पूर्वा कोडोलीकर, पुढारी ऑनलाईन
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ म्हणजे करवीर. आपलं कोल्हापूर. कोल्हापूरचा इतिहास किमान २००० वर्षं जुना आहे. आणि वैशिष्ट्यं म्हणजे २००० वर्षांच्या इतिहासाच्या या पाऊलखुणा कोल्हापुरात आजही जागोजागी दिसून येतात.
मध्ययुगात तत्कालीन राजघराण्यांनी कोल्हापुरात विविध ठिकाणी मंदिरांची निर्मिती केली होती. हा वैभवशाली वारसा आजही आपल्याला पाहायला मिळतो. या मंदिरातील एक मंदिर म्हणजे कपिलेश्वर मंदिर होय. कोल्हापूरच्या ग्रामदैवताचा मान या मंदिराला आहे. याच मंदिराचा इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत.
जलाशयांची नगरी असंही करवीरचं एक नाव आहे. रंकाळा ,खंबाळां ,सिद्धाळा कापिलतीर्थ ,वरूणतीर्थ अश्या 11 तलावांमुळे. यातील काही तलाव आजही अस्थित्वात आहेत.
त्यातला शहराच्या मध्यभागी असणारा तलाव म्हणजे कपिलतीर्थ.भारतीय तत्वज्ञानातील सांख्य दर्शनाचे प्रणेते कपिल मुनी त्यांच्या नावावरून या तीर्थाला कापिलतीर्थ अस नाव देण्यात आल.
10,000 चौरसफूट व्याप्ती असणार हा तलाव 1895 मध्ये सर ह्युलेट यांनी नगर सुधारणा करताना बुजवला ,या तलावाच्या काठाशी बरीच छोटी मोठी मंदिर, शिवलिंग होती.
यापैकीच एक यादव कालीन, १२ व्या शतकातील हेमाडपंतीमंदिर ,कोल्हापूरचे आराध्य दैवत म्हणजे कपिलेश्वर मंदिर.
कपिल मुनींच्या सर्व परिवाराच आस्तित्व या करवीर नगरी मध्ये होते यांचे पुरावे म्हणजे याच कपिलतीर्थाच्या काठाशी असणारी त्यांचे पिता कर्दम ऋषी आणि माता देवाहूती यांची शिवलिंगे.
कपिलतीर्थाजवळ कपिल मुनिनी हे शिवलिंग स्थापन केले म्हणून या शिवलिंगाला कपिलेश्वर असं म्हटलं आहे.
या मंदिराला कोल्हापूरचे ग्रामदैवत म्हटलं जातं. आजही अंबाबाई मंदिराचे कोणतेही अनुष्ठान करताना पहिला नारळ या मंदिरात दिला जातो. कोणत्याही शूभ कार्याची पत्रिका पहिला या मंदिरात पूर्वी देत होते. शाहू महाराजांनी 9 ब्राह्मण कुटुंबांची नियुक्ती या मंदिराच्या देखरेखीसाठी केली होती. ज गेल्या 9 पिढ्या धर्माधिकारी कुटुंब या संपूर्ण मंदिराचा कारभार बघतात.
हे मंदिर यादव कालीन आहे आणि या मंदिराच्या स्थापत्य कलेचा विचार केला तर याची बांधणी चुना किंवा तत्सम पदार्थ न वापरता फक्त दगड एकमेकात अडकवून घटट् बांधणी केलेली दिसते.यालाच हेमाडपंती बांधणी म्हणतात.यादवांचे मंत्री हेमाद्री पंडित यांनी या वास्तुशास्त्राच्या कलेचा विकास केला त्यांच्या नावाचा अपभ्रंश होऊन याला हेमाडपंती बांधणी असे म्हणतात.
प्राचीन कालीन वारसा असणाऱ्या या मंदिरात प्रवेश करताना पाहिलें तर दिसते ते दोन्ही बाजूला असणारी दोन गणपतीची मंदिरे , बाह्य मंडपात असणारे खांब लक्ष वेधून घेतात देखणी बांधणी तर आहेच पण वरच्या बाजूला शिल्पात खांबाला वेटाळून बसलेल्या नागाचं शिल्प आहे.खांब आणि मंदिराचे छत या गोष्टींचा विचार केला तर हे मंदिर १२ व्या शतकातील आहे हे त्याच्या बांधणी वरुन लक्षात येतेच. बाह्य मंडपाच्या भिंती बुटक्या आहेत आणि डाव्या बाजूला हनुमानाची सुंदर मूर्ती आहे.दरवाजा तीन शाखा द्वार पद्धतीचा आहे , मूळ पिंड देखणी भक्कम आहे.
ही पिंड १३४ सेमी लांब ९७ सेमी रुंद आणि ३५ सेमी उंच आहे .त्या काळची स्थापत्य कला किती प्रगल्भ होती याचा आपण विचार करू शकतो.
हे मंदिर यादव कालीन आहे याचा पुरावा म्हणजे या मंदिरात आसणारा शिलालेख. हा शिलालेख सन 1162 शकेचा आहे. पिलाई जंत्री च्या भाग 4 नुसार रविवार इंग्लिश तारीख 24 जून 1240 चा आहे. यादव कुळातील सिंघणदेव 2 रा याचा हा शिलालेख, या शिलालेखात एकूण 33 ओळी आहेत त्यापैकी 24 ओळी शिलालेख आहे आणि उरलेल्या ओळींमध्ये त्याचा सारांश आहे .
कपिलेश्वर मंदिर हे निरंधार पद्धतीचे आहे.निरंधार म्हणजे मूळ मूर्तीच्या बाजूने प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग नसतो.पण अंबाबाई मंदिर हे सांधार पद्धतीचे आहे कारण त्याच्या बाजूनी प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण मार्ग आहे ..
दोन गर्भगृहे म्हणजे या मंदिराचे वैशिष्ठ आहेत.या दुसऱ्या गर्भगृहाचे बांधकाम टप्या टप्याने केले असावे असं अंदाज आहे.या मंदिरात नक्षीदार पीठिका आहे आणि त्यावर अजून एक पीठिका आहे.पण मंदिर नेमके कोणाचे असावे हा अंदाज नाही कारण या पीठिकेवर कोणतीच मूर्ती नाही.तज्ञांच्या मते येथे नरसिंहाची मूर्ती असावी.मंदिराचे मुळ गर्भगृह पूर्वाभिमुख आहे तर हे दुसरे गर्भगृह उत्तराभिमुख आहे.
आज कोल्हापूरचे ग्रामदैवत असणाऱ्या या मंदिराच्या बाजूने भाजीपाला मंडई , धान्याची दुकान जरी असतील तरी श्रद्धा माणसाला इथे खेचून आणतेच.असंही म्हणलं जा ते की , अंबाईचे दर्शन हे कपिलेश्वरच्या दर्शनानेच पूर्ण होते .म्हणूनच या मंदिराचं महत्त्व करवीर माहात्म्य सुद्धा सांगितलेलं आहे.
म्हणून जेव्हा केव्हा कोल्हापूरला याल तेव्हा या मंदिरात नक्की दर्शन घ्या.