सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार करणार्या तिघांना अकलूज पोलिसांनी अटक केली. अण्णासाहेब सुग्रीव किर्दकर (वय 28, रा. चाकाटी खालेवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे), अजय महादेव जाधव (23), कुमार महादेव जाधव (21, दोघे (रा. संग्रामनगर, ता. माळशिरस) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयात उभे केले असता 7 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
याबाबत अकलूजचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगितले, की जिल्ह्यात रेमडेसिवीरचा तुटवडा सुरू आहे. त्यात काहीजण काळा बाजार करीत आहेत. त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांचा वॉच आहे. दरम्यान, काहीजण रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार जास्त दराने अकलूज परिसरात विक्री करीत असल्याची माहिती मिळाली.
ते म्हणाले, अकलूजमधील 100 फुटी रस्त्यावरील बायपास रस्त्यावर अभय क्लिनीकजवळ किर्दकर यांच्यासह तिघे रेमडिसीवीर विकत असल्याच तिघेजण आढळून आले. त्यानुसार तिघांकडे चौकशी करता वैद्यकीय अधिकार्याच्या चिठ्ठीशिवाय व विना कोव्हिड तपासणी अहवालाशिवाय 35 हजार रुपये किंमतीने ते विकत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी औषध निरीक्षक नामदेव भालेराव यांनी अकलूज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीवरून आण्णासाहेब किर्दकर, अजय जाधव व कुमार जाधव यांच्याविरुद्धख गुन्हा दाखल करीत अटक केली.