मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : उत्तर महाराष्ट्रातील महाकाय जलसाठा असलेल्या गिरणा धरणातून आज (गुरुवार) सकाळपासून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हंगामात प्रथमच धरणाचे गेट उघडले गेले. गिरणा धरणातून ५००० क्युसेक्स एवढा पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांत मुसळधार पाऊस झाल्याने गिरणा, पूनद, मोसम, आरम आदी लहान मोठ्या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. हे पाणी गिरणा धरणाकडे झेपावत आहे. प्रकल्पात ९० टक्के जलसाठा झाला असून, आवक लक्षात घेऊन धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेला.
त्याप्रमाणे आज (गुरुवार) सकाळी धरणाच्या दोन गेटमधून पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तो प्रसंगी २५ हजार क्युसेक्सपर्यंत वाढविण्याचे नियोजन असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता अग्रवाल यांनी माध्यमांना सांगितले.
धरणाची जलसाठवण क्षमता २१ हजार ५०० दलघफू असली तरी प्रकल्पात १८ हजार ५०० दलघफू एवढा उपयुक्त जलसाठा मानला जातो.
यंदाही धरण १०० टक्के भरल्यास त्याची इतिहासात नोंद होईल. कारण आजपर्यंत सलग तीन वेळा धरण भरलेले नाही. १९७३ ते २०२० पर्यंत दहाच वेळा धरण भरले आहे.
काल रात्रीपर्यंत याप्रमाणे वरील धरणातून विसर्ग सुरू होता.
चणकापूर 3524
हरणबारी 2588
केळझर 839
नाग्यासाक्या 4979
ठेंगोडा बंधाऱ्यावरुन 12000