इस्लामपूर : वार्ताहर
इस्लामपूर मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्यांची बंडखोरी थोपविण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले नाही. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी तिघांंनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता मैदानात आठ उमेदवार राहिले आहेत.
नगराध्यक्ष पाटील उमेदवारी मागे घेणार काय, याकडे दिवसभर मतदारसंघातील लोकांचे लक्ष होते. पाटील यांची बंडखोरी थोपविण्यासाठी भाजप नेत्यांनी प्रयत्न केले होते. ते शेवटच्या क्षणी उमेदवारी मागे घेतील, अशी आशा विकास आघाडीच्या नेत्यांनाही होती. त्यामुळे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या संपर्क कार्यालयात त्यांच्यासह शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी, गटनेते राहुल महाडिक, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, विक्रम पाटील, भीमराव माने दुपारपर्यंत सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून होते. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवार जगन्नाथ मोरे, गवस मुजावर, मन्सूर मोमीन या तिघांनी माघार घेतली. त्यामुळे आता मैदानात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, शिवसेनेचे गौरव नायकवडी, अपक्ष निशिकांत पाटील, बहुजन वंचित आघाडीचे शाकीर तांबोळी, बळीराजा शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील, बहुजन समाज पार्टीचे विशाल जाधव – वायदंडे, अपक्ष विश्वास घस्ते, दत्तू गावडे असे आठ उमेदवार राहिले आहेत.
निशिकांत पाटील नॉटरिचेबल…
पाटील यांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरू होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांना ही जबाबदारी दिली होती. मात्र पाटील यांचा मोबाईल बंदच होता. त्यामुळे त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकला नाही. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्यामार्फतही पाटील यांची नाराजी दूर करण्याचा भाजपने प्रयत्न केल्याचे समजते.