आजच्या समस्यांची उत्तरे आपणास इतिहासात मिळू शकतात. झालेल्या चुका पुन्हा होऊ न देण्याची शिकवण इतिहासापासून मिळते. आर्य चाणक्य लिहितात, जी जात आपला इतिहास विसरते निश्चितच तिचा अंत होतो. इतिहासाच्या आधारे गमावलेली शक्ती पुन्हा प्राप्त करता येते. जीवनाच्या संघर्षात त्याच जाती टिकाव धरू शकतात, ज्या आपला इतिहास सुरक्षित राखतात. म्हणून, पानिपत युद्धाचा खरा इतिहास जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पानिपतच्या युद्धाला 259 वर्षे पूर्ण होत आहेत. 2012 पासून दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी मराठा शौर्य दिन साजरा केला जातो.
भारतीय इतिहासाचा परिवर्तन बिंदू
14 जानेवारी 1761 च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. परिणामी, या देशावर असलेला मराठ्यांचा प्रभाव कमी झाला व कालांतराने इंग्रजांचे राज्य पेशव्यांच्या चुकीमुळे भारतावर आले. पानिपतचे पहिले युद्ध बाबर आणि इब्राहीम लोधी यांच्यामध्ये इसवी सन 1526 ला झाले. त्यात विदेशी बाबर विजय झाला. पानिपतचे दुसरे युद्ध इसवी सन 1556 अकबर आणि हेमू यांच्यामध्ये झाले. त्यात विदेशी अकबर विजयी झाला व हिंदुस्थानच्या इतिहासात परिवर्तन झाले. इसवी सन 1761 ला पानिपतचे तिसरे युद्ध मराठा आणि अहमदशहा अब्दाली यांच्यामध्ये झाले. अब्दाली विजयी झाला तरी त्याची प्रचंड हानी झाल्यामुळे नाईलाजाने त्याला आपल्या देशात परत जावे लागले. या पराभवामुळे मराठ्यांची विजय यात्रा खंडित झाली व इंग्रजी साम्राज्याची पायाभरणी झाली.
पराजयाची कारणे
असमर्थ पेशव्यांमुळे मराठा साम्राज्यात निर्माण झालेले दोष हे या पराजयाची कारणे आहेत. उदा.
1) अहमदिया करार – इस 1752 ला नानासाहेब यांनी हा करार केला. या करारास स्वराज्याची सनद म्हणतात; पण हे असत्य आहे. सत्य हे आहे की, या करारान्वये हिंदवी स्वराज्य मोगलांचे गुलाम झाले. हिंदवी स्वराज्याची उदात्त कल्पना सोडून स्वार्थासाठी पेशवे मोगलांचे गुलाम झाले. त्यामुळे हा पराभव झाला.
2) अहमदशहा अब्दाली हा सदाशिवरावभाऊपेक्षा अनुभवी सेनापती होता.
3) चौथ वसूल करताना धनलोभामुळे पेशव्यांनी अनेकदा लूट केल्यामुळे उत्तर भारतातील हिंदू राजे पेशव्यांच्या विरोधी बनले होते. त्यामुळे पानिपतच्या युद्धात एकाही हिंदू राजाने पेशव्यांना मदत केली नाही.
4) हिंदुस्थानच्या मोगल बादशहाच्या रक्षणासाठी आम्ही विदेशी अब्दालीबरोबर युद्ध करत आहोत, ही पेशव्यांची घोषणा हिंदू व मुसलमान यापैकी कोणीही सत्य मानली नाही.
5) नजीबखानाने धर्मयुद्धाची घोषणा करून सर्व मुसलमानांना संघटित केले; परंतु पेशव्यांना हिंदूंना संघटित करणे शक्य झाले नाही. कारण त्यांच्यावर कोणाचा विश्वास राहिला नव्हता.
6) भाऊने मराठ्यांची गनिमी काव्याची युद्धनीती शिंदे-होळकर यांचा सल्ला डावलून सोडून दिली व फ्रेंच पद्धतीची तोफखान्याची गोलाच्या युद्धाची पद्धत स्वीकारली; परंतु या पद्धतीचे प्रशिक्षण मराठी सेनेला दिले गेले नव्हते. म्हणून मराठी सेना आपल्या तोफखान्यासमोर आली व अनर्थ घडला.
7) शिव काळात सेनेत एकही स्त्री असत नसे. शत्रूच्या मुलुखातही स्त्री पकडणे हा गुन्हा होता. त्याला बाई धरेल त्याचे डोचके मारावे, ही कडक शिक्षा होती. शिवशाही विसरलेल्या पेशव्यांच्या सेनेबरोबर परिवार, हजारोंच्या संख्येने नाच-गाणे करणार्या महिला, यात्रेकरू व सेवक होते. सेनेवर हे ओझे झालेले होते.
8) रसद व्यवस्था आणि संपर्क व्यवस्था युद्धात जास्त महत्त्वाची असते. पेशवे ही रसद आणि संपर्क व्यवस्था स्थापित करू शकले नाहीत. या व्यवस्था नष्ट करण्यात अब्दाली यशस्वी झाला.
9) पेशवे दिल्लीजवळ रणभूमी करू इच्छित होते. त्यामुळे कुंजपुरा किल्ला जिंकल्यानंतर त्यांनी सत्वर दिल्लीस परत यावयास हवे होते; परंतु धार्मिकतेमुळे ते कुरुक्षेत्रास अवेळी गेले. याच वेळी अब्दालीने यमुना ओलांडून पेशव्यांचा दिल्लीचा रस्ता रोखला. त्यामुळे पानिपत ही अब्दालीच्या सोयीची रणभूमी झाली आणि त्याची रसद आणि संपर्क व्यवस्था चांगली राहिली; परंतु पेशव्यांची ही व्यवस्था बिघडली.
10) प्रतिकूल परिस्थितीमध्ये युद्ध टाळणे शिवाजीराजे महत्त्वपूर्ण मानत होते; परंतु पेशवे शिवरायांना विसरले होते. त्यामुळे युद्ध टाळण्याचा प्रयत्न पेशव्यांनी केला नाही.
11) शिव काळात मावळे व सरदार हिंदवी स्वराज्याच्या महान स्वप्नासाठी लढत होते; पण कोणतीही लढाई न करता कटकारस्थाने करून पेशव्यांनी बेईमानी करून शिवशाही संपवून पेशवाई सुरू केली. आता मराठे वतनासाठी लढत होते. गुरूची विद्या गुरूला दाखवून सरदार स्वतंत्र झाले. त्यांची शिंदे, होळकर, पवार, गायकवाड अशी राज्ये स्थापन झाली. पेशव्यांची केंद्रीय सत्ता कमजोर झाली होती. त्यामुळे युद्धात एकवाक्यता नव्हती. पराभवाचे हे एक प्रमुख कारण आहे.
मराठ्यांची शौर्यगाथा
अन्न-पाणी, टपाल अशी सर्व रसद बंद झाल्यामुळे हजारो मावळे, घोडे, हत्ती उपाशी मेले. गोलाची लढाई ही सर्वात मोठी चूक होती. अन्नाच्या शोधात मावळा गोलाबाहेर आला की, शत्रू त्याचा शिरच्छेद करून अब्दालीस दाखवत होता. त्याबद्दल त्याला प्रारंभी सोन्याची एक अशर्फी मिळत होती. नंतर दोन मिळू लागल्या. त्यामुळे उपासमारीने अनेक जण मेले. उपाशी मरण्यापेक्षा शौर्याने लढून मेल्यास स्वर्गात आपणास जागा मिळेल, या भावनेने भयभीत न होता मराठे लढले. त्यांना मरणाचे भय नव्हते. दुपारपर्यंत मराठे सरस होते. अब्दाली घाबरला होता. त्याने आपला जनानखाना खूप मागे पाठवला होता. विजय पाहण्यासाठी अनुनभवी विश्वासराव कोणत्याही सुरक्षिततेशिवाय हत्तीवर बसून पुढे आला. शत्रूने त्याच्यावर गोळ्यांचा पाऊस पाडला. तो मारला गेला. संयम सोडून भाऊसाहेब हत्तीवरून घोड्यावर आले व त्यांनी शत्रूवर हल्ला करून हाराकिरी केली. यामुळे सेना गोंधळली, आता बाजी पलटली आणि पेशवे हरले.
अब्दालीस निमंत्रण देणारा जयपूरचा राजा माधो सिंग यांना अब्दालीने परत गेल्यावर त्याने लिहिलेल्या पत्रात मराठ्यांच्या शौर्याची खूपच प्रशंसा केली आहे. आमच्या शत्रूनेसुद्धा त्या दिवशी स्वतःला नामांकित करून सोडले. ते इतक्या उत्कटतेने लढले की, तसे लढणे कोणालाही शक्य नव्हते. हेच काय; पण अत्यंत महनीय कीर्तीस्पद अशी कृत्ये त्यांनी रणांगणावर करून दाखविली.
शौर्यतीर्थ पानिपत
पानिपतच्या रणभूमीवर 1980 पासून 5 एकरांमध्ये काला आंब स्मारक आहे. अब्दाली धर्मयुद्ध करत होता; तर मराठे देशी मुगल बादशहाच्या रक्षणासाठी विदेशी अब्दालीबरोबर लढत होते. मराठ्यांच्या युद्धाचा उद्देश महान होता. शत्रू जेव्हा तुमच्या शौर्याची प्रशंसा करतो, तेव्हा ते शौर्य महानच असते. 2003 पासून संशोधन करून आम्ही हरियाणातील रोड समाज हा मराठा समाजच आहे, हे पुराव्यानिशी सिद्ध केले. पानिपत युद्ध के रोड मराठों का इतिहास! या ग्रंथाचे प्रकाशन महामहीम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात 2010 साली झाले. 2012 पासून दरवर्षी 14 जानेवारी या दिवशी आम्ही तेथे मराठा शौर्य दिन साजरा करतो. दरवर्षी लाखो मराठे येतात. देशातील अनेक दिग्गज या कार्यक्रमाला येऊन गेले आहेत. विदेशातूनही मराठे येतात. शौर्यतीर्थ पानिपत. अर्थात, आंतरराष्ट्रीय शौर्य स्मारक. तीर्थ म्हणजे पवित्र स्थान. पानिपतच्या रणभूमीवर आमच्या पूर्वजांच्या रक्ताचा अभिषेक झाला आहे. म्हणून आम्ही आमच्या पूर्वजांच्या स्मृतीला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दर वर्षी पानिपतच्या रणभूमी वर जातो. महाराष्ट्र हा भारताचा खङ्ग हस्त आहे. मराठ्यांनी मोगलांना हरविले. जर मराठे पानिपतवर लढले नसते, तर संपूर्ण हिंदुस्थान पाकिस्तान झाला असता. मराठ्यांच्या घोड्यांच्या टापा भारतावर जिथेपर्यंत पडल्या, तिथेपर्यंतच हिंदुस्तान झाला व राहिलेला पाकिस्तान झाला.
पानिपतच्या रणभूमीवर आम्ही भव्य दिव्य असे राष्ट्रप्रेमाचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे. आग्य्राचा ताजमहाल रतीप्रेमाचे प्रतीक आहे; तर पानिपतचे शौर्यतीर्थ आंतरराष्ट्रीय राष्ट्रप्रेमाचे प्रतीक असेल.