अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई ‘अलर्ट’

मुंबई : प्रतिनिधी

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या वादग्रस्त अयोध्या खटल्याचा शनिवारी निकाल लागणार असल्याने गुप्तचर विभागाने दिलेल्या सूचनेनंतर मुंबई शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. या निकालानंतर वादग्रस्त मॅसेज व्हायरल होऊन वातावरण अधिक चिघळू नये म्हणून पोलिसांनी सोशल मिडीयावर विशेष नजर ठेवली आहे. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशनसह गस्तीवर अधिक भर देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. 

मुंबई पोलिसांच्या मदतीला अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला असून गर्दीच्या ठिकाणी, महत्त्वाच्या रेल्वे स्थानके, शासकीय आणि प्रशासकीय तसेच प्रमुख मंदिरासह प्रार्थनास्थळावर जास्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर अलीकडेच वरिष्ठ पेालीस अधिकार्‍यांची पोलीस आयुक्तालयात एक बैठक बोलाविली होती. या बैठकीत निकालाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहे. निकालानंतर राजकीय नेत्यांनी वादग्रस्त विधान करु नये म्हणून सर्वच पक्षाच्या नेत्यांना शांत राहून कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, पोलिसांना सहकार्य करावे, कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली होती.

मुंबईतील प्रमुख मंदिरासह मशिद तसेच इतर प्रार्थनास्थळावर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मंत्रालय, विधानसभा, विधानभवनासह शासकीय आणि निमशासकीय इमारतीच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. व्हॉअप, फेसबुक, ट्विटर, इंटाग्राम आदी सोशल साईटवर पोलिसांनी विशेष नजर ठेवली आहे. निकालाचे आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट करणार्‍यांविरुद्ध सक्त कारवाई करण्याचे आदेशच पोलीस आयुक्तांनी दिले आहे.

सर्वच पोलीस ठाण्यांना सतर्क राहून गस्त, नाकाबंदी आणि कोम्बिंग ऑपरेशनवर भर देण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्व पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आले असून सुट्टीवर असलेल्या पोलिसांनी तातडीने सेवेवर हजर राहावे असे आदेश जारी करण्यात आले आहे. मुंबई शहरात येणार्‍या आणि मुंबईतून बाहेर जाणार्‍या सर्व चेकनाक्यावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून प्रत्येक संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. शहरातील विविध लॉज, हॉटेल आणि गेस्ट हाऊसची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. यावेळी संशयित व्यक्तीस दिसल्यास त्याची कसून चौकशी करा, खात्री केल्यानंतर त्याची सुटका करा असे आदेश देण्यात आले आहे. मुंबई शहरातील प्रमुख रेल्वे स्थानके विशेषता दादर, बोरिवली, अंधेरी, कुर्ला, ठाणे, चर्चगेट, सीएसएमटी, भायखळा आदी स्थानकावर प्रचंड गर्दी असल्याने तिथे रेल्वे पोलिसांनी जादा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बंदोबस्तातही अचानक वाढ करण्यात आली आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईतंर्गत आतापर्यत अनेक समाजकंटकांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. काहींना मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतून तडीपार करण्यात आले आहे. या कालावधीत मुंबई शहरात दिसल्यास त्यांच्यावर सक्त कारवाईचे निर्देश देण्यात आले आहे. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे मुंबईकरांनी कुठल्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता मुंबई पोलिसांना सहकार्य करावे, कायदा व सुव्यसथा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी, शक्यतो पोलिसांना हस्तक्षेप करण्यास भाग पाडू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.

समाजात तेढ निर्माण होईल तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडेल असे कोणतेही कृत्य कोणीही करु नये. शहरात विविध ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून पोलिसांची प्रत्येक घटनेवर बारीक नजर आहे, त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्‍वास न ठेवता त्याची मुंबई नियंत्रण कक्षातून शहानिशा करावी असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांसह एटीएस, गुन्हे शाखा, राज्य राखीव दलाच्या 20 कंपना, रॅपिट अ‍ॅक्शन फोर्सच्या चार तुकड्या, दंगल नियंत्रण पथक, अग्निशमन दल, बॉम्बशोधक व नाशक पथकासह श्‍वान पथकाला बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे. गुप्तचर विभागाकडून येणार्‍या प्रत्येक माहितीची शहनिशा करण्याचे आदेश एटीएस अधिकार्‍यांना देण्यात आले आहे.

शांतता व संयम राखण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला रामजन्मभूमी विवादाचा निकाल उद्या अपेक्षित असून, या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि शांतता व सलोखा राखण्यास मदत करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या प्रकरणातील सर्व बाजू आणि सर्व पक्षांना ऐकल्यानंतरच आता हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजामध्ये सलोखा राखणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य सरकार सर्व यंत्रणांच्या संपर्कात आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news