नाशिक : नितीन रणशूर
शिवशाही पाठोपाठ 'ई-शिवाई' बससेवेच्याही खासगीकरणाचा निर्णय महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. एसटी महामंडळाने वेगवेगळ्या सेवांच्या खासगीकरणाचा धडाका लावला आहे. 'ई-शिवाई'च्या खासगीकरणाविरोधात कामगार संघटना चकार शब्द काढण्यास तयार नाहीत. त्यामुळे एसटी कामगारांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र शासनाच्या फेम-2 योजनेंतर्गत राज्यातील आंतर-शहर वाहतुकीसाठी विद्युत बस अर्थात, 'ई-शिवाई' बस सुरू करण्यास एसटी प्रशासनाने हिरवा कंदील दाखविला आहे. सप्टेंबर 2019च्या पहिल्या आठवड्यात वातानुकूलित 'ई-शिवाई' बसचा लोकार्पण सोहळा माजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थित पार पडला होता. आगामी काळात सुमारे दीडशे 'ई-शिवाई' बस एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. त्यामुळे लवकरच प्रवाशांना पर्यावरणपूरक शिवाई बसने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.
शिवाई बस खासगीकरणातून रस्त्यावर उतरविण्याच्या दिशेने एसटी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील 50 बसेससाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. प्रसन्न पर्पल ट्रॅव्हल्स कंपनीद्वारे 50 ई-शिवाई बस एसटी महामंडळाला पुरविण्यात येणार आहेत. उर्वरित ई-शिवाई बस टप्प्याटप्प्याने प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत.
दरम्यान, शिवाई बसची बांधणी जयपूरमध्ये करण्यात येत असून, एका बसची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. दीडशे बससाठी काही कोट्यवधी रुपये गुंतवण्यापेक्षा खासगीकरणातून बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार्जिंग स्टेशनसाठीही मोठा खर्च आहे. आधीच तोट्यात चाललेल्या शिवाईचा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे खासगीकरणातून शिवाई बससेवा सुरू करण्यात आल्याचा दावा एसटी प्रशासनाकडून करण्यात येत आहे.