महाराष्ट्रात अनेक नवे धर्मसंप्रदाय निर्माण झाले. ज्यांनी जे नव्या पद्धतीनं सामाजिक रचना झाली पाहिजे, यासाठी निर्माण झाले होते. त्याला कसा प्रतिसाद मिळाला, यावेळी ख्रिस्ती मिशनरी काय करीत होते, हे पाहिले. ही मंडळी त्यावेळी अनिष्ट वाटणार्या, जाचक वाटणार्या रूढी असतील त्यांना विरोध करायचे. त्या रूढींमध्ये स्त्रियांना दिली जाणारी वागणूक, बालविवाह असे प्रश्न होते. बालविवाह त्याकाळी जटिल प्रश्न होता. मुलींचे लग्न वयाने मोठ्या व्यक्तीबरोबर लावले जायचे. त्यांच्या पतींचे लवकर निधन होऊन त्यांच्यावर ऐन तारुण्यात विधवा होण्याची वेळ यायची. त्यांचा पुनर्विवाह करण्यास समाजाची परवानगी नसायची. किंबहुना, त्या घरामध्ये विधवा अवस्थेत जीवन जगत असत. तेव्हा त्यांचे केशवपन व्हायचे. त्या वेळी अशा अनेक रूढी होत्या. अस्पृश्यता होती. सर्वसामान्यांना शिक्षणाची सोय नव्हती, या गोष्टी त्या काळामध्ये होत्या. त्यांच्यात सुधारणा करायच्या म्हटल्यानंतर साहजिकच त्या गोष्टींना जबाबदार असणार्या किंवा त्या गोष्टीचं समर्थन करणार्या धर्मालाच कुठेतरी पकडावं लागलं आणि आघात करावा लागला. कारण, त्याचं सगळं धार्मिक सामर्थ्यात होतं. म्हणूनच, त्या वेळच्या सर्व सुधारक लोकांनी सुधारणेसाठी आपलं लक्ष्य धर्माला केलं. मग, धर्माबरोबर टीकेचे प्रवर्तक आलेच. सुधारक हे स्वत: ब्राह्मण असले, तरी ते टीका करताना ब्राह्मणांवरच करायचे. टीकेचे प्रवर्तक कोण होते, तर त्यात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख होते. त्यांनी जुनाट समजुतींवर आणि जुनाट धर्मशास्त्रांवर जेवढी टीका केली, ती धर्मशास्त्र उचलून धरणार्या ब्राह्मणांवर तेवढी टीका कोणीच केली नाही.
महात्मा जोतिराव फुले जे नंतर करू शकले, त्यांचं काम लोकहितवादी देशमुख यांनी सोपं केलं होतं. नंतरच्या काळातसुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 'बहिष्कृत भारत' वर्तमानपत्र काढलं. प्रबोधनकार ठाकरेंनी 'प्रबोधन' नावाचं पत्र काढलं. त्या पत्रातूनसुद्धा लोकहितवादी देशमुखांचे लेख, उतारे छापले जायचे. ही प्रक्रिया चालायची. त्याचा परिणाम असा झाला, की समाज ऐकूनच वाईट, बुरसटलेला, मागासलेला असं एक चित्रं निर्माण व्हायला लागलं. अशाप्रकारे या समाजाचं चित्र उभं राहण्याचा एक परिणाम असा होऊ शकतो की, याची स्वातंत्र्य मिळवण्याची लायकीच नाही. लोकहितवादी देशमुख यांनी हेच सांगितलं की, पेशव्यांच्या काळात लोक मूर्ख बनले होते. त्यांना राज्य करता येत नव्हतं. त्यामुळे असं चित्र समाजापुढे जाता कामा नये. मग, हे लोक टीका करतात तेवढे आमचे लोक वाईट नव्हते. त्यांचा इतिहास सुद्धा उज्ज्वलित होता. आमच्या पूर्वजांनी पराक्रम केलेला आहे. आमच्या पूर्वजांत खूप ज्ञाते लोक होऊन गेले, अशा प्रकारची भूमिका घेऊन काही लोक पुढे आले. त्यांना आपण राष्ट्रीय वृत्तीचे किंवा राष्ट्रवादी म्हणतो. त्या लोकांचे आधार म्हणजे विष्णुशास्त्री चिपळूणकर. त्यांनी या सर्व मंडळींना धारेवर धरलं. त्यात प्रार्थना समाजाचे लोक आले. त्यात ख्रिश्ती मिशनरी आले. त्यात लोकहितवादी आले, ज्यात सत्यशोधक समाजही आला, तर असं सामाजिक अंगानं विचार करणारे लोक, की जे संतांचा आधार घेत होते, आता त्यांच्यामध्ये राजकीय अंगानं विचार करणारे लोक होते, की ज्यांचा मूळ उद्दिष्ट समाजसुधारणा असं नव्हतं, तर स्वातंत्र्य असं होतं, असा एक वाद महाराष्ट्रात त्या काळामध्ये निर्माण झाला. चिपळूणकरांनी 'निबंधमाला' लिहिली. त्यातून या सगळ्यांवर टीका केली. त्यांनी स्वधर्म, स्वभाषा आणि स्वराज्याचा हिरिरीने पुरस्कार केला. साहजिकपणे जी मंडळी त्या काळी प्रतिगामी विचारांची होती, ज्यांना सुधारणा नको होत्या ती सगळी चिपळूणकरांकडे आली. चिपळूणकरांना सुधारणाचं महत्त्व कळत होतं. ते स्वत: कुठल्याही वैयक्तिक आचरणात बुरसटलेले नव्हते. पण, त्यांनी दुसरी बाजूही पाहिली. म्हणूनच त्यांनी सर्वांवर टीका केली. आता सामाजिक अंगांनी विचार करणार्या लोकांचा विचार केला, तर त्या सर्वांचा आधार संत तुकाराम महाराज हे होते. म्हणून चिपळूणकरांनी आपोआपच तुकोबांनाही लक्ष्य करायला सुरुवात केली.
चिपळूणकरांच्या लक्षात आलं की, हे सगळे आपल्यावर तुटून पडताहेत, आता काय करायचं? अशावेळी सामाजिक अंगांनी विचार करणार्यांचे बलस्थान होते ते म्हणजे तुकोबा, हे चिपळूणकरांच्या लक्षात आलं. म्हणून तुकोबाचं स्थान कमी करण्यासाठी चिपळूणकरांनी प्रयत्न सुरू केले. हा सगळा आपला सामाजिक आणि राजकीय इतिहास खूप महत्त्वाचा आहे. आजही आपण चिपळूणकरांची 'निबंधमाला' वाचा. त्यात आजही निबंधमालेचे शेवटचे पर्व सोडले, तर अगोदरच्या लेखनात सर्वांत जास्त अवतरणे तुकोबांची आहेत. विवेचन करताना तेवढी कोणी केलेली नाहीत; पण त्यांना हे करावं लागलं. चिपळूणकरांची ही विचारसरणी होती. म्हणून त्यांनी ते ठरवलं की, टीका केली पाहिजे.
ब्रिटिशांनी 24 हजार रुपये तुकोबांच्या अभंगांच्या प्रकाशनासाठी दिले. ते चिपळूणकरांनी पकडलं. ते म्हणायला लागले की, सरकारचं हे काम योग्य नाही. मराठीमध्ये अनेक कवी आहेत. मग, सर्वांनाच प्रकाशनासाठी असे पैसे दिले पाहिजेत. हा अन्याय आहे. ही बाजू चिपळूणकर मांडताहेत की, ज्यांना तुकोबा कवी म्हणून श्रेष्ठ आहेत हे माहिती आहे. पण, तुकोबांचा जर तिकडच्या विचारसरणीचे लोक अशा पद्धतीने उपयोग करून घेत असतील, तर आपल्याला तुकोबा नाही कामाचे, आपल्याला त्यांच्यावर टीका करावी लागेल, अशी चिपळूणकरांची भूमिका होती, हे आपण समजून घेतलं पाहिजे. चिपळूणकरांच्या या राष्ट्रवादी भूमिकेचा निश्चितपणे त्या काळातल्या उच्चभ्रू समाजावर परिणाम झाला आणि बरेचसे लोक मग राष्ट्राचे कार्य करण्यासाठी पुढे आले.
कोणी विचार संशोधन, कोणी वर्तमानपत्रं चालवू लागलं, कोणी ग्रंथ लिहायला लागलं, तर कोणी राजकारणात यायला लागलं. जसे लोकमान्य टिळक.ते एका अर्थाने चिपळूणकरांच्या प्रभावळीतले. टिळक यांच्यासारखा त्यावेळी ज्ञाता माणूस शोधणं खूप कठीण.त्यांना लहानपणीच संस्कृत भाषा शिकायला मिळाली. नंतरच्या काळात त्यांनी वेदांचा अभ्यास केला. वेदांचा कालनिर्णय लावण्याचा प्रयत्न केला. त्याचं संशोधन पाश्चात्त्य देशांतील लोकांनीही मान्य केलं. जेव्हा ब्रिटिश सरकारने टिळकांना शिक्षा सुनावली तेव्हा मॅक्सम्युलरने पुढाकार घेऊन पाश्चात्त्य संशोधकांचं पत्र तयार केलं. हे फार मोठे विद्वान मनुष्य आहेत, त्यांना शिक्षा देणं बरोबर नाही. टिळकांसाठी त्यांनी हे पत्र लिहिलं, तर असे टिळक महान होते. टिळकांनी सरकारच्या विरोधात अनेक गोष्टी केल्या आणि मुंबईत त्यांच्यावर खटला चालला आणि त्यांना सहा वर्षांची मंडालेमध्ये शिक्षा झाली. मंडालेमध्ये त्यांनी सहा वर्षे एकांतात काढली. तो काळ टिळकांनी वाया घालवला नाही. त्या काळात त्यांनी 'श्रीमद्भगवद्गीते'चा अर्थ लिहिला आणी 'गीतारहस्य' पुस्तकातून तो पुढे आला. पूर्वीच्या लोकांपेक्षा तो वेगळा अर्थ आहे. पूर्वीच्या बहुतेक भगवद्गीतेच्या ज्या टीका, भाष्य किंवा अन्वयार्थ माणसाने कर्म करण्यापेक्षा कर्म न करणं बरं, असा संन्यास मार्गाचा पुरस्कार करणारा अर्थ पूर्वीचे लोक लावायचे. टिळकांनी असं पाहिलं की, सध्याच्या काळामधील लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे. आधुनिक काळाशी आपण जुळवून घ्यायचं म्हटलं, तर नव्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यानुसार कृती केली पाहिजे. स्वराज्य मिळवण्यासाठी अधिक कृती केली पाहिजे. म्हणून कर्मयुक्तपर अर्थ त्यांनी लिहिला. म्हटलं तर टिळक हे चिपळूणकरांच्या परंपरेतले आहेत; पण टिळकांना तुकाराम महाराजांच्या अभंगांचं महत्त्व कळलेलं होतं. गीतारहस्यामध्ये जर कुठल्या मराठी लेखकाची जास्तीत जास्त वचनं असतील ती म्हणजे तुकोबांची.
गीतारहस्याची सुरुवातच तुकोबांच्या
वचनानं होते आणि शेवटसुद्धा तुकोबांच्याच वचनानं टिळकांनी केला आहे. लोकमान्य टिळक हे वेगळ्या परंपरेतले असले, तरी त्यांना हे माहीत होतं की, महाराष्ट्रामध्ये जर कोणाचा प्रभाव असेल, लोकांच्या मनोभूमिकेवर, विचारपद्धतीवर तर ते तुकोबांचा प्रभाव आहे. तुकोबांना बाजूला सारून कोणत्याच गोष्टी होणार नाहीत. हा प्रभाव त्यांच्या आयुष्यावरही आहे. त्यांना सहा वर्षांची शिक्षा झाली होती. ते तुरुंगात गेले. पाच वर्षे लोटली. त्या काळात तुरुंगाचा नियम असा होता की, कैदी चांगला वागला, तर त्याला शिक्षेत सूट मिळायची. कैदी म्हणून टिळकांचं वागणं चांगलं होतं. त्यामुळे ब्रिटिशांच्या कायद्याप्रमाणं टिळकांना काही महिन्यांची शिक्षेत सूट मिळण्याची आवश्यकता होती. टिळकांना माहीत होतं की, ती मिळणार. त्यांनी याबाबत सरकारला पत्र लिहिलं होतं. हे जरी खरं असलं, तरी शेवटी निर्णय सरकारचाच होता. म्हणून टिळकांनी घरी एक पत्र लिहिलं की, 'असा कायदा आहे त्याप्रमाणे मला शिक्षेत सूट मिळू शकते. तसा मी अर्ज केलेला आहे. आता जे काही होईल ते होईल. तो निर्णय लागेपर्यंत मी त्या महान भागवत भक्ताच्या वचनाप्रमाणे स्वस्थ बसून सगळं बघतोय…' यात ते भागवत भक्त म्हणजे तुकाराम महाराज. इथे टिळक हे कर्मयोगी आहेत. कर्माचा पुरस्कार करणारे आहेत. त्यामुळे तुकोबा टिळकांना कर्मयोगी वाटतात. तुकोबा म्हणतात, आपल्याला जी करण्याची आवश्यकता होती ते सगळं करून झालेलं आहे. आता यापेक्षा अधिक काही करणं शक्य नाही. मग, त्याचा जो निकाल लागायचा आहे तोपर्यंत मधल्या काळात फुकट आकांडतांडव करून काय उपयोग? शांत बसलं पाहिजे…' तेच कर्मयोगाचं खरं रहस्य आहे. फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहणं, असं तुकोबा सांगतात. म्हणून इथं लोकमान्य टिळक आपल्या कर्मयोगाला तुकोबांचा पाठिंबा आहे, असं सांगताहेत. म्हणजे त्या काळातले सामाजिक आणि राजकीय विचार करणारे लोक त्या सगळ्यांनाच तुकाराम महाराजांचा आधार वाटला. ते सर्व अत्यंत महत्त्वाच्या निर्णायक क्षणी, निर्णायक भूमिकांसाठी तुकोबांचा आधार घेताहेत, हेच महत्त्वाचं आहे.
– डॉ. सदानंद मोरे (लेखक माजी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.)