’आयर्न मॅन’चे कोल्हापुरी व्हर्जन ’लोहपुरुष’

Published on
Updated on

कोल्हापूर : सागर यादव 

जगप्रसिध्द 'आयर्न मॅन' या साहसी स्पर्धेचे रांगडे कोल्हापुरी व्हर्जन म्हणून 'लोहपुरुष' असे या क्रीडा प्रकाराचे नामकरण करण्यात आले आहे. क्रीडा विश्‍वातील सर्वात खडतर अशा 'आयर्न मॅन' स्पर्धेच्या धर्तीवर 'शाहूनगरी' कोल्हापुरात 'लोहपुरुष : ट्रायथलॉन व ड्युएथलॉन' या साहसी स्पर्धेचे आयोजन कोल्हापूर स्पोर्टस् क्लबतर्फे (केएससी) करण्यात आले आहे. रविवार, दि. 24 रोजी पहाटे शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलाव येथून या स्पर्धेस प्रारंभ होईल. दैनिक 'पुढारी' या स्पर्धेचे असोसिएट पार्टनर आहेत. 

जगभर एकदिवसीय स्पर्धा प्रकार म्हणून 'आयर्न मॅन' या साहसी खेळाची ओळख आहे. अतिशय खडतर अशा या स्पर्धेत 17 तासांत 4 कि.मी. स्विमिंग, 180 कि.मी. सायकलिंग आणि 42 कि.मी. रनिंग हे अंतर न थांबता पार करावे लागते. अशा या अत्यंत कठीण स्पर्धेत 'क्रीडानगरी' कोल्हापूरचे खेळाडू मावळे-पुरुष व रणरागिणी-महिला यांनी आपल्या कामगिरीने जणू दबदबाच निर्माण केला आहे. 2014 पासून अवघ्या 2-3 वर्षांत पाच-दहा नाही, तर तब्बल 31 खेळाडूंनी जगभरातील विविध देशांत झालेल्या 'आयर्न मॅन' स्पर्धेत सहभागी होऊन या किताबाला गवसणी घातली. भारतात सर्वाधिक 'आयर्न मॅन' किताब कोल्हापूरच्या खेळाडूंनी पटकाविले आहेत. यामुळे या शहराची ओळख सर्वत्र 'सिटी ऑफ आयर्न मॅन' अशी निर्माण झाली आहे.

कोल्हापूरची शतकोत्तर खेळ परंपरा जपणे, ती विकसित करणे आणि साहसी खेळांना प्रोत्साहन व पाठबळ देऊन नवे खेळाडू निर्माण करण्याच्या उद्देशाने 'आयर्न मॅन' किताब पटकाविणारे खेळाडू एकवटले. त्यांनी 'कोल्हापूर स्पोर्टस् क्लब'ची (केएससी) स्थापना केली. आयर्न मॅन स्पर्धेच्या धर्तीवर गतवर्षीपासून कोल्हापुरात ट्रायथलॉन सारख्या साहसी स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले. यंदा या साहसी स्पर्धेचे नामकरण कोल्हापूरच्या रांगड्या परंपरेला साजेसे 'लोहपुरुष' असे करण्यात आले आहे. 

'लोहपुरुष' स्पर्धेची उत्कंठा शिगेला

रविवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी शिवाजी विद्यापीठ परिसरातील राजाराम तलावापासून स्पर्धेस प्रारंभ होईल. राजाराम तलावात स्विमिंग, कोल्हापूर ते निपाणी महामार्गावर सायकलिंग व शिवाजी विद्यापीठ परिसरात रनिंग असे या स्पर्धेचे स्वरूप असणार आहे. स्पर्धकांना 2 कि.मी. स्विमिंग, 90 कि.मी. सायकलिंग व 21 कि.मी. रनिंग हे अंतर 10 तासांत पूर्ण करावे लागणार आहे. स्पर्धेत देशातील मुंबई, पुणे, चेन्नई, बंगळूर, दिल्‍ली, हैद्राबाद येथील सुमारे 1 हजार स्पर्धक सहभागी होणार आहेत. 

'हाफ आयर्न ट्रायथलॉन' स्पर्धा पूर्ण करणार्‍या स्पर्धकांना 'लोहपुरुष' या विशेष किताबाने गौरविण्यात येणार आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय मानकानुसार होणार्‍या या स्पर्धेत सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक अध्यक्ष चेतन चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. विजय कुलकर्णी, संचालक अशिष तंबाखे, डॉ. प्रदीप पाटील, आदित्य शिंदे, गोरख माळी, संजय पाटील, महेश शेळके, राहुल माने, आकाश कोरगावकर, जयेश कदम यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

शंभरहून अधिक महिलांचा सहभाग

समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात महिला आज पुरुषांच्या बरोबरीने सक्रिय आहेत. क्रीडा क्षेत्र याला अपवाद नाही. प्रत्येक खेळात महिलांचा सहभाग असतोच. याच पद्धतीने 'आयर्न मॅन'सारख्या रांगड्या साहसी खेळातही महिलांचा सहभाग सातत्याने वाढू लागला आहे. कोल्हापुरातील स्पर्धेत तब्बल 100 हून अधिक महिलांचा सहभाग असणार आहे. रणरागिणी ताराराणी यांचा पराक्रमाचा वारसा जपत कोल्हापूरच्या महिलाही यात सहभागी होणार आहेत. कॉलेज युवतींसोबतच कुटुंब व मुलांची जबाबदारी सांभाळणार्‍या महिलांचाही यात सहभाग असणार आहे. जलतरणपटू सौ. महेश्‍वरी झुंजार सरनोबत आणि टेनिसपटू स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. नंदिता जोशी यांनी 'लोहपुरुष' स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी त्या जिद्द व चिकाटीने सराव करत आहेत. यापूर्वीही त्यांनी विविध साहसी स्पर्धांत यशस्वी सहभाग नोंदविला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news