पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : मागील पंधरा दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार झालेल्या आमदार अण्णा बनसोडे यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. रत्नागिरी येथे ही कारवाई करण्यात आली. सिध्दार्थ बनसोडे असे अटक केलेल्या आमदार पुत्राचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी पिंपरीतील राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी काळभोरनगर, चिंचवड येथे आपल्यावर गोळीबार झाल्याचा दावा केला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.
आमदार समर्थकाने दिलेल्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, याच्या परस्पर विरोधी तक्रार करण्यात आली. यामध्ये आमदारपुत्र सिद्धार्थ बनसोडे याच्यासह त्याच्या साथीदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. घटनेनंतर मुख्य आरोपी आमदार बनसोडे यांचा मुलगा सिद्धार्थ बनसोडे हा फरार झाला होता. त्याच्या शोधात पथके रवाना करण्यात आली होती. त्यानुसार एका पथकाने त्याला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी पोलिसांनी यापुर्वी नऊजणांना अटक केली आहे.
नेमकी तक्रार काय?
पिंपरी चिंचवड महापालिकेचे कंत्राटदार सिजू अँथनी यांच्या कार्यालयात सिद्धार्थ बनसोडे 11 मे रोजी दुपारी घुसले होते. त्यानंतर दोघा कर्मचार्यांवर हल्ला केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला. लोखंडी टॉमीसारख्या घातक शस्त्राने दोघांवर हल्ला केल्याचं सीसीटीव्हीत देखील कैद झालं आहे. अँथनी यांच्या कंपनीचे मॅनेजर तानाजी पवार कुठे आहेत, हे कर्मचार्यांनी न सांगितल्याच्या रागातून आमदारपुत्र आणि पीएसह दहा जणांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा उल्लेख तक्रारीत आहे.