सीसीटीव्हींमुळे निपाणीकर कितपत सुरक्षित? | पुढारी

निपाणी : प्रतिनिधी

येथील नगरपालिकेतर्फे शहरात मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. गेल्या 15 दिवसांत शहरासह उपनगरात चोरींचे प्रमाण वाढले आहे. सदर सीसीटीव्ही फुटेजमुळे आजतागायत पोलिसांनी कोणत्याही संशयितास ताब्यात घेतलेले नाही. त्यामुळे सीसीटीव्हींमुळे निपाणी कितपत सुरक्षित आहे, असा सवाल विचारण्यात येत आहे.

शहरात चिकोडी रोडवर अज्ञातांनी सकट दाम्पत्याचे दागिने लुटून पोबारा केला. त्यापाठोपाठ चिकोडी रोडवरील एस. मार्ट या बझारमधील संगणकाच्या बॅटर्‍या चोरीचा प्रकार घडला होता. तारळे यांच्या सीसीटीव्हीमधील फुटेजमुळे चोर सापडला असला तरी अन्य घटनांमधील चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. शहरात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत.

बिरोबा माळ येथील मच्छिंद्र देशपांडे यांच्या घरी 30 हजार रूपयांची तर बड्डे गल्ली येथे रोहीत स्वामी यांच्या घराचे कुलूप तोडून 2 लाखांची चोरी झाली होती. शहरात बसस्थानक सर्कल, बेळगाव नाका, खरी कॉर्नर, कोठीवाले कॉर्नर, गांधी चौक, मुरगूड रोडसह मोक्याच्या जागी सीसीटीव्ही बसविले आहेत. शिवाय काही बँका व व्यापार्‍यांनीही सीसीटीव्ही बसविले आहेत.  रात्रीच्यावेळी शहरातून उपनगरात ये-जा करणारी वाहने फुटेजमध्ये समजू शकतात. तरीही आजतागायत चोरीच्या घटनांचा तपासच लागलेला नाही.

वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी विविध उपाययोजना करणे गरजेचे आहे. शहरात कोट्यवधी रूपये खर्चून हायटेक बसस्थानक उभारले आहे.  पण येथेही सीसीटीव्हींचा अभाव आहे. पोलिसांसाठी एक छोटी चौकी उभारली आहे. बसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांचे सोने व पैसे लंपास होण्याच्या घटनाही वाढत आहेत. चोरीच्या घटना रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे.

पोलिसांकडून जनजागृती, तरीही वाढत्या घटना

पोलिस खात्याने नागरिकांना घराला कुलूप लावून जाताना शेजार्‍यांना कल्पना देण्यात सांगून  दागिने, रक्कम, किंमती वस्तू घरी न ठेवण्याची सूचना करून पत्रकाद्वारे जनजागृती केली आहे. पण लाखो रूपये खर्चून बसविलेल्या सीसीटीव्हींमुळे निपाणी कितपत सुरक्षित आहे, हे अनुत्तरित आहे. शहरात पोलिसांकडून रात्री सायरन वाजवून गस्त घालण्यात येते. पण तरीही चोरीच्या घटना घडत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news