पुणे; पुढारी वृत्तसेवा : आंदेकर टोळीच्या विरोधात तरुणांना एकत्रित करून स्वतःची टोळी करणाऱ्या सूरज अशोक ठोंबरे (रा. नाना पेठ) याला पोलिसांनी संगारेड्डी हैद्राबाद येथून अटक केली आहे. ठोंबरे याच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मकोका) कारवाई केल्यानंतर तो फरार झाला होता.
अधिक वाचा : मोठा आवाज काढल्याने भाजीविक्रेत्याला भोसकले
आंदेकर टोळीतील एका तरुणावर सूरज ठोंबरे याच्या टोळीने २३ फेब्रुवारी हल्ला करुन खूनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाअंती ठोंबरेने टोळी निर्माण करून गुन्हे करत असल्यामुळे त्यांच्यावर मकोका नुसार कारवाई केली होती. तसेच, त्याच्या टोळीतील पाच आरोपींना अटक केली होती. ठोंबरे, त्याचा सहकारी आकाश सासवडे, शुभम पावळे हे फरारी होते. या गुन्ह्याच्या तपास सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर करत होते. त्यानुसार ठोंबरे व त्याच्या साथीदाराला पकडण्यासाठी विशेष पथक तयार केले होते.
अधिक वाचा : पुणे: ११ हजार कोरोना रुग्णांचा थांगपत्ताच नाही
दरम्यान तो हैदराबाद शहरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक अभिजित पाटील,उपनिरीक्षक विशाल मोहिते, कर्मचारी भालेराव, शाम सुर्यवंशी, महेबुब मोकाशी सागर केकान, तुषार खडके, अमेय रसाळ यांच्या पथकाने त्याला लपलेल्या ठिकाणाहून अटक केली. त्याच्या सोबत त्याचा सहकारी पवन उर्फ विकास राकेश करताल याला अटक केली आहे. तो सांगवी पोलिस ठाण्यात फरारी होता. त्याला सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
अधिक वाचा : पुणे : लष्कर, रेल्वे भरती घोटाळ्याचे मोठे रॅकेट उघड