पुणे : पुढारी वृत्तसेवा
'माय सेफ पुणे' अॅपचे आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. आता शहरातील गंभीर गुन्हे किंवा एखाद्या भागात अपघात घडल्यास घटनास्थळाचे छायाचित्र नागरिकांनी पुणे पोलिसांनी तयार केलेल्या पाठविल्यास त्वरीत पोलीस मदत उपलब्ध होणार आहे.
एखाद्या ठिकाणी दुर्घटना किंवा गंभीर गुन्हा घडल्यास त्याचे छायाचित्र माय सेफ पुणे अॅपवर टाकल्यास त्वरीत मदत उपलब्ध करण्यात येणार आहे. शहरातील वेगवेगळ्या भागात पोलिसांकडून गस्त (बीटमार्शल) घालण्यात येते. त्यासाठी या अॅपचा चांगला फायदा होईल.
पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हे अॅप विकसित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या अॅपचे लोकार्पण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. शहर पोलीस दलातील परिमंडळ चारच्या अखत्यारीतील भागात उपायुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अॅप कार्यान्वित करण्यात आले आहे. शहरातील वेगवेगळ्या भागातील घटनांचे छायाचित्र या अॅपवर टाकल्यास त्वरीत पोलीस मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गस्त घालणार्या पोलिसांनी घटनास्थळाचा पत्ता पोलीस नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दरम्यान, पोलीस दलातील बदल्यांची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडावी, या विचाराने संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. संगणकीय प्रणालीचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
करोनाच्या संसर्गात चांगली कामगिरी करणारे पोलीस आधिकारी विजय पुराणिक, गौरव देव, सुहास टिळेकर, उत्तम गाडे, गौरव कांबळे, रेणुका भांगरे आदींना पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. करोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेले पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांना अनुकंपा तत्वावर पोलीस दलात नोकरी देण्यात आली आहे. संतोष म्हेत्रे, अभिजीत आनंद गायकवाड, प्रसाद दिलीप वावरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.