हाय फ्रेंडस्,
गणिताचे आकडे, लक्षात राहण्यासाठी वारंवार रेखाटलेली काही प्रश्नांची उत्तरे, स्टडीचाच भाग असणारे पण पुढच्या पेजवर नको असणारे काही प्रश्न, काही उत्तरे, प्रत्येक वहीच्या मागच्या पानावर असतात. म्हटलं तर या पानाचा उपयोग असतोही, म्हटलं तर नसतोही. प्रत्येकाच्या वहीमध्ये असे एकतरी रफ पेज असतेच. ज्याच्यावर बेरीज, वजाबाकी, भागाकार असतोच. शिवाय मनातल्या काही अस्पष्ट अशा भावनाही त्यावर रेखाटलेल्या असतात. जेव्हा तुम्ही मागच्या वर्गाला बाय बाय करून पुढच्या वर्गात प्रवेश घेता तेव्हा जुन्या झालेल्या वह्यांमधील मागच्या पेजवरचे हे कच्चं पान तुम्ही उलटता तेव्हा नकळत मागचं आख्खं वर्ष तुमच्या नजरेसमोर तरळतं.
कधी फ्रेंडस्ची लिहलेली नावे, कधी समोर टिचर शिकवत असताना शेजारच्या फ्रेंडला दिलेली एखादी कमेंट, कधी कधी कोणाचेतरी काढलेले व्यंगचित्र तर कधी गणितांचे पाठ न झालेले पाढे अशा अनेक बाबी तुमच्या मागच्या पानावर रेखाटलेल्या, गिरगटलेल्या असतात. खरे तर याच पेजमुळे तुम्हाला पुढच्या पेजवर न चुकलेली गणित मांडता येतात. या पेजमुळेच तुमच्या वहीचे फ्रंटपेज सुंदर दिसतं. पण तरीही त्याला कच्चे पान म्हणून त्यावेळी तुम्ही दुर्लक्ष केलेले असते.
फ्रेंडस्, आयुष्यही असंच आहे. आयुष्यातील नको असणार्या पण आयुष्यातून कायमच्या बाहेर न काढता येणार्या काही आठवणी, काही व्यक्ति, काही क्षण तुम्ही अंतर्मनाच्या खोलवर असणार्या या रफपेजवर नोट करून ठेवता. आयुष्यातील चुकांची दुरूस्ती म्हणजे तुमची उजळ, उज्वल इमेज असते. या रफपेजमुळेच तर तुम्ही पुढची वाटचाल अगदी तंदुरूस्त करत असता. वहीच्या मागे असणार्या पेजसारखेच तुमच्या आयुष्याच्या मागे, खूप मागे तुम्ही या पानाला ठेवून देता. कधी तरी वहीचे पान उलटत असताना हे पेजही समोर येते. तसेच आयुष्याची पानेही उलटत असताना हेही खोलवर ठेवलेले पान समोर येते. त्या पेजवर तुमच्या अनेक आठवणीही असतात. पान कच्च असलं तर त्याच पानामुळं तुमच्या आयुष्यातील गणितं तुम्ही पक्की केलेली असतात. त्यामुळं आयुष्याच्या पुढच्या पानांइतकेच ते पेजही तुमच्या आयुष्याशी घट्ट चिकटलेले असते.अगदी वहीचं प्रत्येक पान एकमेकांना चिकटलेले असतं ना तसेच. एखादे जरी पान बाजूला केले तरी बाकीची पाने मग विस्कळीत होतात. तीही मग हळूहळू निसटायला लागतात. म्हणूनतर प्रत्येक पानाचे बंध पहिल्या पानाइतकेच महत्वाचे असतात. जसं की पहिलं पान शेवटच्या पानाशी बांधिल असतं तर मधली पाने एकमेकांशी शेवटपर्यंत बांधिल असतात. आयुष्यही असंच अनेक आठवणी, घटनांशी बांधिल असतात. यामधील काहीही बाजूला करता येत नसतं.
असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानांना लावून अत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग त्याला मिळती सत्तर
नजर रोखूनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.