नाशिक : पुढारी ऑनलाईन
राज्यात निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील तसेच काँग्रेस नेत्यांचे इनकमिंग चांगलेच चर्चेचा विषय झाला. मेगाभरतीच्या नावाखाली अनेक आयारामांना साग्र संगीतासह प्रवेश देण्यात आला. मात्र, यामधील अनेकांना राज्यातील जनतेने घरी बसवत चांगलाच धडा शिकवला.
असे असतानाही अजूनही इनकमिंग सुरूच आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी एका महिन्यात तीन वेळा पक्ष बदलून शिवसेनेत प्रवेश केला. बाळासाहेब सानप 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवबंधनात अडकले.
बाळासाहेब सानप यांनी नाशिक पूर्व मतदारसंघातून २०१४ मध्ये भाजपच्या तिकीटावर निवडून आले. मात्र यावेळी त्यांना भाजपने तिकिट नाकारले. त्यामुळे नाराज झालेल्या बाळासाहेब सानप यांनी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवली. मात्र, त्यांना भाजप उमेदवार राहुल ढिकलेंकडून १२ हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला.
त्यामुळे सानप यांनी पुन्हा एकदा पक्षांतर करून सत्तेत किंगमेकर ठरत असलेल्या सेनेत प्रवेश केला. बाळासाहेब सानप हे भाजपचे नाशिक महापालिकेतील पहिले महापौर आहेत.