सीपीआर रूळावर; ट्रॉमा केअर सेंटर लवकरच होणार सुरू

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

सोमवारी पहाटे सीपीआरच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये शॉर्टसर्किटने आग लागली. त्यामुळे एका व्हेंटिलेटरचा स्फोट झाला. यावेळी या विभागात 15 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. या सर्व रुग्णांना तातडीने अन्यत्र हलवण्यात आले. या वॉर्डमध्ये उपचार घेणार्‍यांपैकी तिघांचा काही वेळाने मृत्यू झाला. या घटनेमुळे सीपीआरमध्ये काहींसे घबराटीचे वातावरण होते. मात्र, सीपीआर काही वेळातच पूर्वपदावर आले.

ट्रॉमा केअर सेंटरमधील स्थलांतरित करण्यात आलेल्या 12 रुग्णांची स्थिती गंभीर असली तरी ते सध्या स्थिर आहेत. त्यांच्यावर अप्पर कोरोना आणि लोअर कोरोना वॉर्डसह न्यू कोरोना वॉर्ड येथे उपचार सुरू आहेत. यासह सीपीआरच्या अन्य सर्व वॉर्डमध्ये नियमित कामकाज सुरू आहे. उपचार घेणार्‍या रुग्णांची दैंनदिन तपासणी करण्यात येत आहे. सीपीआरमध्ये दाखल होणार्‍या रुग्णांचेही प्रमाण दैंनदिन सरासरी इतकेच आहे. बुधवारी सीपीआरमध्ये एकूण 360 रुग्ण उपचार घेत होते. यापैकी 45 जणांची प्रकृती गंभीर आहे. हे सर्वजण व्हेंटिलेटवर आहेत. तीन रुग्ण हाय फ्लो ऑक्सिजनवर असून, उर्वरित सर्व रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे.

ट्रॉमा केअर सेंटरमध्ये आग लागल्यानंतर हा वॉर्ड बंद करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशी समिती नेमली आहे. या समितीने सूचना केल्यानंतर या वॉर्डची तातडीने स्वच्छता करण्यात येईल. आवश्यक साधनसामुग्री तातडीने उपलब्ध केली जाईल. वीज वाहिन्यांची जोडणीही केली जाईल आणि शक्य तितक्या लवकर हा विभाग रुग्णसेवेसाठी खुला केला जाईल असेही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहूल बडे यांनी सांगितले.

प्रत्येक वॉर्डात घेतली जातेय दक्षता

सोमवारच्या घटनेनंतर प्रत्येक वॉर्डमध्ये दक्षता घेतली जात आहे. वीजेचे स्विच सुरू करण्यापूर्वी तसेच वीज पुरवठा, ऑक्सिजन पुरवठा सुरू केल्यानंतर वारंवार त्याकडे लक्ष दिले जाते. जाता येता त्याची पाहणी केली जात आहे. यासह जुन्या जोडण्या, वीज वाहिन्यांचे जाळे असल्यास त्या ठिकाणी अधिक खबरदारी घेतली जात आहे. वॉर्ड बॉयसह परिचारिका आणि डॉक्टरही जाता-येता लक्ष देत आहेत.

सीपीआरमध्ये वर्दळ वाढली

सोमवारी झालेल्या घटनेनंतर सीपीआरमध्ये काहीसे घबराटीचे वातावरण होते. डॉक्टर, परिचारिकांसह वॉर्ड बॉय, कर्मचारी, सुरक्षा रक्षक यांच्यातही काहीसे भीतीचेच वातावरण होते. मात्र, मंगळवापासून हे वातावरण कमी झाले. आज दिवसभर तर सीपीआरमध्ये नेहमीसारखी वर्दळ होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सीपीआरमधील रुग्णांच्या नातेवाईकांची संख्या कमीच आहे. यापूर्वी जशी नातेवाईकांची संख्या होती, तशीच नातेवाईकांची वर्दळ आजही दिसत होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news