलापूर शहर मध्य : काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जुबेर बागवान. 

अहमदनगर शहर : राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांविरोधात राष्ट्रवादीच्याच किरण काळे यांची वंचितमधून उमेदवारी.

सांगोला : महाआघाडीतील शेकापचे उमेदवार अनिकेत देशमुखांविरोधात राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे.

शिवाजीनगर मानखुर्द : महाआघाडीचे समाजवादी पार्टी उमेदवार अबू आझमींविरोधात काँग्रेस नगरसेवक सुफियान वन.

पंढरपूर : राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याविरोधात काँग्रेसचे शिवाजी काळुंगे. 

हिंगणघाट : राष्ट्रवादीच्या राजू तिमांडेंविरोधात राष्ट्रवादीचे सुधीर कोठारी.

शिरोळ : महाआघाडीतील स्वाभिमानीच्या विरोधात राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news