राजापूर : पाणी मिळत नसले तर धरणे हवीत कशाला?

राजापूर
राजापूर
Published on
Updated on

राजापूर; शरद पळसुलेदेसाई:  राजापूर तालुक्यातील धरणांत पाणी उपलब्ध असतानादेखील त्याचा फारसा उपयोग स्थानिक शेतकर्‍यांना होत नसल्याने ही धरणे हवीत तरी कशाला? अशा संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. मुबलक पाणी असून जनता मात्र पाण्याच्या प्रतीक्षेत आहे.

सौंदळ पट्ट्यात बारेवाडी येथे धरण बांधण्यात आले. या धरणातील पाण्याचा सौंदळ गावात चांगलाच उपयोग सुरुवातीच्या काळात तेथील शेतकर्‍यांनी करून घेतला. मात्र, त्यानंतर धरणाच्या बाबतीत दुर्दैवाचे फेरे सुरू झाले. या पाण्यावर सौंदळमधील शंभरहून अधिक शेतकरी उन्हाळी भातशेती करीत असत.

पालेभाज्यांसह विविध पिके घेतली जायची. त्यात ऊस, मका, भुईमूग यांचा समावेश असायचा. या धरणातून पाईपलाईनव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, कालांतराने त्या पाईपलाईनमध्ये रानवेलींचा शिरकाव होऊन पाणीपुरवठ्यात व्यत्यय येऊ लागला आणि नंतर शासनाकडून वेलींनी भरलेल्या त्या पाईपलाईन पाहिजे तशा दुरुस्त झाल्या नाहीत.

परिणामी पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितता आल्याने त्याचा मोठा परिणाम झाला व उन्हाळी शेती बंद होत गेली. सध्या बोटावर मोजता येतील एवढेच शेतकरी उन्हाळी शेती करीत आहेत. धरणात साचलेला गाळ नंतर काढला गेला. मात्र, पाईपलाईनचा पत्ताच नसल्याने उन्हाळी शेती इतिहासात विलीन झाली.

काही धरणे निधीअभावी अपूर्णावस्थेत आहेत, ती केव्हा मार्गी लागतील ते निश्चित सांगता येत नाही. जरी जामदाच्या कामाला सुरुवात झाली असली तरी जोवर प्रकल्पग्रस्तांचे पूर्ण पुनर्वसन होत नाही आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर धरणाला असलेला विरोध कायम राहील.

परिणामी धरणाचे काम सुरू करणे अवघड बनले आहे. मात्र, ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी धरणाच्या कामात अडकल्या आहेत ते धरणग्रस्त शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी म्हणून प्रतीक्षेत आहेत. धरणग्रस्तांसाठी पर्यायी पुनर्वसनासाठी जागा निश्चित करण्यात आलेल्या
नाहीत.

अर्जुनाचे पुनर्वसन चार ठिकाणी करण्यात आले आहे. मात्र, अनेक मुलभूत सुविधांपासून प्रकल्पग्रस्त वंचित आहेत. त्यामध्ये खराब झालेले रस्ते, मोडकळीला आलेल्या इमारती आदींचा सामावेश आहे. सर्व पुनर्वसन वसाहतींमधील सुविधांची नव्याने दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे.

शासनाने तालुक्यातील धरणांचा आढावा घ्यावा. अपूर्ण धरणे बांधून पूर्ण करावीत व सर्व धरणांतून कालवे किंवा बंदिस्त पाईपलाईनव्दारे समस्त शेतकरी बांधवांसह जनतेला मुबलक स्वरुपात कसे पाणी मिळेल, त्यादृष्टीने प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे.

धरणे असूनही दरवर्षी पाणीटंचाई…

तालुकावासीयांना भातशेतीसह पिण्याच्या पाण्याची भेडसावणारी पाणीटंचाई दूर व्हावी, या उद्देशाने शासनाने धरणे बांधली, मात्र आज एकूणच या धरणांची स्थिती पाहता शासनाच्या मूळ उद्देशालाच तडा गेला आहे.

त्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई कायम आहे. चालू वर्षासाठीदेखील तालुक्याच्या संभाव्य पाणीटंचाईचा गावे व त्या अंतर्गत येणार्‍या वाड्या यांचा आराखडा बनविण्यात आला आहे. दरवर्षी टंचाईग्रस्त गावे व वाड्यांमध्ये वाढ होताना दिसते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news