रत्नागिरी ः पुढारी वृत्तसेवा
नैऋत्य मोसमी वारे 31 मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्यास सध्या अनुकूल स्थिती असल्याने कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 1 जूनपासून तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने स्पष्ट केली आहे.
अरबी समुद्रातून किनारपट्टीलगत येत असलेल्या बाष्पामुळे बहुतांश भागात आठवडाभर हलक्या स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता कायम राहणार आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातून सध्या वेगाने प्रगती करीत असलेले नैऋत्य मोसमी वारे 31 मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्यास सध्या अनुकूल स्थिती आहे. 'यास' चक्रीवादळाने मोसमी वार्यांचे प्रवाह मोकळे केले असल्याने कोकण किनारपट्टी भागात 1 जूनपासून तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कोकणात पूर्वमान्सूनची वाटचाल 1 जूनपासून सुरू होणार असली तरी मोसमी पाऊस दाखल व्हायला किमान दहा दिवस लागतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोक्ते चक्रीवादळाने केरळ, कोकण, मुंबई परिसर आणि गुजरातमध्ये धुमाकूळ घातला
असताना आता देशाच्या दुसर्या बाजूला म्हणजे उत्तर अंदमान आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात नव्या 'यास' चक्रीवादळाने धडक दिली आहे. या चक्रीवादळाने नैर्ऋत्य मोसमी वार्यांना गती मिळणार असल्याचे हवामान विभागाने ही स्पष्ट झाले आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेले तोक्ते चक्रीवादळानंतर बंगालच्या उपसागरात आलेल्या 'यास'नेही मोसमी वार्यांच्या प्रवाहाला गती मिळणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. मोसमी वार्यांच्या प्रवाहाला गती मिळाली. चक्रीवादळाच्याच काळात हवामान विभागाने मोसमी वार्यांच्या केरळ प्रवेशाबाबत सुधारित अंदाज जाहीर केला होता. त्या नुसार मोसमी वार्यांचे केरळमध्ये 31 मे रोजीच आगमन होणार असल्याचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. केरळात दाखल झाल्यानंतर महाऱाष्ट्रात आणि पर्यायाने प्रवेशद्वारे असलेल्या तळ कोकणात मोसमी पावसाचा प्रवास सुकर होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.