‘इफ्फी’चा पडदा उघडणार ‘डिस्पाईट द फॉग’ने 

पणजी : प्रतिनिधी

सुवर्ण महोत्सवी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2019  (इफ्फी)चा पडदा यंदा युरोपियन चित्रपट 'डिस्पाईट द फॉग' ने उघडणार आहे. इफ्फीत 'डिस्पाईट द फॉग' या सलामीच्या चित्रपटाचा आशियाई प्रीमियर होणार आहे. इटलीतील निर्वासितांवर आधारित सदर चित्रपट युरोपमधील प्रतिष्ठित चित्रपट निर्माते गोरन पास्कालजेविक यांनी दिग्दर्शित केलेला आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

'डिस्पाईट द फॉग' हा चित्रपट एकूण 100 मिनिटांचा आहे. हा चित्रपट एका मुलाची कथा सांगतो, ज्याचे आईवडील इटलीत स्थलांतर करण्यासाठी रबर बोटमधून प्रवास करताना बुडतात. या मुलाला त्यानंतर संतती नसलेले स्थानिक जोडपे पाहते. 

इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याला संगीतकार शंकर महादेवन हे भारतीय व जागतिक संगीत सादरीकरण करणार आहेत. चित्रपट दाखविण्यासाठी यंदा आयनॉक्समधील स्क्रिन्सबरोबरच, कला अकादमी येथील मा. दीनानाथ मंगेशकर कला मंदिर तसेच पर्वरी येथील मल्टिप्लेक्स स्क्रिनदेखील वापरण्यात येणार आहेत. मडगाव, वास्को, साखळी व कुडचडे रवींद्र भवनातही चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

दरम्यान, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळातर्फे (एन.एफ.डी.सी.) इफ्फी निमित्त 13 व्या फिल्म बझार चे आयोजन केले आहे. फिल्म बझारच्या प्रोग्रेस लॅबमध्ये अभ्यासण्यासाठी  पाच प्रकल्पांची निवड केल्याचे एन.एफ.डी.सी.ने जाहीर केले आहे. एन.एफ.डी.सी. फिल्म बझार  पणजीत 20 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित केला आहे.

दरम्यान, भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा  कोंकणी चित्रपटांसाठी 'द गोवन स्टोरीज' हा विशेष स्वतंत्र विभागात ठेवला असून यात सात चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी जाहीर केले आहे. 

या विभागात गोमंतकीय चित्रपट निर्मात्यांचे 'द रेनी डे, नाचुया कुंपासार, पलतडचो मनीस, जुझे, आमोरी, दिगंत आणि के सेरा सेरा' हे कोेकणी चित्रपट सिनेरसिकांना पहायला मिळणार आहेत. या विभागासाठी 12 ते 14 चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या होत्या.

7,500 प्रतिनिधींची नोंदणी

इफ्फीसाठी आतापर्यंत 7 हजार 500 हून अधिक प्रतिनिधींनी नोंदणी केली आहे. यंदा 10 ते 12 हजार प्रतिनिधी राज्यात दाखल होणार, अशी अपेक्षा या आधी गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी व्यक्‍त केली होती. इफ्फीला अधिक तेरा दिवस राहिल्याने आणखी प्रतिनिधी नोंदणी अपेक्षित असल्याचे आयोजक  सूत्रांनी सांगितले. 

logo
Pudhari News
pudhari.news