सातारा; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कऱ्हाडकर यांना नुकतेच पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. बंडातात्यांवरील कारवाई मागे घ्यावी व त्यांची स्थानबद्धेतून सुटका करावी अशी मागणी आज (बुधवार) व्यसनमुक्त संघाचे विलासबाबा जवळ वारकरी संप्रदायास एकत्रित करुन जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांना निवेदन देणार होते. त्यापुर्वीच मेढा पोलिसांनी विलासबाबा जवळ यांना स्थानबद्ध केले आहे. या प्रकाराने वारकरी संप्रदायात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा : दिलीप कुमार यांच्या पहिल्या आणि शेवटच्या चित्रपटाविषयी तुम्हाला माहिती आहे का?
ह.भ.प. बंडातात्या कऱ्हाडकर यांना पोलिसांनी स्थानबद्ध केल्यानंतर आता त्याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी बंडातात्यांनी मर्यादित लोकांची पायी वारी आळंदीतून काढणार असल्याची भूमिका घेतली होती. त्यासाठी ते आळंदीला सुद्धा दाखल झाले होते. याबाबत त्यांनी सरकारकडे वेळोवेळी मागणी केली होती परंतु आळंदीत असतानाच बंडातात्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कराडमध्ये स्थानबद्ध केले.
अधिक वाचा : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना 'ईडी'चा दणका
या प्रकारामुळे वारकर संप्रदाय नाराज झाला. दोन दिवसांपुर्वी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे मार्गदर्शक संभाजी भिडे यांनी बंडातात्यांवरील कारवाई रद्द करावी या मागणीसाठी कराडमध्ये मोर्चा काढला. भिडे यांनी प्रशासनास निवेदन देऊन बंडातात्यांसारख्या संत माणसास सोडून द्यावे अशी मागणी केली.
अधिक वाचा : केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात ३ कायदे
आज साताऱ्यात सरकारचा निषेध करण्यासाठी आणि बंडातात्यांची बिनशर्त मुक्तता करावी यासाठी पोवाईनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी दिंडी सोहळा व्यसनमुक्ती संघाचे विलासबाबा जवळ आणि वारकरी संप्रदाय यांच्यावतीने साडे अकरा वाजता आयोजिला आहे. परंतु त्यापुर्वीच पोलिसांनी मेढा येथे विलासबाबा जवळ यांना ताब्यात घेतले असून स्थानबद्ध केले.
याबरोबरच सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वारकरी आणि युवकांची धरपकड सुरू झाली आहे. सातारा येथे जिल्हाधिकारी यांना वारीबाबत निवेदन देण्यासाठी जात असताना पोलिस प्रशासनाने अक्षयमहाराज भोसले यांना दहिवडीत स्थानबद्ध केले आहे. आता साडे अकरा वाजता निघणारा पायी दिंडी सोहळा रद्द होणार की अन्य कोणी नेतृत्व करणार हे पाहावे लागेल.