कोल्हापूर: प्रशासनाच्या निषेधार्थ हातकणंगले नगरपंचायतीमध्ये नागरिकांनी टाकला कचरा

कोल्हापूर: प्रशासनाच्या निषेधार्थ हातकणंगले नगरपंचायतीमध्ये नागरिकांनी टाकला कचरा

हातकणंगले: पुढारी वृत्तसेवा : प्रभाग स्वच्छेतेबाबत वारंवार सूचना देऊनही न ऐकणाऱ्या नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात नागरिकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रशासनाचा निषेध करीत कार्यालयातच कचरा टाकण्यात आला. यावेळी पाणीपुरवठा व आरोग्य विभागाच्या महिला अभियंता आसावरी सुतार, संगणक प्रभारी अधिकारी पंकज थोरात, प्रशासकीय अधिकारी सचिन पाटील यांना धारेवर धरले. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.

हातकणंगले शहरातील काही भागात मोठया प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचून राहिले आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत नगरपंचायतीच्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम उपनगराध्यक्ष केतन कांबळे यांनी केले होते. परंतु प्रशासन व स्वच्छता ठेकेदाराकडून उडवा उडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप कांबळे यांनी करीत प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला. यावेळी अभियंता आसावरी सुतार यांच्या दालनात कचऱ्याचा ढीग टाकत निषेध व्यक्त केला.

यावेळी उपस्थित नगरसेवक व नागरिकांनी काही नगरसेवकांच्या सांगण्यावरूनच कचऱ्याचा उठाव केला जातो. मात्र, इतर भागातील नागरिक वारंवार लेखी तक्रार करूनही कचऱ्याचा उठाव केला जात नसल्याचा आरोप केला.

यावेळी नगरसेवक मयूर कोळी, नगरसेवक दीनानाथ मोरे, नुरमहमद मुजावर, अमन जमादार, सिद्धार्थ हेरवाडे, सचिन कोठावळे, सूहेल मुल्ला, रियाज मुजावर, आदेश चव्हाण, विश्वजित भोसले, अजित चिनगे, निखिल केलुसे, सौरभ केळुसे आदीसह नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news