मुंबई : पुढारी वृत्तसेवा
विधान मंडळात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने विधिमंडळाच्या कामकाजात प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल महाराष्ट्र विधिमंडळातील बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू व उत्कृष्ट भाषणा साठीचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने मिळालेल्या या पुरस्कारामुळे राज्यातील कोट्यवधी सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्यासाठी निश्चितच नव्याने बळ मिळेल, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली.
राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेतर्फे सन 2017-18 साठीचा दिला जाणारा महाराष्ट्र विधानपरिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना प्रदान करण्यात आला. मंत्री अनिल परब, राजेश टोपे, वर्षा गायकवाड, विजय ऊर्फ भाई गिरकर, संजय दत्त, राहूल नार्वेकर, कपिल पाटील, डॉ. अनिल बोंडे, सुभाष साबणे, राहुल कुल, धैर्यशील पाटील आदींनाही उत्कृष्ट संसदपटू आणि भाषण पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले.